‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
लूडो….चार रंगाचे प्रेक्षणीय चित्र
बर्फी, जग्गा जासूस, मेट्रो सारखे वेगळ्या धाटणीचे आणि दर्जेदार चित्रपट देणा-या अनुराग बसू यांचा याच रांगेतील नवा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. लुडो. अनुराग बसू कायम एका धाग्याला पकडून चित्रपट काढतात. लुडोमध्येही त्यांनी एक सुत्र ठेवलं आहे. हे आहे पाप-पुण्याचा हिशोब. प्रत्येकाची नजर वेगळी असते. त्यामुळे कोणाचे चांगले काम कोणाला वाईट वाटत असेल. या पापपुण्याचा सर्व हिशोब यमराज आणि चित्रगुप्त ठेवत असतात. हेच सूत्र घेऊन अनुराग बसू यांनी लुडो नावाचा चित्रपट केला आहे. यातील यमराजाची भूमिका खुद्द अनुराग बसु करत आहेत तर राहूल बग्गा चित्रगुप्ताच्या भूमिकेत आहेत. या दोघांचा आवडीचा खेळ आहे लुडो. लुडो खेळातील सोंगटीत जसे चार रंग असतात, तशाच चार छोट्या गोष्टी या चित्रपटात आहेत. लाल, हिरवा, निळा, पिवळा रंग जसा वेगळा असतो तशाच इथं चार मुख्य पात्र आहेत. आणि त्यांच्या प्रत्येकाची पार्श्वभूमी आहे. पण या सगळ्यांचा भविष्यकाळ हा एकमेकांच्यावर अवलंबून असतो. चार कथा, चार हिरो, त्यांची प्रेयसी. अन्य पात्र एवढं सगळं असूनही कंटाळा येत नाही. भेसळ वाटत नाही. हीच तर अनुराग बसू यांच्या दिग्दर्शनाची जादू आहे.
चित्रपटाची सुरुवात होते ती डॉन सत्तू भैय्या उर्फ राहूल सत्येंद्र त्रिपाठी(पंकज त्रिपाठी) यांच्यापासून. हा सत्तू भैय्या भिंडर या बिल्डरचा खून करतो. सत्तू भैयाला हा खून करतांना राहूल अवस्थी(रोहीत सराफ) या एका मॉल मध्ये काम करणा-या कर्मचा-यानं पाहिलेलं असतं. त्यामुळे सत्तू भैया आपल्या वॅनमध्ये राहूलला घेऊन पुढे जातो. याच वॅनमध्ये भानु(भानु उदय गोस्वामी) यांचं अपहरण करुन त्यालाही बंदी केलंलं असतं. हा भानु, आशा (आशा नेगी) चा पती आहे. भानुनं सत्तू डॉनकडून 90 लाख घेतलेले असतात. ते परत न केल्यामुळे त्याचे अपहरण झालं आहे. या भानूची पत्नी आशा हिचा पहिला नवरा बिट्टू (अभिषेक बच्चन) हा गुंड प्रवृत्तीचा आहे. सहा वर्षाच्या तुरुंगवासातून त्याची नुकतीच सुटका झाली आहे. या बिट्टूला अटक झाल्यावर आशा भानुबरोबर दुसरा विवाह करते. आशाला रुही नावाची मुलगी आहे. आशा तिला होस्टलमध्ये ठेवते. यासाठीचे पैसे भानू सत्तू डॉनकडून उधारीवर घेतो. ते परत न केल्यानं त्याचं अपहरण करण्यात येतं. आता भानुला सोडवण्यासाठी आशा बिट्टूकडे मदत मागते. शेवटी आपल्या पहिल्या बायकोला मदत करण्यासाठी बिट्टू डॉनच्या अड्ड्यावर जातो. इथे दुस-या कथेची सुरुवात होते.
आलोक कुमार गुप्ता उर्फ आलू (राजकुमर राव) मिथून चक्रवर्तीचा जबरदस्त फॅन आहे. मिथूनदांसारखे कपडे, केस, डान्स आणि बोलण्याची स्टाईलही तो कॉपी करतो. का..तर आलू, पिंकीवर (फातिमा सना शेख) प्रेम करत असतो. या पिंकीचा आवडता स्टार मिथूनदा असतो. पिकींचं लग्न मनोहर जैन (परितोष त्रिपाठी) याच्याबरोबर होतं. मनोहरचं प्रेम मात्र दुस-याच महिलेवर आहे. या मनोहरवर भिंडर बिल्डरच्या खूनाचा आरोप येतो आणि त्याला अटक होते. आपल्या पतीला सोडवण्यासाठी पिंकी आलूची मदत मागते. पिंकीच्या प्रेमात वेडा झालेला आलू तिची मागणी लगेच मान्य करतो. इथे अजून एक कथा चालू होते.
हे हि वाचा : रामसेतु…नवीन वाद…
श्रती चोक्सी (सान्या मल्होत्रा) एका श्रीमंत मुलाच्या शोधात असते. श्रीमंत मुलाबरोबर लग्न करुन आयुष्य सुखात घालवायचं एवढंच तिचं स्वप्न. या शोधात तिची ओळख डॉ.आकाश चौहान (आदित्य रॉय कपूर) बरोबर होते. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यांच्यात शारीरिक जवळीक होते. नेमका हा व्हिडीओ कुणीतरी इंटरनेटवर अपलोड करतो. यात श्रुतीचा चेहरा दिसत असल्यानं आकाश पोलीसात तक्रार करायला जातो. पण त्यासाठी श्रुती तयार होत नाही. म्हणून आकाश आपल्या वकील असलेल्या मोठ्या भावाला घेऊन सत्तू डॉनच्या अड्ड्यावर जातो. जेणेकरुन व्हिडीओ अपलोड करणा-याला शोधून त्याला धडा शिकवता येईल.
बिट्टू, आकाश आणि राहूल सत्तू डॉनच्या अड्ड्यावर एकाचवेळी जातात. पण तिथे नेमकी एक अशी घटना होते की त्यात खुद्द डॉनच जखमी होतो. मग सर्वजण आपापल्या परीनं समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात…हे करतांना एकमेकांना ओढण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाला लुडो प्रमाणं आपलं घर पहिल्यांदा गाठायचं असतं. ते काय करतात आणि कसं करतात…हे चित्रपटात बघण्यासारखं आहे.
अनुराग बसु यांचा चित्रपट म्हणजे उत्कृष्ठ पटकथा. तोच अनुभव लुडो बघतांना येतो. अनेक कलाकार असूनही कुठेही खिचडी झाल्याचा अनुभव येत नाही. प्रत्येक पात्राची एक जागा आहे, आणि अचूक कलाकारांच्या निवडीनं त्या कलाकारांनी ही जागा चांगल्या प्रकारे भरुन काढली आहे. चित्रपटाची कथा आणि त्यातील संवाद ही जमेची बाजू आहे. याबरोबरच राजकुमार राव, पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाची जुगलबंदी जबरदस्त आहे. सोबत अभिषेक बच्चन, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर, रोहीत सराफ यांचाही अभिनय तोडीसतोड आहे.
याशिवाय लुडोमधील गाणीही तेवढीच श्रवणीय आहे. भगवान दादांचा अलबेला चित्रपट आठवतोय. या चित्रपटातील किस्मत की हवा कभी गरम कभी नरम हे लोकप्रिय गाणं लुडोमध्ये वापरण्यात आलं आहे. प्रितम यांनी संगीत दिलेली अन्य गाणीही श्रवणीय झाली आहेत. एकूण लुडो सर्वच बाजुंनी सरस आहे. फक्त प्रत्यक्ष खेळ खेळतांना आपण जसं सर्व लक्ष खेळाकडे देतो, तसंच या चित्रपटाचं आहे. एकाजागी बसून बघितला तर चार धागे बरोबर सापडतात.