‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
शाहरुख खान : एक अभिनेता, एक प्राॅडक्ट
‘माय नेम इज खान’च्या पूर्वप्रसिध्दीला सुरुवात होत असतानाच आम्हा काही निवडक सिनेपत्रकाराना शाहरूख खानशी संवाद साधण्यासाठी वांद्र्याच्या बॅण्ड स्टॅन्डवरील ‘मन्नत’ बंगल्यावर बोलावले असता लिफ्टने वर गेलो ते एकदम मोठ मोठ्या शो केसमध्ये जड जड पुस्तके असलेल्या प्रशस्त रूममध्ये! आम्हा मोजक्या पाच सहा पत्रकारांना हे अगदीच अनपेक्षित होते. आम्ही एकमेकांशी नजरेने बोललो आणि अर्थातच त्या पुस्तकांवरुन गप्पाना सुरुवात झाली.
तो ‘सर्कस ‘, ‘फौजी ‘ या राष्ट्रीय दूरदर्शनवरच्या मालिकेत भूमिका करत असतानाच ‘अभिनेता’ म्हणून अनेकांना आवडत होता. तो छोट्या पडद्यावर असा अडकून पडणारा नाही हे त्याच्या त्याच मालिकेतील देहबोलीत जाणवत होते. त्याच्या मनातले जणू त्याच्या कामात दिसत होते.
आजही मला जुहूच्या एका पंचतारांकित हाॅटेलमधील राज कंवर दिग्दर्शित ‘दीवाना ‘ ( १९९२) चा मुहूर्त आठवतोय. शेखर कपूर, राहुल रवैल हेदेखील हजर होते. एसआरके आणि दिव्या भारतीने त्या मुहूर्त दृश्यातही रंग भरला आणि फोटो फ्लॅश झाल्यावर तो थेट आम्हा सिनेपत्रकारांजवळ आला. त्याची एकूणच देहबोली, एक्प्रेशन आणि बोलणे यावरुन तो कमालीचा फोकस्ड आहे हे जाणवले. खरं तर त्याने हेमा मालिनी दिग्दर्शित ‘दिल आशना है’ ( १९९३) साईन करत सिनेमात पाऊल टाकले. पण ‘दीवाना‘ ( १९९२) अगोदर रिलीज झाला. त्यातील एसआरकेचा परफार्म, लूक पन्नासच्या दशकातील दिलीपकुमारची आठवण करून देणारा असेच आम्ही समिक्षकांनी म्हटले. दिलीपकुमारची नक्कल करणारा अथवा जबरा प्रभाव असलेला एसआरके पहिला नव्हता ( अमिताभवरही तो बराच काळ जाणवायचा) तो एक वेगळा विषय आहे. आवश्यकता असते ती त्या प्रभावाबाहेर येत ‘आपलं काही ‘ दाखवणे आणि त्यासाठी सकारात्मक असावे लागते. चित्रपट माध्यमात तर ते अधिकच लागते. कारण, कॅमेरा जास्त प्रभावी असतो, बोलत असतो, दाखवत असतो. दीवाना, तसेच अब्बास मुस्तान दिग्दर्शित ‘बाजीगर‘ आणि यश चोप्रा दिग्दर्शित ‘डर ‘ या तीनहीतील त्याच्या नकारात्मक व्यक्तिरेखाना रसिकांनी अक्षरशः तुडुंब, तुफान म्हणतात असा रिस्पॉन्स दिला. एसआरके स्टार झाला. नेमक्या त्याच वेळेस हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या स्टार्सची पोझिशन कशी होती? मुकुल आनंद दिग्दर्शित ‘खुदा गवाह‘ ( १९९२) नंतर अमिताभने काही वर्षे सिनेमापासून लांब राहणे स्वीकारले होते ( आणि सिनेमासृष्टीत आॅडियो रिलीज वगैरेत तो हमखास दिसे.) तर मुंबई बाॅम्ब स्फोट प्रकरणात संजय दत्तला अटक ( मग सुटका व पुन्हा अटक, हे नव्वदच्या दशकात घडले) यामुळे त्याला सेटबॅक बसला.
अनिल कपूरचे यश चोप्रा दिग्दर्शित ‘लम्हे ‘, सतिश कौशिक दिग्दर्शित ‘रुप की रानी चोरों का राजा’, प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जिंदगी एक जुवा ‘ हे मोठे चित्रपट याच काळात पडद्यावर आले तेच पडले.
अजय देवगन, अक्षयकुमार, सुनील शेट्टी स्थिर होण्यासाठी धडपडत होते, सलमान, आमिर, सनी देओल यांचे ‘काही फ्लाॅप्स काही हिट’ असा खेळ सुरु होता.
अशातच करण अर्जुन इत्यादीतील एसआरकेचा स्क्रीन प्रेझेन्स रसिकांना आवडला. तरी यशराज फिल्मचा आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे‘ ( रिलीज २० ऑक्टोबर १९९५) इतका आणि असा जबरा हिट होईल असे वाटले नव्हते. जे काही असेल ते असो. यातील एसआरकेचा ‘राज‘ आणि काजोलची ‘सिमरन‘ अशी फ्रेश जोडी होती. आज जर आपण हिंदी चित्रपटाच्या एकूणच प्रवासावर ‘फोकस’ टाकायचा तर तो रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ पूर्वीचा आणि नंतरचा हिंदी चित्रपट असाच टाकताना ‘शोले’ ते ‘डीडीएलजे’ आणि नंतर दुसरा टप्पा असा टाकावा लागले. आपल्या देशात खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले होते आणि त्यात डीडीएलजे आला. तेव्हाच्या नवीन पिढीची भाषा बोलणारा, मानसिकता असणारा असा हा ग्लोबल युगातील रसिकांना आवडेल असाच रोमॅन्टीक चित्रपट असा काही सुपर हिट ठरला की एसआरके ‘सुपर स्टार’ झालाच, पण मग याच ‘राज ‘च्या प्रतिमेत तो अडकला. तीच भूमिका तो अधिकाधिक खुलवून साकारतोय असे यश चोप्रा दिग्दर्शित ‘दिल तो पागल है‘, करण जोहर दिग्दर्शित ‘कुछ कुछ होता है‘ आणि ‘कभी खुशी कभी गम‘, आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘मोहब्बते’ यात तो ‘राज ‘च दिसतोय. एव्हाना आपला व्यावसायिक मनोरंजक सिनेमा अतिशय चकाचक होत गेला, डीडीएलजेने हाच सिनेमा जगभरातील अधिकाधिक देशात रिलीज करण्याचे व्यावसायिक धोरण रुजवले त्याला उत्तम फळे येत होती.
हे वाचलेत का ? बीस साल बाद भी आजची स्टार ‘करीना’
एसआरके आता जगभरातील हिंदी चित्रपटाच्या फॅन्सचा हीरो झाला. या काळात तो शीमित अमिन दिग्दर्शित ‘चक दे इंडिया ‘ आणि आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेस ‘मध्ये ‘चाकोरीबाह्य ‘ होता हे दिग्दर्शकांचे यश. त्यांनी त्याच्यातील एसआरके सेटबाहेर ठेवला. अशा कमालीच्या आत्मकेंद्रीत अथवा ‘मै हूं ना’ मानसिकतेच्या स्टारची इमेज कॅश केली जाते. एसआरकेने पाठीमागे हाल फैलावलेच पाहिजेत, एकाद्या भावपूर्ण दृश्यात अडखळत बोलायलाच हवे, रोमॅन्टीक दृश्यात कमालीचे उत्कट असायलाच हवे, आपल्या पर्सनालीटीने संपूर्ण पडदा व्यापून टाकलाच पाहिजे ही समीकरणे हिट आणि फिट. यासाठीच त्याचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिले जाऊ लागले. अर्थात, काही चित्रपट पडलेही ( ते कोणालाच चुकत नाही) पण एसआरके स्थिर राहिला. या सगळ्यात एकीकडे तो रुपेरी पडद्यावरच्या आपल्या रोमॅन्टीक गाण्यात कमालीचा खुलू लागला. देव आनंद आणि राजेश खन्नाप्रमाणे त्याच्या व्यक्तिमत्वातच प्रेम प्रेम प्रेम आहे असे त्याच्या रोमॅन्टीक साॅग्जमध्ये दिसू लागले. असे करता करता तो कालांतराने अनेक चित्रपटांत ती व्यक्तिरेखा नव्हे तर शाहरूख खानच दिसू/भासू/ऐकू येऊ लागला.
मूळ शाहरूख खान कसा आहे याचा त्याचा त्यालाच विसर पडला असावा असे मग त्याचा प्रेस काॅन्फरन्समधील परफार्म असो ( होय, तो त्याचा एक प्रकारचा अभिनय असतो, एव्हाना मिडियात “वन टू वन” पध्दतीने मुलाखती घेणे इतिहासजमा झाले. चॅनलसाठी असेल तर एका दिवसात अधिकाधिक मुलाखती उरकल्या जाऊ लागल्या आणि प्रश्नांवर पीआरओचे लक्ष. तरी एसआरके दिलखुलास. आणि त्याची क्षमताही भारी), आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या मन्नतवर फॅन्सच्या होत असलेल्या अफाट गर्दीने तो सुखावतो हे पटकन दिसून येते ( याक्षणी मिडियात हवाच. तीन चार वर्षे ‘तोच तोच शो मी अनुभवला’ आणि आपल्या हाती केक येत नाही म्हणून जाणे कमी केले ) यशाने/कौतुकाने/गर्दीने/फॅन्सने/फाॅलोअर्सने सुखावणारा हा कार्पोरेट युगाचा हीरो आहे. एक प्रकारे त्याने आपले ब्रॅण्ड नेम एस्टॅब्लिज केलेच आणि दबदबाही. मोठ्याच बॅनरच्या चित्रपटात भूमिका साकारण्याच्या त्याच्या धोरणानेच ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ त्याने अखेरच्या क्षणी सोडला. (त्यात तो आहे अशा बातम्या सुरुवातीला प्रसिद्ध झाल्या होत्या) राजकुमार हिरानीच्या पहिल्याच चित्रपटात आपण भूमिका साकारणे त्याला व्यावसायिकदृष्ट्या योग्य वाटले नाही. याबाबत त्याने दिलीपकुमारप्रमाणे बडे दिग्दर्शक आणि मोजके चित्रपट असे धोरण व्यवस्थित आखले.
हेही वाचा : शाहरुखने ठेवलं होतं संगीतकारांना डांबून!
रेड चिली एन्टरटेन्मेन्ट अशी स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था काढून आपला व्यावसायिक बाणा वाढवला. आयपीएल टीमचा मालक बनणे, अनेक जाहिरातीत चमकणे, कौन बनेगा करोडपतीचा एक सिझन खेळवणे, अवाॅर्ड फंक्शनमध्ये तो बोलता बोलता अनेकांची टर उडवू लागला, हसत खेळत शाब्दिक कोटी करु लागला अशीही वाटचाल सुरु झाली. एसआरके सगळीकडे असेल/दिसेल/हवाच अशा पध्दतीने हे सगळे आकाराला येत गेले. हे एक प्रकारचे अतिदर्शन होते. पण एसआरके असाच असू शकतो असे काहीसे चित्र निर्माण झाले.
डीडीएलजे पंचवीस वर्षांचा होताना एसआरकेचेही वय वाढले आहे, या चित्रपटात तो जसा आहे, ते आता वयपरत्वे शक्य नाही. ते कोणालाच चुकत नाही. आता पुढे काय? दिलीपकुमारने सुभाष घई दिग्दर्शित ‘विधाता’, रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शक्ती ‘ अशा चित्रपटातून ‘करिअरचा दुसरा डाव’ सुरु करताना मध्यवर्ती चरित्र भूमिकाना स्वीकारले ते त्याच्या अनुभव, दर्जा, पोझिशन आणि अभिनय सामर्थ्य याना साजेसे होते. ‘तो दिलीपकुमार आहे’ याचे भान ठेवूनच ही खेळी सुरु झाली, त्यात काही चित्रपट जमले आणि हिट झाले आणि अर्थातच काही फसले. शाहरूखला ‘आपण शाहरूख खान आहोत ‘ हे विसरून नवा डाव मांडावा लागेल, नवीन पिढीच्या नवीन दृष्टिकोनातून या माध्यम व व्यवसायाकडे पाहत असलेल्या दिग्दर्शकांकडे भूमिका स्वीकाराव्या लागतील ( यशराज, धर्मा प्राॅडक्सन्स ही सेफ बॅनरकडूनही तो हे करुन घेऊ शकतो), तात्पर्य, करियरच्या या टप्प्यावर त्याने आजच्या बीग बीचा आदर्श ठेवावा. ते सोपे नाही, पण अशक्यही नाही.
आज हिंदी चित्रपट खूप खूप बदलतोय, अनेक छोट्या छोट्या गोष्टींवर चित्रपट येताहेत, ‘स्टार नव्हे तर व्यक्तिरेखा’ महत्वाची झाली आहे आणि अशा बदलांशी जुळवून घेण्यात व्यावसायिक शहाणपणा आहे.
मग टॅलेंट उपयोगी पडतेच. ते कुठे जात नाही. त्यासाठी शाहरूख खानला ‘मै हूं ना’ हे विसरावे लागेल. एका साबणाच्या जाहिरातीची लाॅन्चिंग पार्टी होती. त्यात त्याच्यासह चार अॅक्ट्रेस होत्या. स्टेजवरच्या परफार्ममध्ये अर्थातच एसआरके छा गया. याचे कारण म्हणजे त्याला आपल्यालाच प्रमोट करण्याचे गमक समजले होते….. डीडीएलजेला पंचवीस वर्षे पूर्ण होत असताना हे सर्व आवर्जून सांगावेसे वाटले. तो वेगळा आहे आणि तीच त्याची ताकद आहे. पण तो बदलणेही गरजेचे आहे. हिंदी चित्रपटसृष्टीवर त्याचे आपले ‘स्टार’ म्हणून राज्य आहे.