मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
शाळेतल्या स्टेजवर साडी घालून लावणी ते मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता हा प्रवास
पुणेकर असलेला पुष्कर जोग याचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे अभिनेत होण्याचे…. त्यासाठी वडीलांनी ठेवलेली शिक्षणाची अट त्यांनी पूर्ण केली. तो एक डेंटींस्ट आहे. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपली छाप सोडणारा हा अभिनेता निर्माता म्हणूनही आपली ओळख निर्माण करु पहात आहे… आज 15 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त कलाकृती मिडीयानं त्याची करुन दिलेली ही छोटीशी ओळख….
डॉक्टर अभिनेता….
पुष्कर जोग. मराठी चित्रपटसृष्टीतील एक हॅण्डसम अभिनेता. बालकलाकार म्हणून त्याचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. पण अभिनयासोबत शिक्षणालाही तेवढंच महत्त्व दिल्याने हा अभिनेता आज दंतचिकित्सक, अर्थात डेंन्टीस्टही आहे. देशविदेश फिरायची आवड असलेल्या पुष्करला यशस्वी निर्माता आणि निवेदक म्हणूनही ओळखलं जातं. याशिवाय बीग बॉस मराठीमधील पुष्करच्या इनिंगला कोण विसरेल….
पुष्करचा जन्म पुण्याचा. त्याचे वडील डॉ. सुहास जोग हे प्राध्यापक तर आई सुरेखा, ही गृहिणी… घरात शिक्षणाला खूप महत्त्व… त्यात पुष्करचा ओढा लहानपणापासून अभिनयाकडे जास्त होता. त्याच्या या आवडीला घरी कोणी रोखलं नाही. फक्त अभिनय करायचा असेल तर शिक्षणाकडेही तेवढेच लक्ष दिले पाहिजे ही अट ठेवली. त्यामुळे पुष्करचं शिक्षण पूर्ण झालं. तो डॉक्टर झाला. त्याच्या भावानं अमोलनं, लंडन येथील बिझनेस स्कूलमधून एमबीए पदवी घेतली आहे. पुष्कर मात्र लहानपणापासून अभिनेता होण्याचे स्वप्न बघत होता. शाळेतील प्रत्येक स्नेहसंमेलनात त्याचा सहभाग असायचा. इतका की एकवर्षी चक्क त्याने लावणीही सादर केली होती. ती सुद्धा नऊवारी साडी आणि सगळा साजशृंगार करुन….
स्टेजवर वावरायची सवय असलेल्या पुष्करला बालकलाकार म्हणून चित्रपटात संधी मिळाली. वाजवू का, सुन लाडकी सासरची, साखरपुडा, सावसाहेब या मराठी चित्रपटात तो बालकलाकार म्हणून वावरला. तर हिंदीमध्येही त्याला बालकलाकार म्हणून संधी मिळाली. आजमाईश, ऐसी भी क्या जल्दी है आणि हम दोनो सारख्या चित्रपटात पुष्कर बालअभिनेता म्हणून चमकला.
महेश कोठारेंनी त्याला अभिनेता म्हणून पहिला ब्रेक दिला, तो जबरदस्त या चित्रपटामधून… त्यानंतर सत्या, मिशन पॉसिबल, धुम टू धमाल, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, राजू, शिखर, सासूचं स्वयंवर अशा चित्रपटांमधून पुष्कर मुख्य भूमिकेत आपल्याला दिसला. मराठी अभिनेत्यांना शक्यतो हिंदी चित्रपट लवकर मिळत नाहीत. मात्र पुष्करच्या बाबतीत हिंदी चित्रपट सृष्टीचे दरवाजे लवकर उघडले. त्यांनी ई एम आय, इटस् टू मच, डोंट वरी बी हैप्पी, गुडबडी गडबडी सारखे हिंदी चित्रपट केले.
मोठ्या पडद्यावर यशस्वी अभिनेता म्हणून ओळख झालेल्या पुष्करनं छोट्या पडद्यावरही आपली छाप पाडली आहे. तू तू मै मै, हद करदी आपने, रीन एक दोन तीन, जल्लोष सुवर्णयुगाचा, झुंज मराठमोळी, धुमशान, वचन दिले तू मला, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला यासारख्या मालिकांमधून पुष्कर घराघरात पोहचला. या सर्वात आणखी काही मराठी कार्यक्रमांनी त्याची आणि मराठी मनाची ओळख घट्ट केली. त्यामध्ये एबीपी माझा चॅनेलवर झालेला माझा अराऊंड द वर्ल्ड हा कार्यक्रम. पुष्करला देश विदेशात फिरण्याची आवड आहे. त्याने याच आपल्या आवडीचा उपयोग करुन या माहितीपूर्ण कार्यक्रमाची निर्मिती केली. या कार्यक्रमाचे दोन भाग झाले. आणि दोन्हीही भागांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. याशिवाय मराठी नच बलिये या कार्यक्रमात पुष्करने शाल्मली रानडेच्या साथीनं धम्माल नृत्य सादर केलं होतं. याशिवाय पुष्करचं आणि बीग बॉस मराठीचं नातं कसं विसरणार… सई लोकूर आणि पुष्कर यांची जोडी मराठी बीग बॉसमध्ये चांगलीच गाजली होती. या दोघांत काहीतरी आहे की काय, इतकी शंका पुष्करच्या वागण्यामुळं आली होती. पण पुष्करचा हा ड्रामा बीग बॉस पुरता मर्यादीत होता. त्याचे त्याच्या पत्नीवर आणि मुलीवर खूप प्रेम आहे. जसमीन ब्रह्मभट्ट या आपल्या बालमैत्रिणीबरोबर त्यानं लग्न केलं आहे. या दोघांना फेरीना नावाची मुलगी आहे. बीग बॉसच्या एका ब्रेकमध्ये जेव्हा या दोघी पुष्करला भेटायला आल्या तेव्हा पुष्कर हमसून रडत होता. हा हळवा पुष्कर तेव्हा चांगलाच चर्चेचा मुद्दा झाला होता. अर्थात तेव्हाच सई लोकूर बरोबर त्याचे नाव जोडले गेले होते, त्या चर्चांनाही पूर्णविराम लागला.
शक्यतो अभिनेता म्हणून कारकीर्द सुरु झाली की त्यातून ब्रेक घेण्याचा कोणीही विचार करत नाही. पण पुष्करनं मात्र हे धाडस केलं. आणि त्यात तो यशस्वीही झाला. अभिनेता म्हणून त्याची ओळख झाल्यावर त्यांने चक्क काही वर्षासाठी ब्रेक घेऊन दंतचिकित्सक म्हणून पदवी मिळवली. या पदवीनंतर बॅक टू पॅवेलियन म्हणत तो पुन्हा पडद्यावर झळकला. बालकलाकार म्हणून कारकिर्द सुरु केलेल्या पुष्करला उत्कृष्ठ बालकलाकार म्हणून राज्य पुरस्कार मिळाला आहे. तसेच शाहू मोडक आणि नर्गिस दत्त पुरस्कार मिळाले आहेत. अभिनयासोबत पुष्कर सामाजिक उपक्रमामध्येही सक्रीय असतो. नुकतेच त्याने डेअर टू केअर नावाचे स्वच्छतेसंदर्भातील कॅम्पेन राबवले होते.
अभिनेता, निर्माता, निवेदक म्हणून पुष्करची कारकीर्द बहरत आहे. त्याच्या या वाटचालीस कलाकृती मिडीयाच्या शुभेच्छा…