‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
नरम धरम…. धर्मेंद्र
खरं तर साठीच्या दशकात तो बहुदा आदर्शवादी सोबर व्यक्तिरेखा साकारायचा (देवर, अनुपमा, सत्यकाम, नया जमाना वगैरे चित्रपट). पण ओ. पी. रल्हनच्या ‘फूल और पत्थर’ (१९६६) मध्ये त्याने आपल्या उघड्या निधड्या पिळदार शरीरयष्टीचे दर्शन घडवले आणि मीनाकुमारीसोबतच्या तशा दृश्याचेच पोस्टर झाले आणि पब्लिकच्या नजरेतून धर्मेंद्र बदलत गेला. एक सुपर हिट चित्रपट बरेच काही घडवतो हो. तोच चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिला गेल्याने पडद्यावरची भूमिका मनात ठसत जाते. नासिर हुसेन दिग्दर्शित ‘यादों की बारात’ (१९७३) मधील त्याचा सूडनायक त्याला ‘ही मॅन’ अशी इमेज देणारा ठरला. हिंदी चित्रपट तेव्हा अॅक्शनपॅक्ड वळण घेत होता. फायटींगलाही अॅक्टींग लागते असे अमिताभ बच्चनचे फॅन्स जोरजोरात म्हणत आणि ते धर्मेंद्रलाही पूरक ठरत गेले…. मै तेरा खून पी जाऊंगा, कमीने कुत्ते मै तुझे जिंदा नही छोडूंगा, बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना अशा त्याच्या संवादांवर पब्लिक थिएटर असे काही डोक्यावर घेत की थिएटरचे छप्पर उडून जाईल की काय अशी भीती. म्हणूनच बहुदा जुन्या एक पडदा थिएटर अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सची अवस्था बिकट झाली असावी.
एकूण काय तर ‘गरम धरम’ अशी त्याची गडद होत गेलेली इमेज.
अशा ताकदवान, शक्तीवान माणसाच्या भेटीचा योग म्हणजे उगाच मनात भीती. (मध्यमवर्गीय संस्कारांचा पगडा अथवा परिणाम) पडद्यावरच्या प्रतिमेबाहेर तो थोडाच चित्कारणार? तो थोडाच कॅमेरासमोर होता?
ऐंशीच्या दशकात बरेच बडे स्टार आम्हा मोजक्याच ‘काही गिनेचुने’ मिडियावाल्याना फ्रेन्डली पार्टी देत. अशा ‘आतल्या वर्तुळातील आपणही असावे तर’ खुद्द तो स्टार अथवा त्याचा सेक्रेटरी आपल्या जवळचा हवा. तसे नसेल तर करायचा (त्या काळातील स्टारची डायरी पहायला एक सेक्रेटरी पुरेसा असे. आज अख्खी टीम असते, खरं तर ती भिंत झाली आहे).
अशाच अनेक ‘सिलेक्ट प्रेस पार्टी’ तील एक धरमची पार्टी. एका सकाळीच त्याच्या सेक्रेटरीचा फोन आणि भेटीचे कारण समजल्यापासून शाम होने का इंतजार. जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील एका छोट्या हॉलमध्ये शिरताच लक्षात आले की, धरम आज विशेष खुश असणार, प्रत्यक्ष भेटीत काही गप्पा होणार…. १९८९ सालची ही गोष्ट. धरम आल्या आल्या आम्हा प्रत्येकाला असा भेटला की जणू आपली खूपच जुनी ओळख आहे. पूर्वीच्या हिंदी फिल्मवाल्यांचा हा गुण मला कायमच आवडायचा. ‘भेटीचे क्षण’ ते आनंदाने साजरा करीत (त्यानंतर तीच ओळख कमी जण ‘कन्टीन्यू’ ठेवतात हे इतके मनाला लावून घ्यायचे नाही. उगाच त्रास होतो).
धरममधील सह्रदयता हाच या भेटीतील महत्वाचा गुण. त्यात कुठेही तो ‘मै खून पी जाऊंगा ‘ हा ताणा बाणा नव्हता. असेलच कसा? तो थोडाच एखाद्या सूडकथेचा नायक म्हणून वावरत होता? तो तर या छोट्याशा पार्टीचा यजमान होता. पाहुण्यांची काळजी कशी घ्यायची हे पक्के माहित असलेला. छान गप्पा करीत करीत आपल्या आगामी चित्रपटाची माहिती देणारा होता. ते काही लिहावे असा या ओल्या पार्टीचा हेतू नाही असे आपल्याला उगाच वाटत राहते. पण अशा गप्पांतून ‘बातमी’ मिळतेच. (ते झाल्यावरची पार्टी उत्तरोत्तर रंगत जाणारी, ती एक वेगळी आठवण.)
दिलीप ठाकूर