मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
काय आहे ’दिन हैं सुहाना आज पहली तारीख है’…..
रेडिओ सिलोनने दोन गोष्टींचा पायंडा आजवर मोडला नाही एक म्हणजे दररोज सकाळी सात वाजून सत्तावन मिनिटांना लागणारे सैगलचे गीत आणि दर महिन्याच्या पहिल्या तारखेला लागणारे ’दिन हैं सुहाना आज पहली तारीख है’ हे किशोरकुमारचे गीत!
किशोरच्या या गीताचा किस्सा मनोरंजक आहे. हे गाणे ज्या सिनेमात होते तो सिनेमा मराठी कलावंत राजा नेने यांच्या प्रॉडक्शन हाऊसचा १९५४ साली आलेला ’पहली तारीख’ हा होता. सिनेमाचे दिग्दर्शक व नायक राजा नेने होते. सिनेमात हे गाणं हास्य कलाकार मारूती यांच्यावर चित्रित होणार होतं. पुण्याच्या डेक्कन स्टुडिओत या संपूर्ण सिनेमाचे शूटींग झाले होते. सिनेमाचे कथानक अगदी साधे सरळ होते. नोकरी करणार्या व्यक्तीच्या हातात एक तारखेला पगार पडतो पण महागाई, कुटुंबाचा भार, कर्ज यामुळे लगेच संपूनही जातो. पुन्हा सुरू होतो एक तारखेचा इंतजार. गीतकार कमर जलालाबादी यांनी सुरूवातीला हे गाणं गंभीरतेच्या वळणावर जाणारं लिहिलं होतं. पण किशोर कुमार यांनी या गाण्याला वेगळं वळण द्यावं असं सुचविलं. या कामी दादामुनी यांनीही गीतातील गंभीर भावना काढून त्या जागी खेळकर पणा आणायचा सल्ला दिला. गीतकाराने मग दोनही भावना ठेवत गाणं दोन भागात लिहिलं. एका भागात सिनेमातील नायक नायिकांची नाव जोडत (नर्गीस राजकपूर है, दिलीप कुमार है, निम्मी गीताबाली है, अशोककुमार है!) त्या काळातील पिढीवर सिनेमाचा असलेला प्रभाव दाखविला. दुसर्या भागात ’बंदा बेकार है किस्मत कि मार है…’ म्हणत याही भावना व्यक्त केल्या. किशोरने त्याच्या खास स्टाईल मध्ये गाणं गायलं व एका टेक मध्ये ध्वनीमुद्रीत ही झालं या गाण्याला संगीत होतं सुधीर फडके यांच! फडक्यांच्या एकूण संगीत प्रकृतीला छेद देणारं असं हे गाणं होतं. अशा लाईट मूडचे गाणे त्यांनी परत कधी केल्याचे दिसत नाही. हे गाणं आधी सी रामचंद्र यांनी गावं अशी इच्छा राजा नेनेंची होती पण ही कल्पना मागे पडली अशी आठवण राजा नेनेंची कन्या अनुपमा देशमुख (ज्यांनी या सिनेमात बाल कलाकाराची भूमिका केली होती) यांनी दिली.
आज ह्या गाण्याचा व्हिडीओ उपलब्ध नाही पण ऑडिओ च्या स्वरूपात ऐकायला देखील जबरा आहे!