अग्गबाई सासूबाई
अग्गबाई सासूबाई मध्ये सोहम हा खलनायक…त्याच्या आईच्या…आसावरीच्या नव्या संसारात हा मुलगा व्हीलन झालाय…आणि त्याच्या या कुटू नितिमुळे मालिकेचं टीआरपी वाढलंय..
अग्गबाईचा व्हिलन….
हा बघ…हा पार आगाऊ मुलगा आहे…कालपरवा आईचा फोन झाला, तेव्हा आई सांगत होती. मला नेमकं कळलं नाही आई कोणाबद्दल बोलतेय. मग समजलं, आई तिच्या लाडक्या मालिकेत डोकं घालून बसली होती…अग्गबाई सासूबाई…आईला निवेदिता सराफ खूप आवडतात. त्याला तिची दोन कारणं…एकतर त्यांचा सहज-सुंदर अभिनय, आणि दुसरं म्हणजे त्यांच्या नावापुढे लागणारं अशोक सराफ हे नाव…आई या दोघांचे बहुधा सर्वच चित्रपट पुन्हा पु्न्हा बघते. हिच तिची लाडकी अभिनेत्री अग्गबाईतून रोज भेटायला येते म्हटल्यावर तिची ती रोज चांगलीच भेट घेते…अगदी ब्रेकमध्ये सुद्धा उठत नाही….आता या करोनाब्रेकमध्ये अग्गोबाईचे भाग पुन्हा दाखवत आहेत, म्हटल्यावर आई हे सर्व भाग पुन्हा नव्यासारखे बघत आहे. झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. यातल्या आसावरीने अर्थात निवेदीता सराफ यांनी माझ्या आईसारखीच महिलावर्गाची मने जिंकली आहेत. दिग्दर्शक अजय मयेकर यांनी महिलावर्गाची नाळ अचूक पकडली आहे. आसावरीच्या नव-याचे अनेक वर्षापूर्वी निधन झालेले आहे. लहान मुलाला ती वाढवते. स्वभावाने कडक असलेल्या सास-याला न दुखवता सांभाळते…मी भली की माझं घर भलं…हे तिचं धोरण…आपण उत्तम स्वयंपाक करतो, याची तिला जाणीव आहे, पण या उत्तम कलेचं कोणी कौतुक करावं असा अट्टाहास नाही. मुलगा मोठा होतो. कमावता होतो. तो घरात पुरषी अहंकार जपतो. त्याला आसावरी रोखत नाही. त्याचा तो कमावता असल्याचा अहंकारही ती जपते.
आजोबा तर काय विचारु नका. एकदम कडक. त्यांना सगळं वेळच्या वेळी हवं. नाहीतर काही खरं नाही. ते सुनेवर हक्काने रागवतात…अगदी सर्वासमोर ओरडतातही…पण ही सून त्यांना काही उलट बोलत नाही. उलट हो…हो…करत त्यांचे सर्व म्हणणे मान्य करते….मग हा मुलगा घरात सून आणतो. ही सून आसावरीच्या आयुष्यात जादूची कांडी घेतलेली परी होऊन येते. तिला ती पहिल्यांदा स्त्री म्हणू सन्मान देते. जपते. तिच्या दुःखात सहभागी होते. सुखात काय सर्वच असतात. पण दुःखात जे सोबत असतात ते खरे आप्त असतात. मग ही सासू, त्या सुनेची होऊन जाते. दोघी मैत्रिणी होतात. या कथेत टि्वस्ट येतो तो अभिजीत राजे यांच्या रुपात…अभिज् किचनचा मालक…मालिकेत आसावरीच्या प्रेमात पडेपर्यंत तरी कुवॉंरा दाखवलेला…हॅ़डसम…श्रीमंत….हॉटेलचा मालक…मस्त मोठी बाईक चालवणारा अभी…महिलांना मोहात पाडणारा…हा अभी साध्याभोळ्या आसावरीचा होऊन जातो…कसला टर्निंग पॉईंट…अभीचं ठिक…त्याचं लग्न झालेलं नाही आहे, असं आतापर्यंत तरी आपण मानतो (पुढचं काय माहीत….). पण आसावरीचं काय…ती विधवा…एका मुलाची आई…आता तर सासूही झालीय…अशा बाईचं लग्न कसं शक्य आहे… पण येथेच दिग्दर्शकांनी मनं जिंकली आहेत. स्त्रीला भावना असतात…ही गोष्ट ब-याच वेळा लक्षात घेतली जात नाही…विधवा असली तरी तिला प्रेमात पडण्याचा अधिकार आहे. आयुष्याचा डाव पुन्हा नव्याने रंगवण्याचा अधिकार आहे, हे आजही कोण्याच्या फार पटकन पचनी पडत नाही…त्यात तिने पन्नाशी पार केली असेल तर बघायलाच नको…
या सर्व पराकोटीत कल्पना सत्यात उतरल्या त्या अग्गोबाई सासूबाईमध्ये…बरं सर्व कधी छान-छान होऊ शकत नाहीच…कोणीतरी व्हीलन हवा ना…इथेही आहे…तो दुसरा तिसरा कोणीही नसून आसावरीचा सख्खा मुलगा…सोहम…हा सोहम आईला कित्ती त्रास देतो ते विच्चारु नका…तिचे लग्न होऊ नये म्हणून किती बहाणे…मग तिच्या हनिमूनमध्ये काय जातो…तिचे पैसे कसे चोरतो…तिच्या नव्या संसारात कितीतरी लूडबूड करतो…कित्ती कित्ती ते विच्चारु नका…त्याचे आजोबा तर त्याला सोहम….कोंबडीच्या…इथपर्यंत बोलतात…पण हा भाऊ काही सुधारायचं नाव घेत नाही…उलट अजून खोलात जात आहे…त्यामुळेच आसावरीच्या चांगल्या चौकटीत हा सोहम एका त्रिकोणासारखा वाकडा बसलाय…आणि अनेकींच्या तो डोळ्यात खुपतोय…आपल्या सख्या आईला त्रास देतो म्हणजे काय…या गरीब स्वभावाच्या आसावरीमध्ये अनेकींनी स्वतःला शोधलंय…त्यामुळेच सोहमला शिव्या देणा-या महिलांची संख्या मोठी आहे…आणि यातच या मालिकेचं यश आहे…टिआरपी वाढतोय मालिकेचा…त्यामुळेच लगे रहो सोहमभाऊ…
फोटो आणि माहिती सौजन्य – झी मराठी
सई बने