सोनाली आणि कुलकर्णी – यश कशात असते? आत्मविश्वासात!
सिनेमाच्या जगात ‘नावातच सगळे काही असते’. देवसाहेब अर्थात देव आनंद, आमचा राजेश खन्ना यांची नावे घेताच त्यांची अख्खी पर्सनालीटी तर झालेच, करियरचे संपूर्ण प्रगती पुस्तक डोळ्यासमोर येतेच. हेमा मालिनी, रेखा तर झालेच पण ऐश्वर्या राॅय, कैतरिना कैफ या नावाच्या याच चित्रपटसृष्टीत दुसरे कोणी असेल अशी आपण कल्पनाच करू शकत नाही. आणि नकोतही. चित्रपटाच्या यशासह नावाला वलय आणि वळण येत जाते आणि मग ते नाव आणि तो स्टार वेगळा होऊच शकत नाही. एकरुपता येते.
अशा ‘रीयालिटि शो ‘मध्ये ‘सोनाली कुलकर्णी’ या नावाची ओळख डाॅ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘मुक्ता ‘ने भारताच्या १९९४ च्या जानेवारीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरमाचे मुंबईतील न्यू एक्सलसियर थिएटरमध्ये उदघाटन होण्यापूर्वीच्या भेटीत झाली हे आजही मला आठवतेय. जब्बार पटेल यांच्या चित्रपटाची नायिका यावर खरं तर वेगळा फोकस टाकायला हवा. सोनाली कुलकर्णीला मग ३० एप्रिलच्या राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आणि या नावाची ओळख गडद होत गेली.
आणि अशातच केदार शिंदे दिग्दर्शित ‘बकुळा नामदेव घोटाळे ‘(२००७) च्या ऑडिओ कॅसेट रिलीजचे आमंत्रण हाती आले असता भरत जाधव, सिध्दार्थ जाधव इत्यादींसह (पाहुणी कलाकार रेशम) सोनाली कुलकर्णी नाव वाचले तोपर्यंत ठीक होते, दादरच्या रानडे रोडवरील नक्षत्र माॅलच्या तळमजल्यावर पोहचलो तेव्हा वेगळी सोनाली कुलकर्णी दिसली. तोपर्यंतही ठीक होते. त्याच काळात हिंदीत जावेद खान नावाचा हीरोही होता आणि काॅमेडियनही आणि दोघेही नाव बदलायला तयार नव्हते याची कल्पना होती. नासिर हुसेन नावाचे मसालेदार धमाकेदार चित्रपटाचे दिग्दर्शक आणि त्याच नावाचे, पण त्याच नावाचे अतिशय सोशिक भूमिका साकारणारे चरित्र अभिनेते माहित होते. पण ‘एकाच नावाच्या दोन अभिनेत्री ‘हे जरा पचण्यास जड जात होते. बरं त्यातही पहिली एस्टॅब्लिज आणि प्रतिष्ठित. अशा वेळी नवीन सोनाली कुलकर्णीला तत्क्षणी काही सल्ला द्यावा असा मनात आलेला विचार मी सचिन तेंडुलकर बाहेर जाणारा चेंडू सोडून देत तो नेमका कुठे पडला तेथे जावून बॅटने जरासं ठाकठीक करतो जणू तसेच करत असतानाच कोणी तरी तिला म्हटलं, अग तू नाव बदल, दोन सोनाली कुलकर्णी एकाच क्षेत्रात योग्य दिसत नाही…. यावर सोनाली जे बोलली त्यापेक्षा तिची नजर आणि चेहरा जास्त बोलला. ‘मीही माझी ओळख निर्माण करेन, होय नक्कीच करेन ‘ असा निग्रह तिच्या चेहर्यावर होता. तो ‘क्लोजअप’ आजही माझ्या लक्षात आहे….
या सोनाली कुलकर्णीला(ही) स्वतःची ओळख, इमेज, फॅन्स, फाॅलोअर्स, प्रतिष्ठा आहे. मराठी चित्रपटसृष्टीत मोठी आणि छोटी अशा पध्दतीने या दोघींना ओळखले जाते. अगदी सुरुवातीच्या काळात ‘सेम टू सेम’ नावाने या दोघीनाही कसे कोणते बरे वाईट विचित्र अनुभव आले असतील हे तेच जाणोत. कदाचित, पहिल्या सोनालीची मुलाखत घेऊ इच्छिणाराने दुसरीची मुलाखत घेतली असेलही. काहीही घडू शकतं हो.
सोनाली कुलकर्णीला खरी ओळख रवि जाधव दिग्दर्शित ‘नटरंग’ (सेन्सॉर २००९) ने दिली. मुंबईतील मामी चित्रपट महोत्सवात ओशिवरा येथील फन रिपब्लिक (आताचे सिने पोलीस) येथील ‘नटरंग ‘चा शो संपून बाहेर पडलो, तोच समोर सोनाली भेटली. चित्रपट कसा वाटला याबद्दल तिला जाणून घेण्याची उत्सुकता असल्याचे तिच्या एकूणच लगबगीने लक्षात आले. ‘सिनेमा आवडला आणि तुझे कामही चांगले झाले आहे’ असे मी तिला म्हटले. ‘नटरंग ‘च्या यशाचा प्रवास तेथून सुरु झाला आणि तो १ जानेवारी २०१० रोजी रिलीज झाला आणि त्याने टेक ऑफ घेतला. पहिल्याच शोपासून वाजले की बारा, अप्सरा आली ही फक्कडबाज लावणी नृत्य, अतुल कुलकर्णीचा गुणवंतराव अर्थात गुणा कागलकर आणि सोनाली कुलकर्णीची नैना कोल्हापूरकरीण हे सगळेच एकदम हिट झाले. अमृता खानविलकरही वाजले की बारा नृत्यात छा गयी. सिनेमा पब्लिकने असा काही डोक्यावर घेतला की सगळीकडे त्याचीच चर्चा. आपल्या पब्लिकला पिक्चर आवडले रे आवडले की त्याना कोणी अडवू शकत नाहीत.
हा काळ थोडक्यात सांगायचे तर, मल्टीप्लेक्स युग स्थिरावत होते, वर्षभरात शंभरपेक्षा जास्त मराठी चित्रपट निर्माण होऊ लागले होते, युएफओ रिलीजने अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत मराठी चित्रपट पोहचत होता, उपग्रह वाहिन्या घराघरात पोहचल्या होत्या, सिनेपत्रकारितेने प्रमोशनचे वळण घेतले होते, इव्हेन्टसची संख्या वाढत वाढत गेली होती, अगदी विदेशातही मराठी चित्रपटसृष्टीचे ग्लॅमरस इव्हेन्टस होऊ लागले, आणि त्यात वाजले की बारा, अप्सरा आली तर मंगताच है असा फंडा झाला. सोशल मिडियाच्या आगमनाने मराठी सेलिब्रेटिजमध्ये फोटो सेशनबाबत सकारात्मक दृष्टिकोन, अगदी आवश्यक इतपत एक प्रकारचा बोल्डपणा आला होता. फॅशन फंडा आणि फिटनेस यांना महत्व येत होते.
सर्व बाजूंनी हिरवीगार आणि सुपीक जमीन असली तरी सोनालीला यशाचे सातत्य राखणं आवश्यक होते. एक तर चित्रपटाच्या विविधतेतून आणि मेहनतीतून ते शक्य असते. नशीब साथ देईल हे बोलण्यात असू शकते, महत्वाचे आहे करियरची आखणी आणि बांधणी. एकीकडे तिची अप्सरा आली देशविदेशातील इव्हेन्टसमध्ये भारी लोकप्रिय ठरली पण इतक्या प्रमाणात परफार्म करणे सोपे नसते. त्यासाठी जबरदस्त क्षमता आणि सातत्य हवे. सिनेमासाठी तुकड्या तुकड्यानी नृत्य करणे आणि संपूर्ण स्टेजचा वापर करुन अगणित प्रेक्षकांसमोर नृत्य करणे यात खूप फरक आहे. तो सोनालीने कळत नकळतपणे जपला आणि त्याच वेळेस तिने चित्रपटात कशी विविधता दिली आहे ते बघा. अजंठा, क्लासमेटस, मितवा, हम्पी, पोस्टर गर्ल, ती अॅण्ड ती, धुरळा, हिरकणी …. प्रत्येक चित्रपट एकमेकापेक्षा वेगळा आहे, त्यातील सोनाली वेगळी. (तिच्या सर्वच चित्रपटांची नावे द्यायची गरज नाही असे वाटते) चित्रपटाची संख्या नियंत्रणात आणत तिने हे साध्य केले. तिला हीच संख्या दुप्पट करता आली असती इतक्या प्रमाणात मराठी चित्रपट निर्मिती आहे आणि सोनालीला तशी ऑफरही आहे. पण थोडं सावकाश चाललो तर जास्त प्रवास होतो, आजूबाजूला कोणाचे काय चाललयं हे पाहता येते, त्यात छोट्या छोट्या गोष्टींचा भरभरून आनंद घेता येतो, अंतर्मुख होण्याची संधी मिळते याचे भान तिला आले. चोवीस तास तद्दन ‘स्टार’ म्हणून जगण्याला अर्थ नसतोच. तर काही निर्मात्यांनी तर तिचा होकार नसतानाही आपल्या चित्रपटाचा मुहूर्त केला हे मी अनुभवलयं. अशाच एका चित्रपटाच्या मुहूर्ताला ती भेटेल म्हणून जाणार तेव्हा तिच्याकडून समजले ती विदेशात आहे आणि या चित्रपटासाठी तिने हो म्हटलेले नाही. यशस्वी कलाकाराच्या वाटेला अशा अनेक नको त्या गोष्टी येतात. त्या हाताळतांना संयमाची कसोटी लागते. सोनालीने काही हिंदी चित्रपटातही लक्षात येतील पण लक्षात राहणार नाहीत अशा भूमिका केल्या. तिकडे तर होकार देऊनही कधी नकार का मिळतो कळत नाही. आणि मराठीत आपण ‘स्टार’ आहोत तर त्याचा आनंद घ्यावा. साकी नाकाजवळील एस. जे. स्टुडिओत ती एका म्युझिक शोसाठी गुण देत असताना सेटवर जाण्याचा योग आला असता ती त्याही कामात बारीकसारीक तपशील जाणून घेतेय हे पाहून तिच्या सक्सेस स्टोरीतील छोटी गोष्ट समजली.
सुरुवातीच्या काळात सोनालीला आम्हा सिनेपत्रकारांची नावे लक्षात राहत नसत हे एकदा माझ्या लक्षात आले. मला काहीसे आश्चर्य वाटले पण लक्षात आलं की आता मिडिया वाढत चाललाय, यासाठी आपण तिच्या लक्षात येऊ असे काही लिहूया. एका मराठी दैनिकाच्या रविवारच्या अंकात तसे लिहिले तेव्हा दिवसभरात तिचा काहीच रिस्पॉन्स आला नाही, पण संध्याकाळी तिने त्यावर अगदी तपशीलवार मते व्यक्त केली. तेव्हा ती नागपूरला होती हे आठवतेय.
असे करत करत तिच्या करियरला चक्क तेरा वर्षे पूर्ण झाली आणि एवढ्या प्रवासात ती अतिशय स्थिरपणे वाटचाल करतेय याचाच अर्थ ती आणखीन अधिकाधिक नियोजनपूर्वक वाटचाल करेल. दरम्यान ती लग्न करतेय ही तिची खाजगी गोष्ट आहे, मी संपूर्ण करियरमध्ये कोणत्याही कलाकाराला (मग तो पुरुष का असेना) तू लग्न कधी करणार असे विचारले नाही. असो. माधुरी दीक्षितच्या लग्नाच्या रिसेप्शनचे आमंत्रण होते म्हणून गेलो इतकेच.
सोनाली कुलकर्णी म्हणलं की दोघींचीही स्वतंत्र ओळख आणि व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतेच येत तर मग आणखीन काय हवे. खूप खूप शुभेच्छा….