‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
प्रिय माधुरी
प्रिय माधुरी
खरं तर आपल्या वयातलं अंतर, तुझं वलय, तुझं काम हे सगळं जरी पक्कं माहित असलं, तरी ‘ए माधुरी’ म्हणण्याचा अधिकार आहेच तुझ्या चाहत्यांना, म्हणूनच मलाही. तुझी सगळ्यात पहिली पाहिलेली फिल्म म्हणजे ‘हम आप के है कौन’. तुझं मधाळ हसणं, दिलखुलास बागडणं, खट्याळपणा, नाचातली ग्रेस या सगळ्या अदांनी अक्षरशः वेड लावलं आणि एखाद्याचं जबरदस्त फॅन असणं म्हणजे काय ते तेव्हा वयाच्या दहाव्या वर्षी अनुभवलं. तुझ्या जागी दुस-या कुणाची कल्पना करुच शकत नाही. तेव्हा मी लहान होते, त्यामुळे तू मराठी आहेस ही माहिती आईनेच मला पुरवली, तेव्हा कसलं भारी वाटलं माहितेय. मग तर मी नाच आणि नाटक चांगलंच मनावर घेतलं. आणि शाळा काॅलेज, सोसायटीमध्ये (अगदी आरशासमोरही) नाटकात आणि क्वचित नाचातही भान हरपताना तुलाच डोळ्यासमोर ठेवलं होतं मी. माझ्यातल्या किंचित कलेची पहिली प्रेरणा तूच आहेस माधुरी.
तुझे बाकीचे चित्रपट नंतर पाहिले- दिल, बेटा, राजा, साजन, अंजाम, DTPH… साजन खूप आवडला आणि DTPH ची पारायणं केली. तुझ्या हसण्याइतकेच तुझे हावभाव आवडले, संवादफेक आवडली, नाजूक कशिदा काढावा तसा नाचाला असलेला ‘माधुरी टच’ कमालीचा भावला. तू शिकवलेल्या स्टेप्स करतेस, असं कधीच वाटलं नाही, आतून येतं आणि उत्स्फूर्त नाचतेस असं वाटतं. तुझी नक्कल अनेकींनी केली, पण साक्षात मधुबालाची उपमा देऊनही तू तुझ्या पद्धतीने काम केलंस आणि स्वतःचं स्थान निर्माण केलंस.
मग साहजिकच तू मोठी दिसू लागलीस, लग्न केलंस, चित्रपटांची निवड चुकत गेली, नवीन तारका चमकू लागल्या. थोडं वाईटही वाटायला लागलं. आणि इकडे मलाही थोडी समज आल्याने स्वप्नाळूपणाही कमी झाला आणि तुझ्या प्रेमपटांची पारायणं कमी केली. पण तू DTPH पर्यंत कमावलेलं वलय जराही कमी झालं नाही, अगदी आजही नाही. काही चित्रपट, जाहिराती, पुरस्कार सोहळा, रिअॅलिटी शो..सगळीकडे तू आजही दिसतेस. तुझा चित्रपट सुपर हिट होण्याची आता खात्री नसते. वेगळा असण्याची शक्यताही नसते. आमीर खान किंवा विद्या बालनसारखी त्या बाबतीत तू हुशार नाहीस. नूतन – स्मिता पाटीलसारखी कसलेली अभिनेत्री नाहीस, हेही लक्षात येतंय आता. बकेट लिस्ट ने तर पार निराशाच झाली. पण तरीही आजही तुझी तेवढीच फॅन आहे. तुझ्यावरच्या प्रेमापोटीच ड्रीमगर्ल्स- मधुबाला ते माधुरी कार्यक्रम सादर केला होता. तुझ्यासाठी चित्रपटाला गर्दी होईलच अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. आजचा ऑडिअन्स जाणकार आहे. तुझ्या या मर्यादा तुलाही माहित आहेत. पण म्हणून तू थांबली नाहीस. तुझा वावर आजही लोभस वाटतो. ग्रेस कायम आहे. हसणं तितकंच मधाळ आहे. माधुर्य सदाबहार आहे याची जाणीव ठेऊन छोटा पडदा, पुरस्कार सोहळे इथे तू भाव खाऊन जातेस. इंटरव्हयू मध्ये तुला ऐकताना पाॅझिटिव्ह एनर्जी मिळते. पन्नाशीच्या नंतरही तुझा सळसळता उत्साह मनाला चैतन्य देतो. काम तू थांबवलं नाहीसच. परीक्षक म्हणून, निर्माती म्हणून बिझी असतेस. सगळ्यात आवडलेली तुझी संकल्पना म्हणजे डान्स विथ माधुरी. आज घरबसल्या कितीजण स्वतःची नाचाची हौस तुझ्यामुळे भागवतात. नाचायला शिकायचं तेही डान्सिंग क्वीन माधुरीकडून ही कल्पनाच भन्नाट आहे. आज बाकीच्या हिराॅईनचे नवरे आम्हाला माहित नाहीत. पण माधुरी-श्रीराम जोडी हिट आहे. आणि तुझं आकर्षण जराही कमी नाही झालं त्यामुळे. शेवटी एवढंच म्हणायचंय –
तुझ्याविना आहे
चित्रसृष्टी अधुरी
लाख दिलोंकी धडकन तू
धकधक गर्ल माधुरी
HAPPY BIRTHDAY
ऋचा इंद्रनील(थत्ते)