एका “हाय ssss ची गोष्ट
कलाकाराचं रंगमंचावरील पहिलं पाऊल अनेक बाबतीत खास असतं. काही कलाकारांची रंगमंचावरील एंट्री अगदी भन्नाट ठरते. मराठी नाटकांतील चिरप्रसन्न व्यक्तिमत्व म्हणजे वंदना गुप्ते. त्यांच्या रंगभूमीवरील एंट्रीची ही धमाल गोष्ट!
‘द गोवा हिंदू असोसिएशन’ म्हणजे मराठी रंगभूमीवरील नामवंत नाट्यसंस्था. या नाट्यसंस्थेचा नाट्यमहोत्सव दणक्यात पार पडतो. या नाट्यमहोत्सवात ‘पद्मश्री धुंडीराज’ नाटक सादर होणार होतं. नाटकातील मुख्य भूमिकेतील मुलीसाठी शोध सुरू होता. अभिनेत्री मनोरमा वागळे यांच्या ओळखीत अशी एक चुणचुणीत मुलगी होती. मनोरमा यांची खास मैत्रीण ख्यातनाम गायिका माणिक वर्मा यांची सुकन्या वंदना. त्यांनी वंदनाला भूमिकेच्या ऑडीशनसाठी जायला सांगितलं.
हे हि वाचा : ‘वंदनीय’ स्वभावाचे माणिक मोती / साधेपणा जपणाऱ्या वंदना गुप्ते
वंदना तिथे पोहोचल्या तर हॉल तुडुंब भरलेला होता. द गोवा हिंदू असोसिएशनच्या सर्व नाटकातील दिग्गज कलावंत मंडळी सभागृहात उपस्थित होती. वंदना तिथे गेली. ‘पद्मश्री धुंडीराज’ नाटकातील या भूमिकेसाठी एक मिश्कील, उत्साही बिनधास्त तरुणीच्या शोधात ही मंडळी होती. वंदना यांच्या हातात संहिता ठेवण्यात आली. ती वाचण्यास सांगण्यात आलं. संहितेतील पहिल्याच शब्दावर तरुण वंदना अडली. शब्द होता, ‘हाय’. अतिशय साधेपणाने वंदना यांनी समोरच्या मंडळींना विचारलं. “हा हाय नेमका कसा वाचायचाय? म्हणजे हाय खातात त्यातला हाय? का नमस्कार करताना म्हणतात तसा हायssss?
त्यांच्या या एका वाक्यावर सभागृहात हशा पिकला आणि समस्त दिग्गज मंडळींनी एकदिलाने सांगितलं…. “आमची चुणचुणीत नायिका आम्हाला मिळाली. बाकीची संहिता वाचायची गरज नाही.या नाटकासाठी आम्ही तुला निवडलंय”.
आणि अशाप्रकारे या पहिल्या वहिल्या गंमतीशीर ऑडीशनसह वंदना यांचं रंगभूमीवरील पहिलं पाऊल पडलं. त्यानंतर अखेरचा सवाल,गगनभेदी, चारचौघी, चार दिवस प्रेमाचे, झुंज,प्रेमा तुझ्या गावा जावे, रंग उमलले मनाचे, वाडा चिरेबंदी, शूऽऽ कुठं बोलायचं नाही, श्री तशी सौ, संध्याछाया, सातव्या मुलीची सातवी मुलगी, सुंदर मी होणार, सेलिब्रेशन, सोनचाफा अशा अनेक नाटकांतून त्यांनी रंगभूमीवर बहारदार अभिनय केला.पण पहिल्या वहिल्या भूमिकेचा हा ‘हायssss’ मात्र या संपूर्ण प्रवासाला कारणीभूत ठरला.