असं घडलं नटसम्राट मधील हे गाणं…
आपल्या महाविद्यालयीन जीवनात सहज म्हणून बांधलेली एखादी चाल भविष्यात एखाद्या उत्कृष्ट चित्रपटात यशस्वी ठरू शकते. असं घडलं ‘नटसम्राट’ या चित्रपटातील ‘नात्यास नाव आपुल्या’ या गाण्याच्या बाबतीत. ‘नटसम्राट’ चित्रपटाचा संगीतकार अजित परब आहे. कॉलेजला असताना अजित परब, कौशल इनामदार, कमलेश भडकमकर, भूपाल पणशीकर असा त्यांचा ग्रुप होता.
कौशलने अनेक प्रसिद्ध कवींच्या कवितांना चाल देऊन त्या गीतांचा ‘अमृताचा वसा’ नावाचा कार्यक्रम सुरु केला होता. त्यात अजित परब गायक होता. पण त्या ग्रुपमुळे प्रत्येकालाच मराठी कवितांना चाल देण्याचा एक छंद जडला होता. एकदा अजित परबने ‘कुसुमाग्रज’ यांच्या ‘नात्यास नाव आपुल्या’ या कवितेला चाल दिली होती. कमलेश आणि भूपाल ने सुद्धा काही कविता स्वरबद्ध केल्या होत्या.
अजितने ‘नात्यास नाव आपुल्या’ या कवितेला दिलेली चाल कौशल आणि सर्वांनाच आवडली होती. प्रतिभा दामले हिच्या आवाजात ते गीत ध्वनिमुद्रित केले होते. ते साल होते १९९६-९७. भविष्यात ते गाणे पुन्हा कधी कुठे वापरता येईल, असा काही तेव्हा विचार नव्हता. २०१५ साली ‘नटसम्राट’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. अजित परब या चित्रपटाचा संगीतकार होता.
एकदा नाना पाटेकर शूटिंगच्या वेळी त्याला म्हणाले, “तू स्वतः पूर्वी एखादी केलेली चाल ऐकव ना.”
अजितला कुसुमाग्रजांची
“नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्याची जगतास जाण नाही”
ही कविता आणि त्याने दिलेली चाल आठवली. अजितने ती चाल ऐकवली. ‘नटसम्राट’ चित्रपट अर्थातच कुसुमाग्रजांच्या म्हणजेच वि. वा. शिरवाडकरांच्या नाटकाचं माध्यमांतर होतं. त्या चित्रपटासाठी गाणी करताना शिरवाडकरांचीच कविता आठवणे हा एक विलक्षण योगायोग म्हणायला हवा. नाना पाटेकर आणि महेश मांजरेकर यांच्यासह सर्वांनाच ती चाल आवडली. ते गीत चित्रपटात घ्यायचे ठरले.
संगीतकार या नात्याने अजितने फरक इतकाच केला की १९९६-९७ साली त्याने हे गीत दादऱ्यामध्ये बांधले होते. चित्रपटासाठी त्याने हे गीत स्वरबद्ध करताना केरव्याचा वापर केला. हे गीत विभावरी आपटे यांच्या स्वरात ध्वनिमुद्रित झाले. मुळात विभावरी आपटे यांच्या स्वरात अतिशय निरागसता, शुद्धता, साधेपणा आणि प्रगल्भता आहे आणि त्यामुळे विभावरी आपटे यांनी हे गीत गावे असे ठरले. या गाण्याचे चित्रण पाहिले की तुम्हाला लक्षात येईल की या गाण्यात चित्रपटातील वेगवेगळे प्रसंग दिसतात.
१९९६-९७ साली स्वरबद्ध केलेले कुसुमाग्रजांचे गीत २०१५ साली त्यांच्याच कथानकावर आधारित ‘नटसम्राट’ साठी पुन्हा रेकॉर्ड होणे, हे त्या गाण्याचे भाग्य म्हटले पाहिजे. या गीतासाठी संगीतकार अजित परब याचे खूप कौतुक झाले. मुख्य म्हणजे अनेकांनी त्याला सांगितले की हे गीत ऐकताना संगीतकार श्रीनिवास खळे यांची आठवण झाली. हा अजितला मिळालेला उत्तम अभिप्राय होता. हे गीत खरोखरच आपल्याला १९६० -७० च्या दशकातील काळाची आठवण करून देते. संगीतातील मेलडी पुन्हा या गीताने अनुभवायला मिळते.