दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
ऑन ड्युटी चोवीस तास : अभिजित श्वेतचंद्र
सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर दर रविवारी रात्री दहा वाजता प्रसारित होणारी ‘नवे लक्ष्य’ (Nave Lakshya) ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे. त्यात पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता म्हणजे अभिजित श्वेतचंद्र. अभिजितचे शिक्षण डोंबिवलीत झालं. त्याने पेंढारकर कॉलेजमधून बी एस्सी केलं आहे. त्यानंतर शिवदास घोडके यांची एक कार्यशाळा त्याने केली होती. त्या कार्यशाळेने त्याच्या मनात अभिनय क्षेत्राची आवड निर्माण केली.
आपण अभिनयाचं (Abhijeet Shwetchandra) शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं पाहिजे, हा विचार अभिजीतच्या मनात आला. मग त्याने मुंबई विद्यापीठातून मास्टर्स इन थिएटर आर्टस् हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सुप्रसिद्ध दिग्दर्शक वामन केंद्रे यांच्याकडून आणि या अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या अनेकांचं मार्गदर्शन अभिजीतला मिळाले. अभिजीतने ‘मोहेपिया’ या नाटकात प्रमुख भूमिका केली. तसेच ‘दि डेथ ऑफ दि काँकरर’ यामध्ये सुद्धा त्याची भूमिका होती. ‘चापेकर ब्रदर्स’ या चित्रपटात तसेच ‘तालीम’ या चित्रपटात अभिजीतच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘तालीम’ हा चित्रपट अर्थातच कुस्तीवर आधारित होता.
झी युवा वाहिनीवरील ‘बापमाणूस’ या मालिकेत, तसेच झी मराठीवरील ‘बाजी’मध्ये त्याची प्रमुख भूमिका होती. ‘सजणा’मध्ये देखील त्याने काम केलं. ‘नवे लक्ष्य’ साठी त्याने ऑडिशन दिली आणि मग त्याची निवड झाली. यातील विक्रांत या व्यक्तिरेखेबद्दल तो म्हणतो, “मुळात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मालिका आहे, म्हटल्यानंतर आणि त्यातही आपण एका पोलिसाची भूमिका साकारत आहोत, हे कळल्यावर खूप अभिमान वाटतो. मी वर्दीला नमस्कार करूनच ती वर्दी परिधान करतो. या भूमिकेसाठी तयारी करताना आपल्या देहबोलीला खूप महत्व आहे.
काही पोलिसांचे आम्हाला मार्गदर्शन लाभलं आहे. मुळात आपण उभे कसे राहावे, सॅल्यूट कसा करावा इतक्या बारकाईने आम्ही विचार केला आहे. माझ्या काही पोलीस मित्रांशी देखील मी चर्चा करत असतो. एखादी केस जेव्हा यात दाखवली जाते, ती सोडवताना, त्या गुन्ह्याचा शोध घेताना प्रत्यक्षपणे पोलिसांना किती कष्ट करावे लागले असतील, याची आम्हा सर्वांनाच ही मालिका करताना कल्पना आली आहे. पोलिसांच्या कार्याला आमचा हा मानाचा मुजरा आहे.”
पोलिसांची व्यक्तिरेखा असल्याने फिटनेस ही गोष्ट महत्वाची आहे, हे अर्थातच अभिजीतला माहित आहे. तो पूर्वीपासूनच नियमितपणे जिम मध्ये जातो. काही झाले तरी व्यायाम चुकवायचा नाही, हा त्याचा कटाक्ष असतो. ‘ऑन ड्युटी चोवीस तास’ कार्यरत असणाऱ्या पोलिसांच्या प्रति आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहोत, असेही तो म्हणाला.
अभिजित श्वेतचंद्र म्हटल्यावर आपल्याला त्याच्या आडनावाविषयी कुतूहल वाटते. त्याच्या आईचे नाव श्वेता आणि वडिलांचे नाव चंद्रकांत म्हणून अभिजीने आपले नाव ‘अभिजित श्वेतचंद्र’ असे केले आहे. ‘आडनावावरून लोक उगीचच हा कोणत्या जातीचा वगैरे अशा शंका उपस्थित करू लागतात, माणुसकी ही खरी जात आहे, हाच खरा धर्म आहे, असे आपले स्पष्ट मत असल्याचे त्यानं सांगितलं.