दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
निरंजन कुलकर्णी याच्या वैविध्यपूर्ण भूमिकांचा प्रवास.
स्टार प्रवाह वाहिनीवरील दैनंदिन मालिकांमध्ये ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका खूप लोकप्रिय आहे. त्यात डॉक्टर अभिषेकची भूमिका करणारा कलाकार म्हणजे अभिनेता निरंजन कुलकर्णी. निरंजनचे शालेय शिक्षण अंबरनाथ येथे मराठी माध्यमात झाले. त्याची आई शिक्षिका, तर बाबा नोकरी करणारे. घरात शिक्षणाला पाठिंबा देणारं वातावरण. बहिणी सुद्धा शिक्षिका निरंजनने काहीतरी वेगळं करावं, अशी सर्वांची इच्छा होती. त्याने दहावीनंतर डिप्लोमा केला. काही वर्षे नोकरी सुद्धा केली, तसेच त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये बी टेक सुद्धा पूर्ण केले आहे.
निरंजनने पहिल्यांदा ‘सरूची पदवी’ नावाच्या एका दूरदर्शन मालिकेत काम केलं होतं तेव्हा तो तिसरीत होता. निरंजनने अनेक संस्थांसाठी एकांकिकातून काम केलं आहे. ठाण्यातल्या अनेक संस्थांशी तो निगडित आहे. तो या क्षेत्रात अनुभवातून शिकत गेला, हे तो सांगतो. प्रबोध कुलकर्णी यांचेही त्याला मार्गदर्शन लाभले, तसेच ठाण्याच्या ‘गंधार’ या संस्थेत तो अभिनयाच्या संदर्भात मार्गदर्शन देखील करतो. निरंजनने अनेक ठिकाणी ऑडिशन्स दिल्या, त्यातून त्याला संधी मिळत गेली. ‘उंच माझा झोका’ या मालिकेत त्याने दामोदर अभ्यंकर या युवकाची भूमिका केली. आपलं बुवा असं आहे, जावई विकत घेणे आहे या मालिकांत सुद्धा त्याच्या भूमिका होत्या.
आपण पौराणिक मालिकांत सुद्धा काम करावं, असं त्याला वाटलं आणि मग त्याला ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेत विष्णूंची भूमिका मिळाली. त्यात विष्णूंचे दशावतार देखील दाखवले होते. ‘तू माझा सांगाती’मध्ये त्याने कृष्णाची भूमिका केली. त्याच मालिकेत संत ज्ञानेश्वर ही भूमिका सुद्धा निरंजनने केली. तसेच ‘तू माझा सांगाती’ मध्येच पुढच्या टप्प्यात त्याने संत तुकारामांची गाथा समाजापर्यंत पोहचवणाऱ्या संत तुकाराम यांच्या मुलाचे म्हणजे नारायणचे काम केले. पौराणिक भूमिकांचे सादरीकरण खूप वेगळे असते. तिथे भाषा आणि संवाद हे खूप वेगळ्या पद्धतीचे असतात, हे त्याने अनुभवले. त्यानंतर त्याला त्याच पद्धतीच्या ऐतिहासिक, पौराणिक भूमिका येऊ लागल्या, त्या त्याने नाकारल्या.
पुन्हा त्याला आजच्या काळातल्या भूमिका करण्याची इच्छा होती. मग त्याला ‘तू अशी जवळी रहा’ मालिकेत ‘नितीश’ ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. त्याचा या मालिकेतील लूक सर्वांना आवडला होता. या मालिकेत त्याच्या वडिलांची भूमिका मिलिंद गवळी करत होते. मिलिंद गवळी यांनी निरंजनला ‘आई कुठे काय करते’च्या ऑडिशन विषयी सांगितले आणि मग ती ऑडिशन दिल्यानंतर त्याची निवड ‘डॉक्टर अभिषेक’ या भूमिकेसाठी झाली. निरंजन म्हणतो, “ही व्यक्तिरेखा एका डॉक्टरची आहे. या भूमिकेला खूप शेड्स आहेत. आपल्या कुटुंबाच्या बाबतीत हा डॉक्टर अभिषेक खूप संवेदनशील आहे. तो घर जोडून ठेवण्याचा प्रयत्न करणारा आहे. असे खूप कंगोरे यात हाताळता आले.”
दिग्दर्शक रवी करमरकर, निर्माते, मालिकेतील सर्व कलाकार आणि स्टार प्रवाह वाहिनी अशी उत्तम टीम मिळाल्याबद्दल निरंजन कृतज्ञता व्यक्त करतो. त्याला फोटोग्राफीची आवड आहे. त्याचं स्वतःचं यु ट्यूब चॅनल ‘बॅकस्टेज मस्ती विथ निरंजन’ या नावाने आहे. एका मालिकेतील काम पाहून दुसऱ्या भूमिका त्याला मिळत गेल्या, हे आपलं अवॉर्ड आहे, असं तो म्हणतो.