‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
ताई माझी लाडाची गं!
मालिका क्षेत्रात अल्पावधीत प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. इंजिनियर असून आपल्या ताईप्रमाणे अभिनय क्षेत्रात वेगळा ठसा उमटविलेल्या गौतमीने आपली मोठी बहीण मृण्मयी देशपांडे आणि तिच्या नात्याविषयी मारलेल्या गप्पा.
१. तुझं आणि ताईचं नातं कसं आहे ?
मला असं वाटतं की बहीण या एका नात्यात अनेक नाती सामावलेली असतात. त्याचप्रमाणे ताईचं आणि माझं नातं परिस्थितीनुरूप बदलत राहतात. कधी भाऊ-बहीण, कधी आई-मुलगी, कधी घट्ट मैत्रिणी असं आमचं नातं आहे. मला जेव्हा ज्या नात्याची गरज भासते त्याप्रमाणे ती माझ्यासाठी खंबीरपणे ते नातं निभावत असते.
२. अभिनय क्षेत्रात यायचं आधीपासून ठरवलं होतंस की ताईचं बघून यावंस वाटलं ?
नाही. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. चार वर्ष मी नामांकित कंपनीमध्ये नोकरी केली. जेव्हा मला मनातून वाटलं की आता अभिनय क्षेत्रात प्रयत्न करून बघावं तेव्हा मी सुरूवात केली. ताईने जेव्हा मी नोकरी करत होते तेव्हाही आणि या क्षेत्रात येऊन नशीब आजमवण्याच्या निर्णयाचही स्वागत केलं. ती कायम मला सांगत आली आहे की तुला ज्यात आनंद वाटतो ते तू कर.
३. तुझं पहिलं काम बघितल्यावर ताईची प्रतिक्रिया काय होती ?
ताईला मला टी.व्ही.वर बघून फारच आनंद झाला होता. तिला जेव्हा जमेल तेव्हा ती आवर्जून माझं काम बघते. तिला खूप आनंद होतो माझं काम बघताना. जेव्हा मला म.टा.चा अॅवॉर्ड मिळाला होता तेव्हा माझ्यापेक्षा जास्त खूश ती होती. मागे वेड्यासारखी आरडाओरडी करत ती नाचत होती. तिला इतकं आनंदात बघून मलाही खूप आनंद झाला होता.
४. अभिनयाबद्दल ताई काही सल्ले देते का ?
नाही. ती असे सतत डोस पाजत असते असं काही नाही. आमची विचार करण्याची पद्धत बरीचशी सारखी असल्याने माझ्या अभिनयात फार काही बदल तिला करावे असं वाटत नसाव. कुठलाही अभिनिवेश न आणता नैसर्गिकरीत्या काम करण्यावर आमच्या दोघींचाही भर असतो. ती तिच्या चेहरा आणि डोळ्यांमधून सगळ्यात पहिले अभिनय करते. तसाच करण्याचा मी प्रयत्न करते.
५. ताईबरोबर काम करायला आवडेल का ?
मला खूप आवडेल. पण मला तिच्याबरोबर काम करताना भितीदेखील वाटेल. तिला तिच्या कामाशी प्रतारणा केलेली आजिबात आवडत नाही. त्यामुळे आपण ज्या व्यक्तीला इतकी वर्ष आदर्श मानत आलोय अशा व्यक्तिबरोबर काम करताना मनात आदरयुक्त भिती नक्कीच असेल.
तुम्हाला हे पण आवडेल: ‘माझा होशील ना’ फेम अभिनेता विराजस कुलकर्णीशी गपशप
६. ताईच्या दिग्दर्शनाखाली काम करायला आवडेल का? असा काही प्रोजेक्ट येतोय का ?
मला नक्कीच आवडेल. ज्या दिवशी ताईला मला तिच्या सिनेमात घ्यावंसं वाटेल त्या दिवशी अभिनेत्री म्हणून मला थोडंफार यश मिळालय असं मी समजेन. मला असं कायम वाटत आलयं की ताई अभिनेत्रीपेक्षा काकणभर जास्त उत्तम दिग्दर्शिका आहे. तिच्या तालमीत मी चांगली पॉलीश होईल. त्यामुळे मी त्या दिवसाची वाट बघेन. तिच्या येऊ घातलेल्या एका प्रोजेक्टमध्ये माझी छोटीशी भूमिका आहे. त्यातूनही खूप काही शिकायला मिळालं.
७. ताईच्या लग्नानंतर तुमच्या नात्यामध्ये काही फरक पडला का ?
खरं तर नाही. कारण तिच्या लग्नाच्या दुसर्या दिवशी मी तिच्या सासरी तिच्याबरोबर राहायला आले. काम सुरू झाल्यानंतर तर मी जास्त तिच्याच घरी होते. त्यामुळे विरह असा खरं म्हणजे जाणवला नाही. स्वप्नील दादा आणि माझाही खूप छान बाँड तयार झाला आहे. तो सध्या ताईसमोर माझा ‘वकील’ म्हणून काम पाहतो.
रॅपिड फायर :
१. जास्त मस्तीखोर : ताई
२. ताईचं निकनेम : ताई किंवा तायडे
३. ताईने ठेवलेलं तुझं निकनेम : पिल्ला, गौतु आणि राग आल्यावर गौतमी
४. ताईच्या हातचा आवडता पदार्थ : आमटी, कोबीची भाजी
५. ताईचं तू गात असलेलं आवडतं गाणं : काली घटा छाया
– मुलाखत आणि शब्दांकन : गौरी भिडे