‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अभिजात मराठी चित्रपट ‘आम्ही जातो आमुच्या गावा…’
पन्नास आणि साठच्या दशकामध्ये मराठी चित्रपटात (Marathi Movie) सामाजिक प्रश्नांवरील चित्रपटांना रसिक चांगला प्रतिसाद देत असत. त्या मुले या काळात उत्तम कथानक असलेल्या साहित्य कृती किंवा इतर भाषिक कलाकृती वरून प्रेरणा घेवून चांगले सिनेमे बनत. अशाच एका अभिजात मराठी चित्रपटाच्या (Marathi Movie) मेकिंगची छोटी शी कहाणी सांगतोय. हा मराठी चित्रपट बनायला तब्बल सात आठ वर्ष लागली, कारण अर्थातच बजेट. पण नंतर जेव्हा हा सिनेमा आला तेव्हा रसिकांनी आणि समीक्षकांनी त्याचे उदंड स्वागत केले. कोणता होता हा सिनेमा?
१९५५ साली एक इंग्रजी सिनेमा आला होता ’वुई आर नो एंजल्स’ या सिनेमाची प्रेरणा घेऊन विद्याधर गोखले यांनी एक मराठी नाटक होतं ’अमृत झाले जहराचे’ या नाटकाची फारशी दखल कुणी घेतली नाही. १९६६ साली संगीतकार सलील चौधरी यांनी याच कथानकावर एक सिनेमा दिग्दर्शित केला होता ’पिंजरे के पंछी’. मीनाकुमारी, अभी भट्टाचार्य, बलराज सहानी, मेहमूद हे कलावंत असूनही सिनेमा पार झोपला. ’वुई आर नो एंजल्स’चा भारतीय अवतार काही केल्या हिट होत नव्हता. अशा नकारात्मक अनुभवानंतर एक तिसरा प्रयोग आपल्या मराठीत कमलाकर तोरणे यांनी याच कथानकावर केला व चित्रपट बनविला ’आम्ही जातो आमुच्या गावा. १९६८ साली आलेल्या सिनेमाने (Marathi Movie) मात्र उदंड यश मिळविले. या सिनेमाच्या मेकींगची कथा फार इंटरेस्टींग आहे. हा सिनेमा जरी १९६८ ला प्रदर्शित झाला असला तेरी तो सेटवर १९६३ सालीच गेला होता. सिनेमाचे कथानक सुंदर होते. तीन चोर एका घरात चोरीच्या उद्देशाने शिरतात पण घरातील लोकांकडून मिळालेल्या प्रेमाच्या वागणूकीने त्यांच्यातील माणूसकी जागी होते व ते सन्मार्गाला लागतात. सूर्यकांत, गणेश सोळंकी, धुमाळ हे यात तीन चोरांच्या भूमिकेत होते. उमा, श्रीकांत मोघे ही जोडी यात होती. विनोदासाठी मधू आपटे होता. रामचंद्र वर्दे, माई भिडे,जयशंकर दानवे यांच्या देखील यात भूमिका होत्या. कथा,पटकथा आणि संवाद मधुसूदन कालेलकर यांचे होते. गाणी जगदीश खेबूडकर आणि वंदना विटणकर यांची होती तर संगीत सुधीर फडके यांचे होते.
सिनेमाची निर्मिती मोठ्या उत्साहात सुरू झाली पण आर्थिक कारणाने सिनेमा रखडत गेला व एक दिवस चक्क डब्यात गेला! एक चांगला सिनेमा डब्यात जातोय हे कमलाकर तोरणेंना पटेना त्यांनी पैसा जमवायला सुरूवात केली. इंडस्ट्रीत ते नवे असल्याने त्यांची तितकी पत नव्हती. सावकार दारात उभे करीत नव्हता. पण एक सावकार मिळाला रावल नावाचा. त्याने अव्वाच्या सव्वा व्याज दराने कर्ज दिले व सिनेमाचे शूट पुन्हा सुरू झाले. कलाकारांच्या भूमिकेकरीता घेतलेले कपडे आता विटले होते, फाटले होते पण त्याच कपड्यात शूटींग करण भाग होतं. सिनेमा (Marathi Movie) एकदाचा पूर्ण झाला आणि ९ ऑगस्ट १९६८ रोजी प्रदर्शित होऊन सुपर हिट झाला. तोरणेंनी खुश होऊन सर्व कलावंताना चांदीच्या ट्रॉफी दिल्या. त्यावर सूर्यकांत म्हणाले ’विटलेल्या कपड्यात आम्ही काम केले आणि तोरणेंनी आम्हाला चांदीच्या ट्रॉफी दिल्या आमच्या मेहनतीला चांदीचे ठिगळ लागले!’ यातील ’देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा’,’ मी आज फूल जाले,’हवास तू हवास तू ’ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर’, स्वप्नात रंगले मी …ही गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. या चित्रपटात आणखी एक गाणं होतं जे वंदना विटणकर यांनी लिहिलं होतं. यातील इतर सर्व गाणी जगदीश खेबुडकर यांनी लिहिली होती. परंतु ऐनवेळी ते आजारी पडल्यामुळे एका गाण्यासाठी वंदना विटणकर यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी लिहिलेलं आहे हे पहिलंच चित्रपट गीत होतं. अक्षरशः काही तासांमध्ये त्यांनी हे गाणं लिहिलं. कारण दुसऱ्या दिवशी बॉम्बे लॅबमध्ये या गाण्याचे रेकॉर्डिंग होणार होते. कमलाकर तोरणे यांनी वंदना विटणकर यांना गाण्याची सिच्युएशन सांगितली आणि त्यांनी ताबडतोब हे गाणे लिहायला घेतले. आशा भोसले यांनी हे गाणं गायलं. चित्रपटातील इतर गाण्यांच्या तुलनेत या गाण्याला फारसं यश किंवा लोकप्रियता मिळाली नाही परंतु या गाण्याला १९६९ सालचा महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट गीताचा पुरस्कार मात्र मिळाला.
=====
हे देखील वाचा : खुल्लमखुल्ला ऋषी कपूर!
=====
हे गाणं होतं उजळू स्मृती कशाला अश्रूत दाटलेली? सांगू कशी कहाणी स्वप्नात रंगलेली?’ १९६९ सालच्या महाराष्ट्र शासनाच्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यावर या सिनेमाची मोहर उमटली व तब्बल नऊ पारितोषिके या सिनेमाला मिळाली. पुढे १९७३ साली याच कथानकावर ’तीन चोर’ हा एक हिंदी सिनेमा आला होता पण तो देखील फ्लॉप झाला. आज एक अभिजात मराठी चित्रपट म्हणून आपण ‘आम्ही जातो आमुच्या गावा’कडे पाहतो!