‘हा’ अभिनेता व्हिलनगिरी सोडून कॉमेडीकडे वळला..
दिल्लीच्या सुनील कपूर या कलाकाराने बॉलीवूडमध्ये मोठे नाव कमावले आहे. ८० च्या दशकात तर तो आघाडीचा खलनायक झाला. तुम्ही म्हणाल कोण हा सुनील कपूर? बरोबर आहे, हे त्याचे खरे पाळण्यातले नाव. पण तुम्ही आम्ही ओळखतो त्याला शक्ती कपूर म्हणून! १९७८ साली ज्या वेळी सुनील दत्त ने त्याला आपल्या आगामी प्रोजेक्ट मधील व्हिलनच्या भूमिकेसाठी त्याचे नाव फायनल केले त्या वेळी व्हिलनसाठी सुनील कपूर हे नाव खूपच सॉफ्ट वाटल्याने त्यांनी ते बदलले. सिनेमात जाण्याचा शक्तीचा निर्णय त्याच्या घरच्यांना अजिबात आवडला नव्हता, त्यांचा विरोधच होता. त्यांचा दिल्लीत चांगला बिझिनेस होता. कॅनॉट प्लेस येथे गारमेंट्सचा मोठा व्यवसाय होता. पण शक्ती कपूरला(Shakti Kapoor) अभिनयातच करिअर करायचे होते. त्यामुळे तो मुंबईमध्ये आला. सुरुवातीला त्याला भरपूर स्ट्रगल कराव लागल. काही जाहिरातीतून तो लोकांसमोर आला. आणि नंतर हळूहळू तो एस्टॅब्लिश स्टार होत गेला.
परंतु त्याचे आई वडील हे पारंपरिक विचारांचे होते. आपला मुलगा सिनेमात गेला म्हणजे ‘वाया गेला’ असं त्यांना वाटत होतं. त्यांनी त्याचा एकही सिनेमा पाहिला नव्हता. १९८७ साली शक्ती जेव्हा दिल्लीला आपल्या घरी गेला त्यावेळी त्याचा ‘इंसानियत के दुश्मन’ नावाचा एक चित्रपट रिलीज झाला होता. शक्ती कपूरच्या(Shakti Kapoor) अभिनयाचा बोलवाला आणि त्याचे वर्तमानपत्रात येणारे नाव, मासिकातून झळकणारे फोटो यामुळे त्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांनी शक्तीच्या आई-वडिलांना शक्ती कपूरच्या करिअर बद्दल सांगितले. हळूहळू त्यांचा विरोध कमी होत गेला. मग शक्ती कपूर(Shakti Kapoor) दिल्लीला आला. ‘इन्सानियत के दुश्मन’ हा चित्रपट पाहण्यासाठी तो आपल्या सर्व कुटुंबा सोबत थियेटर वर गेला. पडद्यावर आपल्याला आता आपल्या आई वडील पाहणार आहेत ही भावना त्याला खूप आनंद देणारी होती.
========
हे देखील वाचा :गीतविरहित रहस्यमय इत्तेफाक, तर एका खुनाची रहस्यमय कथा ‘धुंद’
========
सिनेमा सुरू झाला सर्व फॅमिली सिनेमा एन्जॉय करू लागली. पण ज्यावेळी शक्ती कपूर(Shakti Kapoor) अभिनेत्री अनिता राज वर बलात्कार करतो तो शॉट बघून शक्ती कपूरची आई वडील प्रचंड चिडले. थेटर मधूनच ते उठले आणि बाहेर चालू लागले. त्यांच्या पाठोपाठ शक्ती बाहेर पडला. त्याने विचारले ,”तुम्ही कुठे चाललात?” त्यावर आई म्हणाली,” एक शब्द बोलू नकोस. असली घाणेरडी काम करतोस. स्वत:ला बदनाम तर केलं आहेस आता आपल्या घराण्याचे नाव देखील तू बदनाम करायला निघाला आहेस. यापुढे मला तुझा तोंड देखील पाहण्याची इच्छा नाही!” यावर शक्ती म्हणाला ,” असं काहीही नसतं. हे सर्व नाटक असतं. खोटं खोटं असतं.” त्यावर त्याचे वडील म्हणाले,” अस आहे कां? मग सिनेमातील चांगल्या भूमिका का करत नाहीस? हेमामालिनीच्या तू सोबत काम कर. तिचा भाऊ म्हणून सज्जन व्यक्तीचे काम कर. महिलांचे रक्षण करणे, स्त्रियांशी सन्मानाने वागणे, त्यांचा आदर करणे ही उत्तम पुरुषाची लक्षणे आहेत. असले घाणेरडे काम करण्यासाठी कशाला आयुष्य वाया घालवतोय?” शक्ती कपूर(Shakti Kapoor) ला मनातून आनंद होत होता. कारण त्याच्या अभिनयाला मिळालेली ही दाद होती पण त्याचवेळी अंतर्मुख होऊन तो विचार करू लागला… खरोखरच माझ्या आई-वडिलांना त्रास होत असेल तर मी का अशा भूमिका करायच्या? आणि त्यानंतर त्याने हळूहळू रेप सीन्स असलेले सिनेमे टाळणे सुरू केले. या चित्रपटानंतर अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सिनेमे त्यांनी केले ज्यामध्ये रेप सीन्स होते. हळूहळू त्याने स्वतःला विलन कडून कॉमेडी अॅक्टरकडे परावर्तीत केले. ’नंदू सबका बंधू’ म्हणून सर्वाना मनमुराद हसवले…
धनंजय कुलकर्णी