Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

‘आदिपुरुषची’ होतेय वाहवा आणि टिकाही…
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटावरुन गेल्या वर्षी अक्षरशः महाभारत झालं. गेल्या वर्षी या चित्रपटाचा एक छोटासा टीझर प्रदर्शित झाला आणि चित्रपटातील राम, सिता आणि हनुमानाच्या लुकवरुन दिग्दर्शक ओम राऊत यांच्यावर सोशल मिडियात कमालीची टिका झाली. ही टिका एवढी टोकाची होती की, ओम राऊत यांना आदिपुरुष या थ्रीडी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख बदलावी लागली. शिवाय चित्रपटातील काही सिन नव्यानं करावे लागले. आदिपुरुष हा ओम राऊत आणि प्रभास यांच्यासाठी महत्त्वाचा चित्रपट आहे. आता या आदिपुरुष (Adipurush) चित्रपटाचे पोस्टर रामनवमीच्या निमित्ताने दिग्दर्शक ओम राऊत यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन प्रदर्शित केले आहे. अभिनेता प्रभास, सनी सिंह, क्रिती सेनॉन आणि मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे यात दिसत आहे. “मंत्रो से बढके तेरा नाम जय श्रीराम” अशी कॅप्शनदेखील या पोस्टरला दिली आहे. गेल्या वर्षी आदिपुरुषचा (Adipurush)टिझर प्रदर्शित झाल्यावर उठलेल्या वादळात या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते. काही राज्यात तर चित्रपटाला बॅनही करण्यात आले होते. त्यामुळे आता ओम राऊत एक-एक पाऊल काळजीपूर्वक टाकत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे त्यांनी आदिपुरुषचे फक्त पोस्टर जाहीर करुन चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. मात्र आताही या चित्रपटावर मतप्रवाह असल्याचे समोर आले आहे. कारण आदिपुरुषच्या (Adipurush) या पोस्टरचे काही चाहत्यांनी स्वागत केले आहे. तर काही प्रेक्षकांनी आताच त्याला फ्लॉप चित्रपट असा शिक्का मारला आहे.

ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) या आगामी चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाचा एक छोटासा टीझर प्रदर्शित झाला आणि एकच वादळ उठलं. यातील स्पेशल इफेक्ट आणि रावणाचा लूक यावरून लोकांनी ओम राऊतला प्रचंड ट्रोल केलं. हा चित्रपट बॉयकॉट करण्याचे आवाहन करण्यात आले. मुख्यतः हनुमानाच्या लूकवर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे हा टिझर मागे घेण्याची वेळ आदिपुरुषच्या टिमवर आली होती. या सर्व टिकेमुळे स्वतः प्रभासही खूप नाराज झाल्याची चर्चा होती. ओम राऊतकडे त्याने ही नाराजी बालून दाखवली. आधीच प्रभासला बाहुबलीनंतर अपेक्षित यश मिळालेलं नाही. त्याच्या कारकीर्दीला उतरती कळा लागल्याची चर्चा होत असतांना त्याला आदिपुरुषकडून (Adipurush) ब-याच आशा आहेत. अशात आदिपुरुषवर (Adipurush) प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केला तर आपल्या करिअरवर परिणाम होईल, हे प्रभास जाणून होता. त्यानं चित्रपटातील काही दृष्य पुन्हा चित्रित करण्याची अटही ठेवल्याची माहिती आहे. त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन आता जून महिन्यापर्यंत लांबले गेले आहे. आता याच आदिपुरुष (Adipurush) चित्रपटाचे पोस्टर झाल्यावर पुन्हा उलटसूलट प्रतिक्रिया सुरु झाल्या आहेत.

प्रभासनेही रामनवमीच्या मुहूर्तावर पहाटे चाहत्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आणि आदिपुरुषचे (Adipurush) पोस्टर शेअर केले. त्यांनी इंग्रजी, हिंदी आणि तेलगूमध्ये ‘तुझे नाव मंत्रांपेक्षा मोठे आहे, जय श्री राम.’ असे लिहून हे पोस्टर आपल्या सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे. प्रभासशिवाय अभिनेत्री कृति सेनन हिनेही हे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये रामाच्या भूमिकेत प्रभास, माता सितेच्या भूमिकेत क्रिती सेनॉन, लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंग आणि हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे दिसत आहे. ‘आदिपुरुष’ 16 जून रोजी IMAX आणि 3D मध्ये मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज असल्याची माहितीही चित्रपटाच्या टिमनं दिली आहे.
या पोस्टरवर आता काही चाहत्यांनी प्रभासला योग्य भूमिकेत अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी चित्रपटाची प्रतीक्षा असल्याचे म्हटले आहे. पण यापेक्षा चित्रपटावर टिका करणा-यांची संख्याच अधिक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. प्रेक्षक अद्यापही आदिपुरुषमधील (Adipurush) राम, लक्ष्मण, सीता आणि हमुमानाच्या चित्रपट आणि पात्रांच्या लूकवर समाधानी नाहीत. नवीन पोस्टर समोर येताच सोशल मीडियावर आदिपुरुष पुन्हा ट्रोल व्हायला लागला आहे. एका युजरने लिहिले आहे, ‘जे काही मनात येत आहे ते बनवून ठेवले आहे, आदिपुरुष हा पैशाचा अपव्यय आहे आणि तो केवळ हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा आहे. आणखी एका युजरने लिहिले- ‘कार्टून फिल्म.’ तिसऱ्या यूजरने लिहिले- ‘कृपया सोडा, तुम्ही कोणाच्या संस्कृतीची खिल्ली का उडवत आहात.’ ‘आदिपुरुष’च्या (Adipurush) नवीन पोस्टरमधील राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या लूकवर चाहत्यांनी उपस्थित केले आहेत ‘तुम्ही संस्कृतीची चेष्टा करत आहात’ असाच सूर अन्य प्रतिक्रीयांमध्येही आहे. एकाने लिहिले, “100% फ्लॉप.” पोस्टरमध्ये लक्ष्मणच्या पोशाखावर निशाणा साधताना एका प्रेक्षकानं, लक्ष्मणाने घातलेल्या डिझायनर लेदरच्या पटट्यावर आक्षेप घातला आहे.” आणखी एका यूजरने लिहिले आहे, आम्ही हनुमानाचा लूक स्वीकारणार नाही. तर अन्य यूजरने ‘कार्टूनचे VFX यापेक्षा चांगले आहेत, अतिशय निरुपयोगी पोस्टर.’
=====
हे देखील वाचा : व्हाईट हाऊसच्या तळघरातील रहस्य सांगणारी ‘ही’ वेबसिरीज
=====
आदिपुरुष (Adipurush) याआधी जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार होता, पण टीझरच्या भोवतीचा वाद पाहता निर्मात्यांनी त्याची रिलीज डेट वाढवली. हा चित्रपट हिंदीबरोबरच तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अभिनेता प्रभास श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री कृति सेनन सीता माता आणि अभिनेता सनी सिंह लक्ष्मणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे. आता आदिपुरुष (Adipurush) 16 जून रोजी प्रदर्शित होत आहे. ओम राऊत यांच्यासारख्या दिग्दर्शकाच्या नजरेतून रामायण बघण्याची ही चांगली संधी आहे. मात्र त्यातील राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या लूकबाबत प्रेक्षकांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.