‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
स्मिता पाटीलच्या त्या बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं…
आजही मला स्पष्ट आठवतेय, शनिवार दिनांक १३ डिसेंबर १९८६ रोजी गिरगावातील माझ्या घरुन नवशक्ती ऑफिसकडे जाताना चर्नी रोड स्टेशनवर चढण्यापूर्वीच एका इंग्रजी सायं. दैनिकाच्या पहिल्या पानावर ताजी बातमी काय आहे, आदल्या रात्रीच रंगलेल्या ‘होप्स ८६’ या फिल्मवाल्यांच्या entertenm शोचे फोटो कोणते आहेत. हे पाहत असतानाच धक्कादायक बातमीने लक्ष वेधून घेतले, स्मिता पाटील अत्यवस्थ….
लगेचच विचारचक्र सुरू झाले, अवघ्या काही दिवसांपूर्वीच तिने एका मुलाला जन्म दिला आणि अशातच ही बातमी यावी? ऑफिसमध्ये टेलीप्रिन्टरवर पीटीआय, युएनआयच्या बातमीतही ती सिरियस आहे असा फ्लॅश होता. परिस्थिती गंभीर आहे हे लक्षात येत होती. आणि त्याबद्दल अधिक तपशील मिळण्यात वृत्त संस्था हाच एकमेव मार्ग होता.
रविवारी सकाळी घरी आलेल्या लोकसत्तात पहिल्याच पानावर ‘नको ती बातमी’ आली होती. (ही बातमी वृत्तपत्राच्या लेट एडिशनमध्ये असल्याने फक्त विलेपार्लेपर्यंतच्याच कॉपीमध्ये होती). मुंबई आकाशवाणीच्या सकाळी सातच्या बातम्यात ‘स्मिता पाटीलच्या रात्री उशिरा झालेल्या’ निधनाची बातमी सांगितल्याने एकूणच वातावरणात निराशा जाणवली. अधिक वेळ न दवडता आमचा फोटोग्राफर घनःश्याम भडेकरला पब्लिक फोनवरुन फोन करून आपण स्मिता पाटीलच्या अंत्यदर्शनासाठी जाऊया असे म्हटले. तोही गिरगावात राहत असल्याने काही वेळातच तो स्कूटर घेऊन आला.
स्मिता पाटीलचे निधन पेडर रोडवरील जसलोक इस्पितळात झाल्याने आम्ही तेथे गेल्यावर समजले की सकाळी लवकरच येथून तिला नेले आहे. आम्हाला वाटले नायर रुग्णालयात तिचे प्रेत असेल. तेथेही नाही म्हटल्यावर तिच्या घरचा पत्ता मिळवणे गरजेचे होते. यासाठी सर्वप्रथम खिशात टेलिफोन डायरी हवी आणि पब्लिक फोन शोधणे, त्यासाठी खिशात आठ आण्याचे नाणे हवे. (तेव्हाच्या मिडियाची स्थिती अशी होती) एका फोटोग्राफरकडे फोन केल्यावर समजले की वांद्र्याच्या कार्टर रोडवर खार दांडाजवळपास कुठे तरी तिचे घर आहे. तेथे पोहचेपर्यंत ‘तिला अशा अवस्थेत पहायचे कसे’ असा प्रश्न सतावत होता.
जिला आपण कॉलेजच्या दिवसापासून मराठी आणि हिंदी चित्रपटात पाहत आलो आहे. जिने जगभरातील उत्तमोत्तम कलाकृती पाहिल्यात. जी मॉन्ट्रीयल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक होती, जिचे साहित्याचे वाचन दांडगे आहे. आपण मिडियात आल्यावर मोहनकुमार दिग्दर्शित अमृत (जुहूच्या एका बंगल्यात), जे. ओम प्रकाश दिग्दर्शित ‘आखिर क्यो’ (चित्रनगरीत), रवि टंडन दिग्दर्शित ‘नजराना’ ( मानखुर्दच्या एसेल स्टुडिओत) या चित्रपटांच्या सेटवर शूटिंगच्या रिपोर्टीगच्या निमित्ताने प्रत्यक्षात अभिनय करताना पाहिले/अनुभवले आणि दोन दृश्यांच्या मधल्या वेळेत जिला आपण आवर्जून भेटलो आणि हिंदी चित्रपटाच्या सेटवरही जी आवर्जून आपल्याशी मराठीत बोलली तिला आता शांत पहायचे? कसलीही हालचाल न करण्याच्या अवस्थेत पहायचे? स्मिता पाटील आपल्यात नाही हे पहायचेय?
जिने मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम आणि तेलगू अशा आठ भाषेतील चित्रपटात भूमिका साकारत आपले अनुभव विश्व वाढवले तिला निपचित पडलेले पहायचे? पण मिडियात असल्याने अशा क्षणी भावूक होता येत नाही. बातमी आणि लेखाचा सतत विचार करावा लागतो. आणि त्यासाठी डेडलाईन सांभाळावी लागते.
कार्टर रोडवरील त्या इमारतीपर्यंत पोहचलो तेव्हा माझी धडधड वाढली होती. स्मिता पाटीलच्या आतापर्यंत झालेल्या तीन चार औपचारिक भेटीत प्रकर्षाने जाणवले ते तिचा सुसंस्कृतपणा, विचारांची पक्की बैठक आणि चित्रपट माध्यम व व्यवसाय या दोन्हीबाबतचा फोकस्ड दृष्टिकोन. तिच्या अभिनयातील परिपक्वता यातून आहे हे लक्षात आले होते. योगायोगने तिची भेट झालेल्या हिंदी चित्रपटात राजेश खन्ना आहे, तोही यावेळी सेटवर होता. ‘नजराना’ साठी तर कोर्ट रुम नाट्य चित्रीत होत असताना श्रीदेवीही होती. या दोघीनी एकत्र भूमिका साकारलेला हा एकमेव चित्रपट आहे.
आणखीन एक विशेष म्हणजे त्या काळात दिपक सावंत हे स्मिता पाटीलचे मेकअपमन होते आणि त्यांनीच खरं तर आमची भेट घडवून आणली होती. त्या काळात हिंदी चित्रपटाच्या शूटिंग रिपोर्टीगसाठी आम्हा सिनेपत्रकाराना एक तर पीआरओकडून आठ दहा दिवसांचे पूर्ण वेळापत्रक येई अथवा आम्ही सिनेपत्रकाराना आवर्जून सेटवर प्रवेश असे. पण याक्षणी अतिशय भावपूर्ण वातावरणात एकेक पायरी चढत चढत एक तर……. काहीच सुचत नव्हतं आणि आजही सुचत नाही की स्मिता पाटीलला अशा अवस्थेत पाह्यचे कसे? त्या रूममध्ये स्मिता पाटीलचे आई (विद्याताई पाटील) आणि बाबा (शिवाजीराव पाटील) तसेच पती राज बब्बर यांना अतिशय शोकुकल स्थितीत पाहताना मलाही खूप अस्वस्थ वाटायला लागलं.
तेवढ्यात मुंबई दूरदर्शनचे प्रतिनिधी राज बब्बरच्या प्रतिक्रियेची तयारी करीत असल्याने मी आणि भडेकर काहीही न बोलता तिथून निघालो आणि नरिमन पॉईंटला ऑफिसला येईपर्यंत आम्ही एकमेकांशी एकही शब्द बोललो नाही. बोलू शकत नव्हतो. गेल्यावर बातमी आणि लेख लिहिताना भावनाविवश न होता काम केले. पत्रकाराला ही पथ्ये पाळावी लागतात.
शिवाजी पार्क स्मशानभूमीत स्मिता पाटीलवर अंत्यसंस्कार होणार असल्याने तेथेही आम्ही दोघे गेलो. एकही जण कोणाशीही बोलत नव्हते. ते शक्यही नव्हते आणि गरजेचेही नव्हते. तेवढ्यात दिसले की दिपक सावंत स्मिता पाटीलला मेकअप करताहेत. तिचा निरोप देतानाही तिला अभिनेत्री म्हणून मेकअप करावा, तिच्या परिपक्व व्यक्तीमत्वाला आणखीन उजळून टाकावे असे त्याना वाटले आणि मग स्मिता पाटीलचा मृतदेह चितेवर ठेवण्यात आला. पण दिपक सावंत आजही तत्क्षणी आपण स्मिता पाटीलला मेकअप करीत असतानाचा फोटो आजही कोणाकडे आहे का हे शोधताहेत. (हा लेख वाचून तरी काही मार्ग सापडावा).
स्मिता पाटीलबाबत आणखीन एक आठवण आहे, प्रभात चित्र मंडळाच्या वतीने दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘उंबरठा’ या चित्रपटावर आयोजित केलेल्या एका परिसंवादात स्मिता पाटीलला सुधीर नांदगावकर यांनी जे अतिशय उत्तम रितीने बोलते केले आणि स्मिता पाटीलने आपले जे विचार मांडले ते एक स्वतंत्र विचारांची, प्रगत सामाजिक दृष्टिकोन असलेल्या एका जागरूक स्रीला आपण ऐकतो आहोत याचाच तो प्रगल्भ अनुभव होता. तेथे ती ‘अभिनेत्री’ नव्हती. स्मिता पाटील वेगळ्या पठडीतील चित्रपटात (निशांत, भूमिका, गमन, बाजार) बुध्दीवादी अभिनेत्री असे, पारंपरिक मसालेदार मनोरंजक चित्रपटात (नमक हलाल, शक्ती, घुंघरु, आनंद और आनंद, गुलामी) ती स्टार असे. आणि प्रत्यक्षात ती ‘स्मिता पाटील नावाची स्वतंत्र अस्तित्व असलेली व्यक्ती’ असे. तेव्हा तिच्यावर चित्रपट जगताचे कोणतेही सावट अथवा सावली नसे. हे फारच कमी सेलिब्रेटिजना जमते.
आणि हेच स्मिता पाटीलचे वेगळेपण आहे. होते असे म्हणणे योग्य होणार नाही. स्मिता पाटील आपल्या चित्रपट आणि विचाराने तर आजही आपल्यात आहेच, तसेच आजच्या पिढीतील काही अभिनेत्री ‘अभिनय कसा करावा/असावा यासाठी स्मिता पाटीलचे चित्रपट आज यु ट्यूबवर अथवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर आवर्जून पाहतात हे स्मिता पाटीलचे चित्रपटसृष्टीसाठीचे खूप मोठे देणे आहे…