‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सेम टू सेम माधुरी….
माधुरी दीक्षित… हे नाव जरी ऐकलं तरी तमाम मराठी जनांचे कान टवकारतात. माधुरी म्हणजे मोहीनी… आज तिने वयाची पन्नाशी ओलांडली आहे. मात्र तिच्या वयाचा कधीच प्रश्न येणार नाही. आताही डान्सच्या एखाद्या शो मध्ये जज म्हणून भूमीका करतांना त्या स्पर्धकांपेक्षा जास्त भाव खाऊन जाते ती माधुरीच. दोन मुलांची आई असलेल्या माधुरीबद्दल सिनेरसीकांच्या मनात आपलेपणाची ओढ आहे. आपली माधुरी… एवढीच तिची ओळख पुरेशी पडते… तिचं सगळंच आपल्याला भावत. अगदी फॉर्म मध्ये असलेल्या आपल्या करिअरला रामराम ठोकून ती अमेरिकेतील एका डॉक्टरची पत्नी झाली. तिथे हाऊसवाईफ म्हणून रोल करु लागली…. तरीही तिच्या चाहत्यांमध्ये काही कमी झाली नाही. आणि काही वर्षांनी जेव्हा माधुरी आपल्या देशात… मुंबईत परत आली तेव्हाही… तेव्हाही, माधुरीची लोकप्रियता कमी झाली नव्हती…. उलट थोडी वाढलीच…. परत आल्यापासून माधुरी अध्ये मध्ये आपल्याला भेटत आहे. आपल्या दोन मुलांमध्ये तिचा जास्त वेळ जातो… असे असले तरी आता ही आपली माधुरी पुन्हा नव्यानं भेटायला आल्याचा भास रसिकांना होतोय…
नव्यानं म्हणजे… तिचा पहिला चित्रपट ‘अबोध’ आठवतोय का कुणाला… दोन वेण्यांमधली एकदम साधी भोळी मुलगी… माधुरीने तेव्हा नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्याचवेळी तिला या अबेधमध्ये अभिनेत्री म्हणून संधी मिळाली होती. हिंदी चित्रपटात झळकलेल्या या मराठी मुलीने अवघ्या बॉलीवूडचं लक्ष वेधून घेतलं…. आणि बघता बघता माधुरी ही मराठी आहे की हिंदी हा फरक बाजुला पडाला आणि माधुरीची ओळख फक्त अप्रतिम अभिनेत्री अशीच राहीली. माधुरीच्या या बॉलीवूडच्या प्रवेशाला आज काही वर्ष उलटून गेली आहेत. अर्थात माधुरीच्या चेह-यातील हा गोडवा आजही तसाच आहे. तिचे डोळे आजही तेवढेच बोलके आहेत… आणि कोणाला ती अबोधमधील माधुरी पुन्हा प्रत्यक्ष बघायची असेल तर माधुरीचा मोठा मुलगा अरेन याचा लुक नक्की बघायला हवा….
नुकताच माधुरीने सोशल मिडायावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिचा आणि तिच्या मोठ्या मुलाचा… अरेनचा… माधुरी एक इंग्रजी गाणं म्हणतेय… आणि अरेन आपल्या आईला पियानो वाजवून साथ देतोय… आय फॉर इंडीया… हे मिशन सध्या हाती घेण्यात आलं आहे. कोवीड 19 मुळे आलेलं आर्थिक संकट… आरोग्यासेवांवरील ताण… यासाठी या मिशनमधून फंड गोळा करण्यात येत आहे. फरहान अख्तर, विकी कौशल सारखे अभिनेतेही यात सामिल आहेत. या मिशनला प्रमोट करण्यासाठी माधुरीने अरेनच्या साथीने गाणं गायलं आहे…
या व्हिडोओमध्ये सुटबुटात पियानो वाजवणारा अरेन म्हणजे आपल्या आईची… माधुरीची सेम टू सेम कॉपी आहे. फरक असेल तर तो कुरळ्या केसांचा… 1999 मध्ये डॉक्टर नेने यांच्याबरोबर लग्न करुन माधुरी अमेरिकावासी झाली होती.. आपल्या सर्वांना हे माहितच आहे… पण ही धकधक गर्ल 2011 मध्ये आपल्या कुटुंबासह मुंबईत परतली. माधुरीला अरेन आणि रेयान अशी दोन मुलं आहेत. माधुरीला आपल्या मुलांना भारतीय संस्कृतीमध्ये मोठं करायचं होतं. त्यामुळे भारतात परत आल्याचं तिनं सांगितलं होतं. अर्थात अरेन आणि रेयान यांच्यासाठी आई म्हणून माधुरी नेहमी तत्पर असते. काही महिन्यापूर्वी सोशल मिडीयावर या माधुरीच्या दोन लेकांचा तबला वाजवतांनाचा व्हिडोओही असाच पुढे आला होता. त्यानंतर समजले की माधुरी आपल्या दोन्हीही मुलांना संगिताचे शिक्षण देण्यासाठी आग्रही आहे. तिची दोन्ही मुलं तबलावादक कालिदास यांच्याकडे तबला वाजवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. काही महिन्यापूर्वी मुंबईच्या भवन्स कॉलेजमध्ये एक कार्यक्रम झाला होता. त्यात अरेन आणि रेयान तबला वाजवतांना दिसले होते. या कार्यक्रमाला माधुरी आणि डॉक्टर नेनेही हजर होते.
आता या लॉकडाऊनच्या काळात माधुरीही आपल्या कुटुंबासह वेळ घालवतेय… त्यात तिचा मोठा मुलगा अरेन आणि ती एकत्र सराव करतांना दिसतात. अरेन तबला वाजवतोय तर माधुरी आपला कथ्थकचा रियाज करतेय… यातही हा माधुरीचा मुलगा आपल्या आईच्या सुरुवातीच्या लुकची आठवण करुन देतोय… कुरळ्या केसांच्या या अरेनचा लुक सध्या चांगलाच पसंत केला जातोय… काही दिवसातच त्याचा पियानो वाजवतांनाच्या व्हिडीओला लाखाच्या वर लोकांनी पसंती दिली आहे… त्यात तर कॉलेजमध्ये जाणारी माधुरीलाच पाहिल्याचा भास होतोय… अरेन आपल्या आईपेक्षा उंच आहे. पण हे दोघे मायलेक अगदी सारखे दिसतात. शेवटी आपल्याकडे म्हणतात ना… मातृमुखी सदा सुखी… अरेनला त्याच्या आईची चेहरापट्टी लाभली आहे. त्यामुळे माधुरीचे चाहते नेहमी त्याला पहिली पसंती देतील हे नक्की….
सई बने