‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
माधुर्याची ३६ वर्षे
काही काही आकडे फसवे असतात…. खरं तर त्याकडे दुर्लक्ष करता आले तर बरेच असते. सचिन तेंडुलकरच्या शतकाची अनेकदा हमी असे, त्या शंभरीच्या मागच्या पुढच्या आकड्याना तसे आपण महत्व दिले नाही, आपण त्याने मैदानभर लगावलेले शैलीदार फटके आणि थेट स्टेडियममध्ये पाठवले षटकार यांचाच मनसोक्त मनमुराद आनंद घेतला. तेच एमडीबद्दल. अर्थात, माधुरी दीक्षितबद्दल. आजच्या ग्लोबल युगात नावाचा शाॅर्ट फाॅर्म करण्याची स्टाईल आहे म्हणून एमडी केले. पण ‘माधुरी दीक्षित ‘ असे नुसते म्हटलं तर अख्खं व्यक्तिमत्व आणि करियरचे प्रगती पुस्तक डोळ्यासमोर येते. आणि त्यात एक गोष्ट आहे, राजश्री प्राॅडक्सन्सच्या हीरेन नाग दिग्दर्शित ‘अबोध ‘ ( रिलीज १० ऑगस्ट १९८४) च्या प्रदर्शनास ३६ वर्षे झाली. आता माधुरीच्या गुणांचे मूल्यमापन या आकड्यांत करण्याची काहीही गरज नाही.
आजही ती आपल्या कायमस्वरुपी हास्याची जादू, आपला फिटनेस, ग्लॅमरस लूक, नृत्य साधना/शैली/क्षमता, मेहनती वृत्ती, व्यावसायिक अॅप्रोच, मिडिया फ्रेन्डली गुण, आणि महत्वाचे म्हणजे ग्लोबल युगानुसार स्वतःला अपडेट ठेवणे, स्वतःचं नृत्याचे असे यु ट्यूब चॅनल लोकप्रिय करणे आणि…. आणि या सर्वांसह आजही छान मराठीत बोलणं कायम ठेवलयं…. माधुरीचे किती पिक्चर सिल्व्हर ज्युबिली हिट झाले, किती फिल्मनी पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला, किती चित्रपट पडद्यावर आल्या आल्या पडले अशा संख्येत तिचे करियर मोजण्यापलिकडे बरेच काही सांगता येईल. आजच्या अनेक अभिनेत्रींची वये माधुरीच्या करियरच्या वयापेक्षाही कमी आहेत तरी माधुरी त्याच तारकांच्या युगातील म्हणून ओळखली जाते यासारखे यश नाही. तिच्या नंतर चित्रपटसृष्टीत आलेल्या अनेक अभिनेत्री चरित्र भूमिकांकडे वळल्या, काहींनी तर रुपेरी पडदा सोडला आणि आपल्या खाजगी आयुष्यात रमल्या. माधुरी मात्र ‘आजची नायिका ‘ म्हणून कार्यरत आहे, आपला ‘स्टारडम ‘, आपले अस्तित्व, आपले वलय टिकवून आहे.
मला आजही ‘अबोध ‘च्या प्रेस काॅन्फरसला कळत नकळतपणे उशिरा आलेली आणि येताच सर्वांना साॅरी म्हणाल्याची माधुरी आठवते. तेव्हा ती अंधेरीतील जे. बी. नगरमध्ये राह्यची आणि तेथून आपल्या आईबाबांसोबत मरीन ड्राईव्हवरील नटराज हाॅटेलमध्ये यायला तिला ट्रॅफिक जॅममुळे उशीर झाला होता. त्या काळात अशाही गोष्टीची फिल्मी बातमी होई, पण त्याकडे लक्ष द्यायचे नसते. राजश्री प्राॅडक्सन्सच्या वतीने त्या काळात आपल्या नवीन चित्रपटाच्या स्टार्सना एका टी पार्टीत मिडियाची भेट घडवून आणत. तेव्हा भेटलेली माधुरी अगदी शाळकरी वयातील वाटली, छान मराठीत बोलली. त्यानंतर ‘अबोध ‘च्या न्यू एक्सलसियरच्या मिनी थिएटरमधील प्रेस शोच्या वेळीही माधुरी आली होती. आपल्या पहिल्या चित्रपटाबाबत उत्सुकता असणारच ना?
एन. चंद्रा दिग्दर्शित ‘तेजाब ‘च्या नटराज स्टुडिओतील मुहूर्ताच्या वेळचीही माधुरी आठवतेय ( या मुहूर्ताचे आमंत्रण आजही माझ्या कलेक्शनमधे आहे). अमिताभ बच्चनच्या हस्ते हा मुहूर्त झाला आणि माधुरीला आपणास एक मोठी संधी मिळाल्याचा आनंद झाल्याचे तिच्या एकूणच देहबोलीत दिसत होते. काही महिन्यांनी एन. चंद्रा यांच्या आमंत्रणावरुन मेहबूब स्टुडिओत एक दो तीन चार पाच या धमाकेदार गाण्याच्या शूटिंग रिपोर्टीगला गेलो आणि नृत्य दिग्दर्शिका सरोज खानच्या सगळ्या नृत्य स्टेप्स ती ज्या पध्दतीने आत्मसात करुन अधिकाधिक मेहनतीने परफार्म देत होती तो अनुभव थक्क करणारा होता. माझ्या ‘बाॅलीवूड ‘ या पुस्तकात यावर मी स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे….
मी मिडियात असल्याने माधुरीच्या अनेक चित्रपटांच्या ( त्रिदेव, मुजरिम वगैरे) मुहूर्तांचे रिपोर्टीग करणे, त्यातील काही चित्रपट मुहूर्तालाच बंद पडणे ( अमिताभबरोबरचा टीनू आनंद दिग्दर्शित ‘शिनाख्त ‘चा आर. के. स्टुडिओतील मालगाडीच्या डब्याच्या सेटवरचे मुहूर्ताचे दृश्य आजही आठवले तरी अंगावर शहारे येतात, माधुरीचा हा चित्रपट पडद्यावर यायला हवा होता), तिच्या चित्रपटांच्या सेटवर शूटिंग रिपोर्टीगला जाणे ( निर्माते सुधाकर बोकाडे यांना आम्हा सिनेपत्रकाराना आवर्जून सेटवर बोलवायची हौस होती, त्यामुळे साजन, प्रहार यांच्या सेटवर जाणे झाले), काही फिल्मी पार्ट्यांतील तिची उपस्थिती ( सिनेमाच्या पार्ट्यांना माधुरी क्वचितच येताना दिसली, राजेन्द्रकुमारने आपल्या ‘फूल ‘ च्या पूर्णतेची पार्टी पाली हिलवरील आपल्या डिंपल बंगल्यावर दिली तेव्हाही आपल्या आईबाबांसोबत आलेली माधुरी फारशी न रेंगाळता निघाली हे आवडलं) अशी माधुरीची वाटचाल एक सिनेपत्रकार म्हणून अनुभवत पहात आलोय.
माझ्यासाठी हे सगळे सोनेरी क्षण आहेत. माधुरीच्याच शुभ हस्ते श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘आपली माणसं ‘चा मुहूर्त झाला ( नंतर त्याचे नाव ‘लपंडाव ‘ झाले) हेही अनुभवलय आणि १९९९ साली माधुरीने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जुहूच्या एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये चायनीज जेवणाची उशीरापर्यंत चालणारी अशी आम्हा सिनेपत्रकाराना आवर्जून पार्टी दिली तेव्हाच्या जेवणात तिची आपुलकीची भावना होती. माधुरी कायमच मिडिया फ्रेन्डली राहिलीय. मग ती ‘गजगामिनी’ची पार्टी असो अथवा ‘मृत्यूदंड’चे शूटिंग असो. आणि कायमच तिच्या सोबत तिचे आईबाबा असणारच.
त्या काळात गाण्याच्या शूटिंगच्या वेळी सेटवर मिडियाला बोलवातची छान पध्दत होती. डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘याराना ‘च्या गाण्याचे हैद्राबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओत शूटिंग असताना आम्ही काही सिनेपत्रकार सकाळच्या विमानाने हैद्राबादला उतरलो तेच थेट सेटवर गेलो. तेव्हा तिने राज बब्बरला नृत्यातून आव्हान देताना जी प्रचंड मेहनत घेतली आणि घाम गाळला तेच तिच्या यशाचे गमक आहे. ती एका दिवसात अथवा काही सुपर हिट चित्रपटांनी घडलेली नाही, तर ‘मेहनत, मेहनत, मेहनत ‘ हीच तिच्या यशाची त्रिसुत्री आहे. कोणत्याही प्रकारच्या वादात पडायचे नाही अथवा गप्प राह्यचे आणि आपल्या कामातून उत्तर द्यायचं छान कौशल्य तिच्याकडे आहे.
‘खलनायक ‘चे चोली के पीछे क्या है ऑडिओ कॅसेटवर आले तेच वादळ घेऊन, त्यावर टीकेची प्रचंड झोड उठली, बरेच काही लिहिलं गेले ( तेव्हा फक्त झी मनोरंजक वाहिनी होती. अन्यथा रोखठोक चर्चा रंगली असती), गाण्यावर बंदीची मागणी आली, या सगळ्यात माधुरी गप्प राहिली आणि जेव्हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा या गाण्याचे पडद्याभरचे नृत्य सौंदर्य/दृश्य सौंदर्य म्हणजे टीकाकाराना चोख उत्तर दिले होते. माधुरी दीक्षित म्हणजे आपल्या कर्तृत्वाने उत्तरं आणि उत्तम काम. म्हणूनच तर लग्नानंतर काही वर्षे अमेरिकेत राहून मग पती डाॅ. श्रीराम नेने आणि दोन मुलांसह बाॅलीवूडमध्ये परतली आणि छोट्या पडद्यावर अर्थात चॅनलवर रिअॅलिटी शोमध्ये आली, चित्रपटात परतली, ‘बकेट लिस्ट ‘ या मराठी चित्रपटात भूमिका साकारली, एव्हाना मिडियात बदल झाला होता, पूर्वी आम्ही सिनेपत्रकार सेटवर जाऊन अथवा तिचा सेक्रेटरी रिक्कू राकेशनाथ याच्यामार्फत अपाॅईनमेंट घेऊन माधुरीला भेटत असू, आता ती पध्दत बाजूला पडून पीआरओकडून एकामागोमाग मुलाखतीचे आयोजन करण्यात येऊ लागले, पण माधुरीने हा बदल स्वीकारला आणि न कंटाळा तिने सकारात्मक दृष्टिकोनातून छान मुलाखती दिल्या.
यालाच काळासोबत बदलणे आणि व्यावसायिक वृत्ती म्हणतात. अहो, आपल्या पहिल्या चित्रपटाला ३६ वर्षे होऊनही आपल्यावरचा ‘फोकस ‘ कायम ठेवता येणे हे सोपे अंकगणित अथवा बीजगणित नाही. तिने चित्रपट निर्मितीत पाऊल टाकताना ‘१५ ऑगस्ट ‘ या नावाचा चित्रपट निर्माण केला आणि महत्वाचे म्हणजे आजच्या ग्लोबल युगातील ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्थात तिसरा पडदा पध्दतीने रिलीज केला. ते करताना तिने आपल्या हौसेने मुंबईत ग्लॅमरस प्रीमियर शोदेखिल केला.
हिंदी चित्रपटसृष्टीतील नंबर वनची अभिनेत्री ही साऊथ इंडियन असते ( वैजयंतीमाला, हेमा मालिनी, श्रीदेवी) याला माधुरीने आपल्या चोख कर्तृत्वाने उत्तर देत आपली ओळख निर्माण केली आणि याचा महाराष्ट्रीय सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राला विलक्षण अभिमान वाटतो हे विशेषच आहे.
हा सगळा ट्रेलरच वाटावा अशी माधुरी दीक्षितची पुढची यशस्वी वाटचाल सुरु आहे, ‘धक धक गर्ल ‘ची प्रतिमा, ‘हम आपके है कौन ‘मधील ओपन बॅक चोलीचं ग्रेसफुली आकर्षक रुपडं, आणि ‘मै माधुरी दीक्षित बनना चाहती हू ‘ असे जगभरातील अनेक युवतींना वाटणारे स्वप्न आणि चक्क याच नावाचा आलेला चित्रपट….
माधुरी दीक्षित म्हणजे नाॅन स्टाॅप बरेच काही… तेदेखिल पहिल्या चित्रपटाच्या रिलीजला ३६ वर्षे होऊनही…. ग्रेट, ग्रेट, ग्रेट
– दिलीप ठाकूर