मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
स्वतःचे अस्तित्व सिनेसृष्टीत निर्माण करणारा: अजिंक्य देव
हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील स्टार सन्स म्हणजे तो जन्माला येतो तोच त्याचे पाय जणू स्टुडिओला लागतात, मराठीत मात्र कलाकार दाम्पत्याच्या पुत्राबाबत नक्कीच आपलेपण असते. तो आपल्या घरातला वाटतो… रमेश देव आणि सीमाताई यांचा पुत्र अजिंक्य (Ajinkya dev) आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल टाकत जरी अभिनयाच्या क्षेत्रात आला तरी त्याला स्वतःलाच सिध्द करुन येथे जम बसवायचा होता. त्याशिवाय त्याला पर्याय नव्हताच.
हिंदीत स्टार सन्सच्या चित्रपटाच्या मुहूर्ताचाच असा आणि इतका भपका असतो की, त्या क्षणापासून तोही ‘अपनी ही स्टाईल मे’ वागू/फिरु/पाहू/ऐकू लागतो असा अनुभव मी अनेकदा घेतलाय. ‘बरसात’ चा मुहूर्त असाच ग्लॅमरस होताच बाॅबी देओल व करिष्मा कपूर लगेचच ‘स्टार’ झालेही, त्यांच्या मुलाखतीही छापल्या जाऊ लागल्या. मग करिष्माच्या जागी ट्वींकल खन्ना आली तरी पुन्हा झगमगाट. ज्याला लाॅन्चिंग पॅड म्हणतात असे मराठीत काही नसते याचे कारण म्हणजे ते गरजेचे वाटत नाही. आपला मुलगा आपल्या मेहनत आणि गुणवत्तेने आपल्या पायावर नक्कीच उभा राहिल असा विश्वास आपल्याकडे आहे. अजिंक्यने मधु मालती निर्मित आणि राजदत्त दिग्दर्शित “अर्धांगी” मधून (१९८५) मध्ये रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. पुणे शहरातील प्रभात थिएटरमधील प्रीमियर शोला मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांना आवर्जून नेले असता अजिंक्यच्या वागण्यातील नवखेपण लपत नव्हते. (त्या काळात टप्प्याटप्प्याने विभागवार चित्रपट प्रदर्शित होत.)
काही महिन्यांनी याच चित्रपटातील अभिनयासाठी अजिंक्य देवला राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट विशेष अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला त्याच दिवशी (पूर्वी राज्य चित्रपट महोत्सवाचे सर्व पुरस्कार अगोदर जाहीर होत) फिल्मालय स्टुडिओत “क्रोध” या हिंदी चित्रपटाच्या मुहूर्ताला अजिंक्य देव भेटताच क्षणी त्याला ही आनंद वार्ता सांगताच तो स्वाभाविकपणे विलक्षण खुलला. सकाळी अकरा वाजतानाच्या या मुहूर्ताला येण्याच्या घाईत त्याचे वृत्तपत्र वाचन झाले नव्हते आणि आता कधी एकदा हा मुहूर्त होतोय आणि घरी जाऊन आईबाबांना सांगून त्यांचे आशीर्वाद घेतोय असे अजिंक्यला वाटू लागले. तो कावराबावरा झाल्याचे लपत नव्हते. हेच तर महत्वाचे असते. मुहूर्ताच्या त्या गर्दीतून तो कधी निसटला ते समजलेच नाही.
रुपेरी पदार्पणातच महत्वाचा पुरस्कार म्हणजे मुलाखत हवीच. तेव्हा जुहूच्या कोळीवाडा काॅर्नरवर मेघदूतमधील चौथ्या मजल्यावर या कुटुंबाचे ‘देव घर’ होते. (कालांतराने देव कुटुंबिय जुहू वर्सोवा लिंक रोडला राहायला गेले.) बाहेरच्या खोलीत आमची प्रश्नोत्तरे सुरु असतानाच मधल्या पडद्यामागे काही हालचाल जाणवली, तेव्हा माझ्या लक्षात आले की, आपला मुलगा कशा पद्धतीने उत्तरे देतोय हे सीमाताई आडून ऐकत होत्या. आईची माया म्हणतात ती हिच. (हिंदी स्टारसनही फाईव्ह स्टार हाॅटेलमध्ये अशा भेटी आयोजित करतो. मराठीत तसे पूर्वी होत नसल्याने आपलेपण असे. इतरही गप्पा होत.) अजिंक्य देवचा असा सुरु झालेला प्रवास आईबाबांच्या आशीर्वादाने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतून व्यवस्थित सुरु आहे, दशकभरापूर्वी धाकटा भाऊ अभिनय हा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आला आणि देव कुटुंबाचे या मनोरंजन क्षेत्रासाठीचे देणे वाढले.
अजिंक्यला खरी ओळख मात्र घरचीच निर्मिती असलेल्या आणि राजदत्त दिग्दर्शित “सर्जा” (१९८७) या ऐतिहासिक चित्रपटाने दिली. रमेश देव यांनी स्वतः आपल्या या चित्रपटाचे नेमके कोणते फोटो वृत्तपत्रात यायला हवे, प्लाझा थिएटरवरचे थीमनुसार अतिशय उत्तम डेकोरेशन याकडे लक्ष दिल्याचे उत्तम फळ त्यांना मिळाले. अजिंक्य देव अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचला आणि आजही “सर्जा” म्हणताच अजिंक्य देव असे समीकरण जोडून येतेच. आणखीन एक विशेष म्हणजे, अजिंक्य आता नवतारकांचा हिरो झाला. पूजा पवार (सर्जा), मुग्धा चिटणीस (माझं घर माझा संसार), अश्विनी भावे (शाब्बास सूनबाई), कविता लाड (घायाळ) या अभिनेत्रींचा पहिला चित्रपट अजिंक्य देवसोबतचा आहे. हाही विक्रमच आहे.
हे हि वाचा : “इरॉस थिएटर” प्रदर्शित चित्रपटांचे माहेरघर…
मराठी आणि हिंदी चित्रपटातून भूमिका साकारत असताना अजिंक्यला काही सुखाचे योगही आले. अमिताभ बच्चनसोबत एखादे तरी दृश्य साकारायला मिळू देत असे स्वप्न पाहणारे देशातील अनेक प्रादेशिक भाषेत आणि अगदी हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक लहान मोठे कलाकार आहेत. त्यातही आपल्या आई बाबांनी ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित “आनंद” (१९७१) मध्ये एकाच वेळेस राजेश खन्ना आणि अमिताभसोबत भूमिका साकारल्याने तर अजिंक्यही मोठ्या संधीची वाट पाहत होताच. रमेश बहेल निर्मित आणि के. व्ही. राजू दिग्दर्शित “इंद्रजित” मध्ये बीग बीसोबत तीनपैकी एक खलनायक साकारायला मिळाल्याने अजिंक्य सुखावला आणि आपण अमिताभसोबत चक्क फायटींग सीन कसा करतोय??? हे पाहायला त्याने मला चक्क चेंबूरच्या आरसीएफ स्वीमिंग पूलावर बोलावले. आता अमिताभ सेटवर असतो तेव्हा आजूबाजूला लक्ष जाण्याची शक्यता अजिबात नसते आणि तीस वर्षापूर्वी तर सेटवरचे अमिताभचे असणे म्हणजे एक विलक्षण दबदबा होता. त्याच सुमारास त्याने आपला मिडियावरचा दशकभरापासूनचा बहिष्कार उठवला होता. मी सेटवर गेलो तेव्हा सहाय्यक दिग्दर्शक कपिल कपूरकडून समजले की, ऍक्शन दिग्दर्शक राम शेट्टीने फायटींग सीनची कॅमेराच्या जागेसह पूर्वतयारी केली आहे. अजिंक्यला एकीकडे या संधीचा आनंद वाटत असतानाच तो अमिताभच्या जबरदस्त अस्तित्वापुढे खूपच सावध वाटला. अशाच अनेक प्रकारच्या अनुभवातून अजिंक्यची होत असलेल्या जडणघडणीचा मी एक जवळचा साक्षीदार आहे.
अजिंक्य मराठीत भूमिका साकारत असताना विनोदी चित्रपटाचे युग होते, अजिंक्य हिंदीत वावरु लागला तेव्हा अमिताभ, संजय दत्त, अनिल कपूर, जॅकी श्राॅफ, सनी देओल, आमिर खान, सलमान खान भरात असतानाच अजय देवगन, अक्षयकुमार, सुनील शेट्टी, शाहरूख खान अवतरले. अजिंक्यला दोन्हीकडे मिळेल त्या संधीतून वाट काढण्याशिवाय पर्याय नव्हता. (चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीकडे एकतर्फी पाहणारे अशी सिच्युएशन कधीच विचारात घेत नाहीत).
विजय कोंडके दिग्दर्शित “माहेरची साडी” च्या यशाने अजिंक्य खेड्यापाड्यातील प्रेक्षकांपर्यंत पोहचला. “सरकारनामा”, “लपंडाव”, “कुंकू”, “वाजवा रे वाजवा”, “घायाळ”, “पैंजण” अशा मल्टी स्टार कास्ट चित्रपटात त्याने दोन पिढ्यांच्या कलाकारांसोबत भूमिका साकारताना आपले अनुभव विश्व विस्तारले. आईबाबांसोबत “जेता” मध्ये भूमिका साकारली. महेश कोठारे दिग्दर्शित “दुभंग” मध्ये अजिंक्यने आईसोबत भूमिका साकारली. हिंदीतही तो कार्यरत असतानाच अशोक गायकवाड दिग्दर्शित “शक्तिशाली” मध्ये अजय देवगन आणि रविना टंडनसोबत महत्वाची भूमिका आणि फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये दोघांसोबत मुहूर्त दृश्यात संधी असे मिळताच तो सुखावला.
आजही मला या मुहूर्ताच्या वेळचा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट आठवतोय. पण दुर्दैवाने हा चित्रपट निर्मितीवस्थेत रखडत रखडत एकदाचा “गैर” नावाने कधी बरे रिलीज झाला हे समजलेच नाही. ऐतिहासिक चित्रपटातून अजिंक्यने आपला अभिनय आणि पर्सनॅलिटीचा उत्तम प्रत्यय दिला. घरचीच निर्मिती असलेल्या आणि गजेन्द्र अहिरे दिग्दर्शित “वासुदेव बळवंत फडके” नंतर त्याने “राणी लक्ष्मीबाई” या इंग्रजी व मराठी चित्रपटात तात्या टोपे साकारले. ओम राऊत दिग्दर्शित “तान्हाजी” मध्ये चंद्राजी पिसाळ साकारले. या चित्रपटाच्या यशाने अजिंक्य प्रचंड सुखावला.
अजिंक्यने आपल्या चित्रपटाची संख्या वाढण्यापेक्षा आस्ते कदम धोरण ठेवल्याने तो आपल्या कुटुंबाकडे, घराकडे शांतपणे लक्ष देऊ शकतोय. “जीवा सखा”, “वहिनीची माया”, “सौ. शशी देवधर” इत्यादी चित्रपटात देखील त्याने भूमिका साकारल्या. देशविदेशात फिरायला जातो. आपल्या कुटुंबाच्या आर.डी. (रमेशदेव) प्रॉडक्शनच्या चित्रपट, मालिका, जाहिरातपट याकडे आवश्यक इतपत लक्ष देतोय. आपल्या आजूबाजूच्या समाजात काय चाललयं, राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील घडामोडी या सगळ्याची त्याची समज अगदी उत्तम आहे. सोशल मिडियात तो भारी ऍक्टिव्ह आहे. एका चाहत्याने त्याची भूमिका असलेल्या “अनुराधा” चे पाठवलेले तिकीट त्याने सोशल मिडियात आवर्जून शेअर केले आणि अशातच काही महिन्यांपूर्वीच ट्वीट करत म्हटले, माझ्या आईची (अर्थात सीमा देव) तब्येत ठीक नाही. अल्मायझरचा (विस्मृती) त्रास तिला होत असून तिच्या तब्येतीसाठी सदिच्छा द्या… लगोलग ही बातमी सगळीकडे पसरली आणि परमेश्वराकडे प्रार्थनाही करण्यात आली.
देव कुटुंबाचे चित्रपटाच्या माध्यमातून समाजासाठीचे दीर्घकालीन देणे आहे, त्याचेच हे फळ आहे. अजिंक्य देवला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना अशा काही गोष्टी सांगाव्याशा वाटल्या…