दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
मैदानात हुकली सिक्सर… पण अभिनयात मारला चौकार
आपल्या आजूबाजूला आपण अशी अनेक माणसं पाहतो की ज्यांना आयुष्यात करिअर वेगळ्याच क्षेत्रात करायचे असते पण प्रत्यक्षात ते वेगळ्याच क्षेत्रात काम करत असतात. कधी परिस्थितीमुळे कुणी आपल्या स्वप्नांना मुरड घालते तर कुणाच्या आयुष्यातील करिअरच्या वाटा अचानक असे काही वळण घेतात की आनंदाने नव्या क्षेत्राचा मार्ग निवडला जातो. सध्या टीव्हीविश्वातील आघाडीचा अभिनेता असलेला हर्षद अटकरी (Harshad Atkari) यानेही क्रिकेटच्या मैदानात सिक्सर मारायचे स्वप्न पाहिले होते, पण सध्या तो अभिनयातून छोट्या पडद्यावर सिक्सर मारत आहे. हे क्षेत्र त्याच्या मर्जीने निवडले असल्याचे तो आवर्जून सांगतो. असं काय झालं की त्याला मैदानातील क्रिकेटपेक्षा अभिनयाच्या पीचवर चौकार मारावेसे वाटले हे त्यानेच त्याच्या चाहत्यांना सांगितलं आहे.
मूळचा मुंबईचा असल्याने मैदानावर क्रिकेटच्या मॅच पहायला हर्षद नेहमी जायचा. भारतीय क्रिकेट संघात जे खेळाडू खेळले आहेत त्यांच्या मॅच हर्षदने मुंबईतील मैदानावर पाहिल्या आहेत. शिवाय त्याच्या शाळेतही क्रिकेट होतं त्यामुळे मोठं झाल्यावर क्रिकेटर बनायचं हे त्याने पक्कं ठरवलं होतं. तो शाळा, कॉलेजमध्ये क्रिकेटचा इतका वेडा होता की क्रिकेटशिवाय त्याला दुसरं काहीच सुचत नव्हतं. अगदी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात येईपर्यंत हर्षद क्रिकेटरच होणार हे त्याच्या मित्रांना आणि आईबाबांना वाटत होतं. मात्र एकदा मित्रासोबत नाटकाची तालीम बघायला हर्षद गेला आणि त्यानंतर त्याच्या करिअरची गाडीच बदलून गेली. हर्षद सांगतो, दोन अंकाचे एक नाटक बघून आपण दोन तासात उठतो पण ते नाटक बसवण्यासाठी कित्येक महिने मेहनत लागत असते. पाठांतर, नेपथ्यापासून ते नाटकाचा प्रयोग रंगणार का, प्रेक्षक येणार का अशा अनेक आव्हांनांना तोंड देत नाटक आकाराला येत असतं. त्यावेळी फक्त मला नाटक करणाऱ्यांविषयी कमालीचा आदर वाटला होता, पण मी नाटकात काम करेन असं वाटलं नव्ह्तं.
पुढे नाटकाची आवड असलेल्या मित्रांसोबत नाटकाच्या तालमींना, प्रयोगांना जाऊ लागलो तशी मला या क्षेत्राविषयी आवड निर्माण झाली. एका नाटकासाठी नट हवा होता तेव्हा माझ्या मित्राने मलाही ऑडीशन देणार का? असे विचारल्यानंतर माझ्याही नकळत मी तयार झालो. त्या भूमिकेसाठी निवडला गेलो. कॉलेजमध्येच असताना मी पहिल्यांदा रंगमंचावर उभा राहिलो. या माध्यमाची ताकद मला कळाली. मैदानात एक सिक्सर मारल्यानंतरही टाळ्यांचा गजर होत असतो आणि रंगभूमीवरील एका संवादालाही टाळ्यांचा कडकडाट होतो. पण दोन्ही टाळ्यांच्या आवाजात मला रंगभूमीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या आवाजाचं पारडं जास्त जड वाटलं. त्यानंतर मी ठरवलं की मला अभिनेताच व्हायचं आहे. कोणत्याही गोष्टीचं रितसर शिक्षण घ्यायला मला आवडतं. म्हणूनच अभिनयाचं प्रशिक्षण घेऊन मी या क्षेत्रात आलो.
हे देखील वाचा: कलाकार ऋषिकेश वांबुरकर याचा असा झाला अभिनयक्षेत्रात प्रवेश….
हर्षद ने मॅनेजमेंट स्टडीजमध्ये त्याचं शिक्षण पूर्ण केलं. दुर्वा या मालिकेसाठी हर्षदची निवड झाली ज्यामध्ये ऋता दुर्गुळे ही त्याची नायिका होती. राजकारणावर बेतलेल्या या मालिकेत हर्षदने एका निष्ठावंत कार्यकर्त्याची भूमिका केली होती. पहिल्याच संधीचं हर्षदने सोनं करत, क्रिकेटच्या मैदानावर हुकलेली सिक्सर छोट्या पडद्यावर मारली.
सध्या हर्षद ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत शुभमची भूमिका साकारत आहे. त्यापूर्वी ‘अंजली’ या मालिकेत त्याने डॉ. यशस्वी खानाेलकर ही भूमिका केली होती तर ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत त्याने शास्त्रीय गायक ही व्यक्तीरेखा साकारली होती. आजपर्यंत हर्षदने चार मालिका केल्या असून प्रत्येक भूमिका एका साध्या, शांत आणि संयमी युवकाची होती. पण प्रत्यक्षात मात्र हर्षद खूप मस्तीखोर आणि स्टायलीश आहे.
कधीकाळी क्रिकेटर बनून मैदानावर सिक्स, फोर मारण्याचे स्वप्न पाहणारा हर्षद आताही फटकेबाजी करत आहेच, माध्यम बदलले असले तरी त्याचा हा अंदाजही त्याच्या चाहत्यांना आवडत आहे.