नाक्यावरील, चौकातील होर्डींग्सच्या आठवणी…
अगदी लहानपणी सहकुटुंब कुठेही फिरावयास गेल्यावर पिक्चरचे मोठे होर्डींग्स दिसले रे दिसले की असे वाटे, “हे देखील पिक्चर दाखवायचे थिएटर आहे अथवा असावे.” मला आठवतंय, आमच्या गिरगावातील प्रार्थना समाजला एकाच वेळेस एकमेकांत अंतर ठेवून ‘रुठा ना करो’, ‘समाज को बदल डालो’ आणि ‘जाॅनी मेरा नाम’ या सिनेमांची मोठी होर्डींग्स लागली होती. कुटुंबासह गिरगाव चौपाटीवर फिरायला जाताना ऑपेरा हाऊस थिएटरसमोरच चक्क चार मोठी होर्डींग्स(Memories of hoardings) दिसत. हळूहळू लक्षात आले की, चौपाटीवर बिर्ला क्रीडा केंद्रासमोरही आणखीन काही सिनेमांची होर्डींग्स लागली आहेत.
अशा गर्दीच्या स्थळांवर अशा पध्दतीने सिनेमाची आगमनापूर्वीची पब्लिसिटी केली जाते, अशी माहिती मिळाली आणि अशा होर्डींग्सवर, आगामी सिनेमाचे आकर्षण आणि तो रिलीज होताना मेन थिएटरवरचे डेकोरेशन कसे आणि केवढे असेल याची उत्सुकता वाटत असे. त्या काळातील चित्रपट संस्कृती आणि सिनेरसिकांचे भावविश्व, आकर्षण अगदी वेगळे होते. प्रत्येक काळाची काही वैशिष्ट्ये असतातच म्हणा.
आजच्या डिजिटल युगात ही चित्रपटाची होर्डींग्स संस्कृती कालबाह्य झाली आहे. पण पूर्वी अशी होर्डींग्स आणि त्याचे अनेक स्पाॅट ही एक रंजक गोष्ट. अगदी हातगाडीवरुन होर्डींग्स (Memories of hoardings) नेली जात असतानाही त्याकडे लक्ष जाई. असे होर्डींग्स उंचावर लावले जात असताना ते पाहण्यातही अनेक जण रस घेत. अहो, इतकेच नव्हे तर, ही होर्डींग्स काही महिन्यांनी छोट्या शहरातील थिएटर्सकडे पाठवली जात. त्या काळात सार्वजनिक श्रीगणेशोत्सवातही काही ठिकाणी होर्डींग्स पाहायला मिळत. एखाद्या चित्रपटाच्या रिपिट रनला ती होर्डींग्स एका आठवड्यासाठी थिएटरवर चढत आणि ती कुठून कोण जाणे ती जीर्ण होत जाताना ती कुठे बैठ्या चाळीत अथवा झोपडपट्टीच्या कौलांवर पावसाळ्यात दिसत. अर्थात, घरात पाणी गळू नये यासाठीच ते असे. ….सिनेमाचे होर्डींग्स कालांतराने असे एखाद्याच्या घरात गळणारे पाणी थोपवत
सिनेमाचे जग म्हणजे अशा केवढ्या तरी छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यात असलेले/नसलेले/दडलेले अनेक प्रकारचे अर्थ. सिनेमा हा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि माध्यम असा अनेकात लहान लहान गोष्टींनी बहुस्तरीय विषय आहे. आपल्या देशात सिनेमा येतो आणि जातो एवढेच नसते. ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘गुड्डी'(१९७१) या चित्रपटात नायिका मुंबईत येते तेव्हा ती गाडीतून जात असतानाच तिची नजर होर्डींग्सवरही (Memories of hoardings) पडते आणि ती सिनेवेडी आहे हे अधोरेखित होते. ‘गुड्डी ‘ दूरदर्शनवर पाहताना हे लक्षात आले आणि होर्डींग्स संस्कृतीचे महत्त्व आणखीनच पटले.
गुलशन राॅय निर्मित आणि विजय आनंद दिग्दर्शित ‘जाॅनी मेरा नाम’ (१९७०) च्या पूर्वप्रसिध्दीचा भाग म्हणून केलेली एक खेळी मला कालांतराने लक्षात आली. प्रार्थना समाज येथे या चित्रपटाच्या लागलेल्या होर्डींग्सवर पिस्तूलधारी देव आनंदला हेमा मालिनी बिलगून उभी होती. चित्रपटात ॲक्शन आणि रोमान्स यांची ‘स्टोरी’ असावी असे सूचित होत होते आणि गोल्डीचा ‘तिसरी मंझिल’ नंतरचा हा चित्रपट असल्याने, तर त्याला पुष्टीच होती. मला आठवतेय, पंधरा दिवसांनी तेथे ‘जाॅनी… ‘चे दुसरेच होर्डींग्स (Memories of hoardings) दिसले, आता देव आनंद, हेमा मालिनी, प्रेमनाथ, पद्मा खन्ना आणि प्राण यांचे फक्त चेहरे त्यावर होते….
अनेक वर्षे दादरच्या टिळक ब्रीजवरुन बेस्ट बसमधून जाताना दुतर्फा अशी भव्य होर्डींग्स दिसत. म्हणूनच तर त्या वयात ‘खिडकीची जागा’ पटकावीशी वाटे. ते वयच तसे होते. डबल डेकर बस ही त्या काळातील खासियत आणि वरच्या मजल्यावर अगदी पुढच्या खिडकीवर बसायला मिळाले की चैनच. प्रवास अधिकच सुखाचा होई. सात रस्त्याला बस आली रे आली की, न्यू शिरीन थिएटरला कोणता सिनेमा लागलाय यासह सभोवारची ‘होर्डींग्सची जत्रा’ कधी बरे पाहतोय असं होई. जणू होर्डींग्स चौकच होता..
चौपाटीवरील आमच्या भवन्स काॅलेजला जाण्याच्या मार्गावर ऑपेरा हाऊस थिएटरचा भला मोठा काॅर्नर त्यासाठी खूप महत्त्वाचा. काॅलेजला येता जाता दोन गोष्टी काॅमन असत. ऑपेरा हाऊस थिएटरमध्ये रिलीज झालेले अनेक चित्रपट पंचवीस अथवा पन्नास आठवड्यांचा मुक्काम करत. अमर अकबर ॲन्थनी, देवता, बरसात की रात याच ऑपेरा हाऊसला प्रदर्शित झाले होते. त्याच काळात दुसरी काॅमन गोष्ट म्हणजे, ऑपेरा हाऊसच्या समोरची होर्डींग्स. त्यावर ‘दोस्ताना’, ‘हम पांच ‘, ‘ज्वालामुखी’, ‘मांग भरो सजना’ अशा चार चित्रपटांची भली मोठी होर्डींग्स लक्ष वेधून घेत. काही आठवड्यानंतर त्यात बदल होई. दक्षिण मुंबईतून मध्य मुंबई आणि उपनगरात जाण्याचा हा परफेक्ट स्पाॅट. इथल्या होर्डींग्सवर लक्ष जाणारच!(Memories of hoardings)
फार पूर्वी ही होर्डींग्स चक्क रंगवली जात. ती एक वेगळी कला, संस्कृती, अभ्यास आणि व्यवसाय होता. त्यात आर्टिस्ट आपले कसब दाखवत आणि कलाकारांचे चेहरे अधिकाधिक डिट्टो करण्याचा प्रयत्न करत. मग छापील पोस्टर ब्लो अपचा काळ आला आणि होर्डींग्सवरचे स्टार अधिकाधिक चमकू लागले. मग कॅम्युटर करामत आली आणि होर्डींग्स संस्कृती चकाचक झाली.
डिजिटल मिडियाच्या आजच्या काळात ‘सिनेमाची होर्डींग्स संस्कृती’ खूपच मागे पडलेय. मुंबईत ओशिवरा भागात अधेमधे काही हिंदी चित्रपट, वेबसिरिज, एकादी मालिका, गेम शोज, रियालिटी शोज यांची होर्डींग्स दिसतात. अगदी पूर्वीच्या तुलनेत दुप्पट. पण पूर्वीच्या हुकमी होर्डींग्स स्पाॅटवरची जागा आता चक्क रिकामी असते. गिरगावात गेल्यावर अशा होर्डींग्सच्या जागी काहीही दिसत नाही. वाईट वाटते. अशी अनेक पोस्टर्स/होर्डींग्स पाहून पाहूनच मी सिनेमा एन्जाॅय करायला थिएटरमध्ये गेलो होतो….
‘जाॅनी मेरा नाम’च्या वेळी पंधरवड्यात होर्डींग्स बदलायचे उत्तर मिडियात आल्यावर मिळाले. (शालेय वयातील अशा अनेक गोष्टींची उत्तरे मी मिडियात आल्यावर मिळवली. उगाच ‘पत्रकाराची नोकरी’ करीत राहिलो नाही.) नाझ थिएटरच्या इमारतीत गुलशन राॅय यांच्या माॅडर्न मुव्हीज वितरणचे ऑफिस म्हणजे बडे प्रस्थ. एकदा मुलाखतीचा योग आला असता त्यांनी आपल्या त्रिमूर्ती फिल्मच्या बॅनरखाली ‘जाॅनी मेरा नाम’ची निर्मिती केली तेव्हा जनसामान्यांनाही लक्षात येईल असा होर्डींग्स बदल का केला, असे विचारताच मिळालेले उत्तर आजही लक्षात आहे. ते म्हणाले, “सलग पंधरा दिवस एकच होर्डींग्स पाहिल्यावर मग ते कोण पाहणार? या पंधरा दिवसांत अनेकानी येथून जाता येता ते पाहिले आणि मग आपोआपच दुर्लक्ष करणे सुरु होते. नेमक्या त्याच वेळेस ते बदलायला हवे. ही पब्लिसिटी स्ट्रेटेजी असते….”
गुलशन राॅय यांच्या बोलण्यात साध्या दिसणार्या गोष्टीचे मोठे उत्तर तर मिळालेच. पण होर्डींग्स नाक्याचे महत्त्वही अधोरेखित झाले. मुंबईतील पहिले होर्डींग्स म्हणून महाराष्ट्र फिल्म कंपनी निर्मित बाबुराव पेंटर दिग्दर्शित ‘सैरंध्री’ (१९२०) या मूकपटाचे नाव घेतले जाते. स्वत: बाबुराव पेंटर यांनी ते डिझाईन केले होते आणि आपल्या ‘चित्र आणि चरित्र’ या आत्मचरित्रात यासंदर्भात त्यांनी लिहिले आहे. त्या काळात ते धोबीतलावमधल्या मेट्रो थिएटरसमोर लावले होते आणि ते पाहायला रसिकांची गर्दी झाली होती. एका कलेचा प्रवास असा वेगळ्याच पध्दतीने सुरु होतो.
त्यानंतरच्या काळात जी. कांबळे, नाना लोंढे, एन. आर. भोसले, जय आर्ट, गुरुजी बंधु, जी. कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि गुणवंत अशा कलाकारांनी ही कला आणखीन पुढे नेली. त्या काळात अनेक होर्डींग्सवर एखाद्या कोपर्यात एखाद्या स्टाईलमध्ये त्यांचे नाव दिसे. पण अनेकदा त्या डिझाईन/ले आऊट/स्केच/ स्पेसचा वापर यावरुन हे होर्डींग्स कोणाचे असेल याची कल्पना येई. त्या होर्डींग्सवर सिनेमाचे स्वरुप दिसून येई आणि रसिकांच्या मनामध्ये अशा आगामी सिनेमाबाबतचे ‘चित्र’ स्पष्ट होत जाई. ‘टाॅकीजच्या गोष्टी’कडे नेण्याचा एक इप्रेसिव्ह मार्ग म्हणजे होर्डींग्स.
नाना लोंढे त्या काळात दादरला डी. एन. वैद्य रोडवरील आपल्या स्टुडिओत होर्डींग्स रंगवत आणि ती पाहण्यासही गर्दी होई. चित्रपती व्ही. शांताराम, राज कपूर, मेहबूब खान, गुरुदत्त, के. असिफ, बी. आर. चोप्रा, विजय आनंद, यश चोप्रा यांच्या चित्रपटांच्या पोस्टर/होर्डींग्स ‘यात दिग्दर्शक दिसतो’ बघा. याचे कारण अर्थातच ते स्वतः त्यात लक्ष घालत. चित्रकाराशी चर्चा करत. आपला सिनेमा अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहचण्यात असा रस घेणे उत्तमच.एन. आर. भोसले हे प्रामुख्याने चित्रपती व्ही. शांताराम, राजश्री प्राॅडक्सन्स, बी. नागी रेड्डी, दादा कोंडके यांच्या चित्रपटाची पोस्टर्स/होर्डींग्स रंगवत.
एन.आर. भोसले यांचा मुलगा सुदेश भोसले. ‘मी एन्टरटेनर आहे’ असे सुदेश भोसले आवर्जून सांगतो. अर्थात मिमिक्री ते पार्श्वगायक असा त्याचा चतुरस्र प्रवास आहे. भोसले कुटुंबिय गोरेगावात स्थिरावलेले. आणि स्टुडिओ वरळीला. एकदा सुदेश भोसले आपल्या वडीलांच्या स्टुडिओत गेला असता त्यांनी ‘प्रेम नगर'(१९७४) सिनेमाचे रंगवलेले पोस्टर पाहून छोटा बोर्ड घेतला आणि हुबेहुब तसेच स्केच काढले. ते पाहून त्याचे वडील आणि त्यांचे सहकारी आश्चर्यचकित झाले आणि तेव्हा शाळेच्या सुट्टीत सुदेश भोसलेनी ‘प्रेम नगर’ची बरीच होर्डींग्स रंगवली आणि ती मुंबईत अनेक ठिकाणी लागलीदेखील. १९८२ सालापर्यंत त्यांनी ज्युली, स्वयंवर, स्वर्ग नरक इत्यादी चित्रपटांचे पोस्टर डिझाईन केले.
=========
हे देखील वाचा : गीतविरहित रहस्यमय इत्तेफाक, तर एका खुनाची रहस्यमय कथा ‘धुंद’
=========
नाझ थिएटरच्या इमारतीत वितरकांची अनेक लहान मोठी कार्यालये असल्याने त्या कंपाउंडमधील होर्डींग्स आगामी चित्रपटांची सहा सात महिने जणू वर्दी देत. येथील होर्डींग्स बिझनेसचा एक भाग असत. गंमत म्हणजे यातील एखादे होर्डींग्स अनेक महिन्यांनी उतरले तरी तो सिनेमा मुंबईत आलेला नसे. राहुल रवैल दिग्दर्शित ‘गुनहगार’ या चित्रपटाबाबत अगदी हेच मी अनुभवले. एखादे होर्डींग्स एकदम ‘हाॅट’ असे. अनेक प्रकारचे सिनेमे पडद्यावर येतात म्हटल्यावर होर्डींग्सही अनेक प्रकारची असणारच.
बदलत्या काळाबरोबर पुढील पिढीत असेच काही गुणी, मेहनती पोस्टर डिझायनर आले आणि ही परंपरा सुरु राहिली. अशातच अमरजीत निर्मित व सुनील दत्त दिग्दर्शित ‘राॅकी’ या चित्रपटाचे मरीन ड्राईव्हवरील एक होर्डींग्स पोलिसांनी उतरवले. मोटार सायकलवर ओलेत्या रुपात पिळदार छाती उघडी असलेला संजय दत्त व शाॅर्टसमधील टीना मुनिम रोमान्स करताहेत असे ते बोल्ड होर्डिंग होते. संजूबाबाचा हा पहिलाच सिनेमा आणि त्याची पूर्वप्रसिध्दी नुकतीच सुरु झालेली… नर्गिसजींनीही याबाबत नापसंती व्यक्त केली होती.
होर्डींग्स असा बहुस्तरीय विषय. लहानपणापासूनच मी पाहत आलोय. पूर्वी घराबाहेर पडलेला माणूस बाहेरच्या जगात फिरताना, इकडेतिकडे पाहताना कुठे ना कुठे सिनेमाचे पोस्टर/होर्डींग्स हमखास नजरेत पडे. आता मोठ्याच प्रमाणावर मोबाईलवर लक्ष असते. चालतानाही कानाला मोबाईल असतो. अशा वेळी होर्डींग्सवर नजर जाईलच कशी? अशा अगणित होर्डींग्सने (Memories of hoardings) शहर विद्रूप होते असेही म्हटले जाई. पण अनेक सिनेमांचे थिएटरमध्ये आगमन होत आहे हे चारेक महिने अगोदरपासूनच रसिकांच्या मनावर ठसवण्यात होर्डींग्स महत्त्वाची भूमिका बजावत. गंमत म्हणजे काही होर्डींग्स स्पाॅट अनलकी म्हणूनही दुर्दैवाने ओळखले जात. सिनेमा म्हटले की लकी आणि अनलकी हा फंडा असणारच म्हणा!