‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
पाकिस्तानला माघार घ्यायला लावणारे आपले पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ.
भारतीय लष्कराचा जगभरात दबदबा निर्माण करण्यामध्ये एक नाव महत्त्वाचे आहे. ते म्हणजे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचे. माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारीत सॅम या चित्रपटाबाबत आता उत्सुकता अधिक वाढली गेली आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात माणिकशॉ यांच्या भूमिकेत विकी कौशल आहे. मेघनानं माणिकशॉ यांना आदरांजली वाहण्यासाठी नुकताच एक व्हीडीओ शेअर केला आहे.
१९७१ मध्ये बांग्लादेश मुक्तीसाठी झालेल्या संग्रामात पाकिस्तानला माघार घ्यायला लावणारे आपले पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यावर चित्रपटाची घोषणा मेघना गुलजार यांनी मागच्या वर्षी केली होती. त्यावेळी त्यांनी विकी कौशल याचा माणेकशॉ यांच्या लूकमधील फोटोही व्हायरल केला होता. यात विकीच्या लूकचे खूप कौतुक झाले होते. मेघना सोबत विकीने आधी राझी हा चित्रपट केला आहे. त्यातही तो लष्करी अधिका-याच्या भूमिकेत होता. उरी दि सर्जिकल स्ट्राईक मध्ये विकी कौशलनं केलेला दमदार अभिनयही कायम लक्षात रहाणारा आहे. त्यामुळे मेघना गुलजार यांनी विकीची निवड सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेसाठी केली. रणवीर सिंगही या भूमिकेसाठी उत्सुक होता, पण मेघनाची पहिली पसंती विकीच्या नावाला होती. विकी, शुजीत सरकार यांच्या उधम सिंग या चित्रपटामध्ये बिझी होता. त्यानंतर मेघना सॅमचं शूट चालू करणार होत्या. पण आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या चित्रपटाचे शुटींग 2021 मध्ये चालू करणार असल्याचे जाहीर केले आहे.
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी एक व्हिडिओ शेअर करुन त्यांना आदरांजली वाहिली. त्यानिमित्त मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या पराक्रमाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. विकी कौशलही माणेकशॉ यांची भूमिका करायाला मिळाल्यामुळे भारावला आहे. पंजाबी असलेल्या विकीच्या आई – वडीलांनी दुसरे महायुद्ध अनुभवले आहे. त्यात सॅम यांची भूमिका महत्त्वाची होती. युद्धातील त्यांच्या पराक्रमाची गोष्ट विकीच्या आईनं त्याला लहानपणी अनेकवेळा सांगितली आहे. अशा महान व्यक्तीची भूमिका करायला मिळाल्यानं विकी स्वतःला भाग्यवान समजतो. भारतीय लष्करात फिल्ड मार्शल हा सर्वोच्च सन्मान मिळविणारे माणेकशॉ हे पहिले अधिकारी होते. तीन एप्रिल १९१४ रोजी अमृतसर मध्ये पारशी कुटंबात जन्मलेले माणिकशॉ डॉक्टर होण्याची स्वप्न बघत होते. त्यासाठी त्यांना परदेशात जायचं होतं. त्यांचे दोन भाऊही परदेशात शिक्षण घेत होते. पण त्यांच्या वडीलांनी वय लहान आहे, आता नको म्हणून, माणेकशॉ यांना परदेशात जाण्यापासून रोखलं. याचा राग येऊन सॅम यांनी लष्कर भरतीचा फॉर्म भरला आणि त्यांची निवडही झाली. मेरीटमध्ये ते सहाव्या स्थानी होते. सॅम हे अनेक घडामोडींचे साक्षिदार आहेत. सॅम बहादूर या नावानेही ते परिचित होते. दुस-या विश्वयुद्धात लढतांना त्यांना एक नाही, दोन नाही तब्बल सात गोळ्या लागल्या होत्या. बर्मा मध्ये ब्रिटीश आर्मीकडून ते लढत होते. त्यांना तात्काळ लष्कराच्या तळावर नेण्यात आलं. तिथे ऑस्ट्रेलियन डॉक्टर होते. त्यांनी सॅम यांची अवस्था पाहून उपचार करायला नकार दिला. पण सॅम सात गोळ्या खाऊनही शुद्धीत होते. त्यांनी त्या डॉक्टरांबरोबर त्याही अवस्थेत गम्मत केली. मला एका गाढवाने लाथ मारली, असे उत्तर दिले. त्यांच्या या वाक्याने रिलॅक्स झालेल्या डॉक्टरांनी त्यांचे ऑपरेशन केले आणि शरीरातील सात गोळ्या काढल्या.
माणेकशॉ यांच्या दिलखुलासपणाचे असे अनेक किस्से आहेत. माणेकशॉ यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत दुसरे महायुद्ध, पाकिस्तानविरुद्धची युद्धे आणि चीनसोबत १९६२ साली झालेल्या युद्धांमध्ये सहभाग घेतला. १९७२ मध्ये त्यांचा राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी पद्मभूषण सन्मानाने गौरव केला. तसेच पद्मविभूषण, फिल्ड मार्शल असे सन्मानही त्यांना मिळाले. हजरजबाबी आणि निडर असलेले सॅम माणेकशॉ आपल्या कडक शिस्तीसाठीही प्रसिद्ध होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही त्यांची लष्करी शिस्त पाळावी लागली होती. सॅम यांचा रुबाबदार चेहरा आणि त्यावर पिळदार मिशा… याचा धाक सैन्याला होता. पण त्यासोबत चेह-यावर असणारं हसू त्यांच्या दिलदार स्वभावाचं सूचक होतं. नेमका हाच लूक विकी कौशलनं परफेक्ट पकडलाय. भारतीय लष्कराचा पोशाख, तोंडावरील स्मितहास्य आणि भरदास्त, पिळदार मिशा हा विकाचा लूक त्याच्या चाहत्यांना भावला आहे.
सॅम चित्रपटात १९७१ सालच्या युद्धाचा काळ दर्शविला जाणार आहे. सैनिकांचं जीवन, राजकीय कांगोरे त्यात दाखवण्यात येणार आहेत. या भूमिकेसाठी विकी खूप परिश्रम करतोय. अगदी जिममध्येही काही खास कसरती करतोय. मशालपासून विकीनं आपल्या करीअरला सुरुवात केली. विकीनं नेहमी असे वेगळे चित्रपट केलेत. उरी दि सर्जिकल स्ट्राईकमध्ये त्याची भूमिका बघून अनेक तरुणांना स्फुर्ती मिळाली आहे. शुजीत सरकार यांचा उधम सिंगही याच वेगळ्या वाटेवरचा खास असाच असणार आहे. त्यातील विकीच्या लूकचीही अशीच चर्चा आहे.
सॅम आणि उधम सिंग दोन्हीही चित्रपट पुढच्या वर्षी पहायला मिळणार आहेत. तोपर्यंत या चित्रपटांच्या ट्रेलरवर समाधान मानावे लागणार आहे.