दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
किस्सा एका एकांकिकेचा…
रूईया महाविद्यालयासाठी शं.ना.नवरे यांची ‘जनावर’ ही एकांकिका बसवली जात होती. एक बेकार आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडणारा तरुण आणि प्रतिष्ठित मध्यमवर्गीय गृहस्थ यांच्यातला तो संघर्ष होता. दिलीपजींचा (Dilip Prabhavalkar) तो पहिला वहिला अनुभव. त्याआधी सोसायटीच्या गणेशोत्सवात नाटक केलं होतं. पण आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचा माहोलच भन्नाट असतो. प्रेक्षकांतून होणारी हुर्यो, दुसऱ्या गटाचं नाटक पाडण्यासाठी होणारी थट्टा असा सगळा अटीतटीचा मामला. तर एकांकिकेला सुरूवात झाली. दिलीपजींचा पहिला संवाद होता, “नमस्कार! मी राणीच्या बागेतून आलोय.” प्रेक्षकांतून कुणीतरी ओरडलं, “तिथलाच वाटतोय.” ते ऐकून दिलीपजी मनात थोडे घाबरले. पण एवीतेवी भंकसच होणार तर मन लावून तरी काम करू म्हणून त्यांनी मनापासून काम केलं.
आणि आश्चर्य म्हणजे फक्त विनोदी एकांकिकांत रमणारा विद्यार्थी वर्ग बघता बघता गप्प झाला. नाटकाच्या शेवटी दिलीपजी ज्या तरुणाची भूमिका करत होते त्याचा खून होतो आणि वेदनेने तो खाली कोसळतो. नायकाने तडफडत म्हटलेल्या वाक्यांनी एकांकिका संपली. पण प्रथमच एकांकिकेत काम करणाऱ्या दिलीपजींना पडदा पडला का नाही याची खात्री नसल्याने ते तसेच पडून राहिले. दिलीपजींच्या नाटकाची प्रॉपर्टी हलवून पुढच्या एकांकीकेची प्रॉपर्टी लावण्याचं काम वेगानं झालं. आणि मग कुणाच्या तरी लक्षात आलं. आधीच्या एकांकिकेतला ॲक्टर स्टेजवर तसाच पडून आहे. मग दिलीपजींना हळूच थोपटून उठवण्यात आलं.
दोन दिवसांनी रिझल्ट आला. एकांकिकेला आणि दिलीपजींना दोघांनाही बक्षीस मिळालं होतं. नोटीस बोर्डवर निकाल लावण्यात आला. तेव्हा या नव्या यशाची इतकी अपूर्वाई असायची की दिलीपजी दोन तीन दिवस वेगवेगळ्या मित्रांबरोबर अगदी सहजच आल्यासारखे त्या नोटीस बोर्डच्या आसपास फिरत. नोटिसबोर्डकडे थबकून, “अरे वाह निकाल लागला वाटतं” असं म्हणून नोटीस वाचत. मग आजुबाजुच्या मंडळींकडून अभिनंदन होई. नवं असताना ही दादही तितकीच महत्त्वाची.
कॉलेज दिवसांत हा सगळा वेडेपणा माफ असतो. पण हे कधीही न मावळणारे कॉलेजचे दिवस कलाकार म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात नाटकाचे जे वेड पेरतात, त्यातूनच एखादा अभिनयाचा वटवृक्ष बहरतो हे दिलीप प्रभावळकर यांच्या कडे पाहिल्यावर नक्की पटतं.
=====
हे वाचलंत का: दिलीप प्रभावळकर यांच्या हसवाफसवीला जेव्हा मिळाली नटसम्राटाची दाद
=====