‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
श्रीदेवीची सख्खी जुळी बहिण?
हा एप्रिल महिना चालू आहे. त्या निमित्ताने ‘एप्रिल फूल’ चा तीस-बत्तीस वर्षापूर्वीचा एक भन्नाट किस्सा! अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) हिची एक जुळी सखी बहिण प्रभादेवी अचानकपणे एका फिल्मी मॅगझिनच्या कव्हरवर झळकली आणि सर्व देशभरात मोठा हलकल्लोळ माजला. श्रीदेवी इतकीच किंबहुना तिच्यापेक्षा काकणभर जास्त सुंदर दिसणारी प्रभादेवी त्या दिवशी संपूर्ण देशातील चर्चेचा विषय ठरली होती. इतक की, प्रभादेवी एवढे दिवस कुठे होती? काय करत होती? लहानपणी कशी काय गायब झाली? या चर्चांना उत आला होता. फोटोत ही प्रभादेवी मात्र भयंकर सुंदर दिसत होती. कोण होती ही प्रभादेवी? नंतर पुढे तिचे काय झाले? हा अतिशय भन्नाट किस्सा आहे. श्रीदेवी (Sridevi) हिंदी चित्रपटाच्या दुनियेत ‘हिम्मतवाला’ या सिनेमापासून आली तशी त्यापूर्वी ही एका सिनेमात ती झळकली होती (१९७९ साली अमोल पालेकर सोबत ‘सोलवा सावन’) पण तो चित्रपट काही चालला नव्हता. ‘हिम्मतवाला’ ने मात्र तिला आघाडीची अभिनेत्री बनवले. ‘हिम्मतवाला’ प्रदर्शित झाला होता १९८३ साली. त्यानंतर ती टॉपची अभिनेत्री बनली होती. सर्व अभिनेते, सर्व दिग्दर्शक तिच्यासोबत काम करायला उत्सुक होते.
१९९१ सालच्या एप्रिल महिन्यामध्ये ‘सिनेब्लिट्झ’ या चकचकीत फिल्म मॅगझिनमध्ये मुखपृष्ठावर एक फोटो झळकला. त्यात फोटोत जी अभिनेत्री होती, ती श्रीदेवी सारखी दिसणारी होती. मॅगझिनचा असा दावा होता की, ही श्रीदेवीची (Sridevi) सख्खी जुळी बहीण आहे. जी लहानपणीच हरवली होती. ती आम्हाला आता सापडली आहे! तिच्या या फोटोने देशभर सर्वत्र मोठा हंगामा झाला. कित्येक निर्माते तर तिला साइन करण्यासाठी ‘सिनेब्लिट्झ’च्या कार्यालयात जाऊन पोहोचले आणि तिचा पत्ता आणि फोन नंबर मागू लागले! प्रत्येक जण तिच्याविषयी जाणून घ्यायला उत्सुक होते. इतकी उत्सुकता त्या फोटोने वाढवली होती. काय होता सर्व प्रकार? कोण होती ही प्रभादेवी? हा सर्व प्रकार म्हणजे एप्रिल फुल होते!! कारण हा अंक एक एप्रिल १९९१ रोजी स्टॉलवर आला होता. मग प्रभादेवी म्हणून मुखपृष्ठावर झळकलेली ही अभिनेत्री कोण होती? तर ती अभिनेत्री नव्हतीच. तर तो होता अभिनेता अनुपम खेर!! अनुपम खेरलाच स्त्री रूपामध्ये दाखवून श्रीदेवीची जुळी बहिण बनवले होते! हा सर्व प्रकार इतका सिक्रेटली बनवला गेला होता की, अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) वगळता कुणालाच याबद्दल काहीही माहिती नव्हत. सुरुवातीला तर श्रीदेवीला देखील अंधारात ठेवण्यात आले होते. त्यावेळी श्रीदेवी आणि अनुपम खेर एका चित्रपटाचे शूट मुंबईमध्ये करत होते.
त्यादिवशी अनुपम खेर श्रीदेवीला म्हणाले,” मी तुला लवकरच एक मोठे सरप्राईज देणार आहे!” त्यावर तिची उत्सुकता वाढली आणि ती म्हणाली,” काय सरप्राईज मिळणार आहे?” त्यावर अनुपम खेर म्हणाले,” हे मी तुला आता सांगणार नाही पण तू त्यावर भरपूर हसणार आहेस!” त्यानंतर श्रीदेवीचे (Sridevi) शूट झाल्यानंतर ती मद्रासला रवाना झाली. तिथे काही सिनेमाचे डबिंग तिने पूर्ण केले. एक दिवस घरी गेल्यानंतर तिची बहीण आणि मेहुणे थोडे सिरीयस मूडमध्ये दिसले. तिने कारण विचारले काय झाले त्यावर त्यांनी सिनेब्लिट्झचा ताजा अंक समोर टाकला आणि म्हणाले,” हा काय प्रकार आहे? तुझी कोणती जुळी बहीण आहे? आणि हा वात्रटपणा नेमका काय आहे?” त्यावर श्रीदेवीने (Sridevi) गंभीरपणे पाहायला सुरुवात केली आणि जोरजोरात हसायला लागली. आणि हळूहळू तो किस्सा तिने घरी शेअर केला. या कव्हर फोटोने देशभरात मोठा हंगामा निर्माण झाला. तो अंक अक्षरशः ब्लॅकने विकला गेला! नंतर पुढच्या अंकांमध्ये सविस्तर सिनेब्लिट्झ खुलासा केला आणि हा एप्रिल फूलचा प्रकार होता असे सांगितले!
नंतर या अनुपम खेरच्या मेक ओव्हर बद्दल त्यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितले. मेकअपमन मिकी कॉन्ट्रॅक्टर आणि छायाचित्रकार गौतम राज्याध्यक्ष या दोघांच्या कल्पनेतून हा सर्व प्रकार घडला होता. अनुपम खेरला स्त्री वेशात दाखवण्याचे खरं तर आव्हान होते. एकतर त्यांना संपूर्ण टक्कल होते! ते झाकण्यासाठी अनेक क्लुप्त्या कराव्या लागल्या. तब्बल दोन ते तीन तास त्यांचा मेकअप करण्यात आला. त्यांचे चुंबनोत्सुक रसरशीत दाखवण्यासाठी खूप मेहनत घेण्यात आली! आणि दोन-तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांचा लूक बऱ्यापैकी श्रीदेवी सारखा झाला. मग सुरू झाले फोटो सेशन. गौतम राज्याध्यक्ष त्यांच्या ‘फेसेस’ या पुस्तकात सांगतात की खुद्द अनुपम खेर यांचा विश्वास देखील फोटो बघून बसला नाही इतके जबरदस्त ट्रान्समिशन घडले होते. सिनेब्लिट्झ च्या वाचकांना देखील हा मोठा धक्का होता. एप्रिल फुल चा प्रँक इतका प्रभावीपणे वाचकांवर बसला होता की ते देखील आश्चर्यचकित झाले. छायाचित्रकार गौतम राज्याध्यक्ष सांगतात अभिनेत्री जया भादुरी हिचा देखील सुरुवातीला विश्वास बसला नाही की ते अनुपम खेर आहेत!
======
हे देखील वाचा : ‘हा’ सिनेमा जयदेव यांच्या हातातून कसा गेला?
=====
अशा पद्धतीने १ एप्रिल १९९१ च्या सिनेब्लिट्झच्या अंकाने एप्रिल फूलच्या निमित्ताने मोठी खळबळ उडवून दिली होती. हा एप्रिलचा महिना आहे त्यानिमित्ताने हा एक जुना ‘ब्लास्ट फ्रॉम पास्ट’ आपल्या कलाकृती मीडियाच्या वाचकांसाठी. सोबत अनुपमचा तो दिला आहे!