गाडीच्या टपावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाच्या आवाजातून सुचले हे गाणे!
‘शांकुतलम’ची पहिल्या आठवड्याची बुकींग हाऊसफुल्ल
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा प्रभूची प्रमुख भूमिका असलेला ‘शांकुतलम’ हा चित्रपट 14 एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर येत आहे. ‘शांकुतलम’ हा थ्रिडी चित्रपट असून त्याच्या ट्रेलरमधून चित्रपटाच्या भव्यतेची जाणीव होत आहे. सामंथाच्या अभिनयाचे वेगळे रुप यात बघायला मिळणार आहे. फॅमिनी मॅन या वेबसिरीजमध्ये राझी या महिला नक्षलवाद्याची भूमिका साकारणारी सामंथा या चित्रपटात संपूर्णतः वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय शाकुंतलमची अजून प्रतीक्षा आहे, ती एका गोड छोट्या अभिनेत्रीसाठी… ही छोटी अभिनेत्री म्हणजे अल्लू अरहा…साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या सहा वर्षाच्या या मुलीनं शाकुंतलममध्ये राजकुमार भारताची भूमिका केली आहे. त्यामुळेच शांकुतलची प्रतीक्षा वाढली आहे. स्वतः अल्लू अर्जुनही आपल्या या लाडक्या लेकीला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहे. 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणा-या शाकुंतलची पहिल्या आठवड्याची बुकींगही हाऊसफुल्ल झाली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर नवा रेकॉर्ड करेल अशी शक्यता आहे.
शाकुंतलम हा मुळ तेलुगू भाषेतील थ्रीडी चित्रपट गुणशेखर यांच्या दिग्दर्शनाखाली प्रदर्शनास सज्ज झाला आहे. महान कवी कालिदासाने लिहिलेल्या अभिज्ञानम् शाकुंतलम या लोकप्रिय नाटकावर आधारित, चित्रपटात शकुंतलाच्या भूमिकेत सामंथा प्रभू आहे. रामोजी फिल्म सिटी, अनंतगिरी हिल्स आणि आसपासच्या भागात याचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. या चित्रपटाचे सेट हे अतिशय भव्यदिव्य असून चित्रपटाच्या ट्रेलरमधून त्यातील सेटला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. या चित्रपटातील स्टारकास्टही मोठी आहे. दुष्यंतच्या भूमिकेत देव मोहन, मोहन बाबू दुर्वासा महर्षी, अदिती बालन अनसूया, प्रियमवदा म्हणून अनन्या, नागल्ला प्रकाश राज, गौतमी म्हणून गौतमी, मेनका म्हणून मधु, जिशू सेनगुप्ता, सचिन खेडेकर, कबीर बेदी, राजा असुराच्या भूमिकेत कबीर दुहान सिंग, वर्षानी सौंदराजन, शिवम महिपालच्या भूमिकेत मल्होत्रा आणि सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे राजकुमार भरतच्या भूमिकेत अल्लू अरहा ही सुपरस्टार अल्लू अर्जूनची लेक चमकणार आहे.
गेल्या अनेक महिने चर्चेत असलेल्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या सामंथा व्यस्त आहे. तिच्यासाठी हा चित्रपट महत्त्वाचा आहे. गेली दोन वर्ष, सामंथाच्या आयुष्यातील वादळी वर्ष ठरली आहेत. सामंथाचे आयुष्य विस्कटलेले असतानाच शाकुंतलम हा चित्रपट तिच्याकडे आला. वैयक्तिक आयुष्यात असलेली अशांतता या भूमिकेमुळे कमी झाल्याचे सामंथा सांगते. सामंथाचा आणि नागा चैतन्य यांचा ऑक्टोबर 2021 मध्ये घटस्फोट झाला. त्या दरम्यानच समंथा मायोसिटिस या आजाराची शिकार झाली. यातून बरे होत असतांना सामंथाच्या दोन भूमिका वादात सापडल्या होत्या. पुष्पा या चित्रपटातील आयटम नंबर ‘ओओ अंतवा’ करायला तिला खूप विरोध झाला होता. स्वतः सामंथानं करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 7’ या शोमध्येही, याबाबत खुलासा केला होता. त्याशिवाय फॅमेली मॅन या वेबसिरीजमधील तिची राझी ही भूमिका वादग्रस्त ठरली होती. या भूमिकेवरुन सामंथाला मारण्याचीही धमकी मिळाली होती. पण या सर्व भूमिका होत्या. मी फक्त अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे बघितल्याचं सामंथानं सांगितलं. या दोन महत्त्वाच्या भूमिका केल्यावर सामंथा ‘सिटाडेल’ या प्रियंका चोर्पाच्या वेबसिरीजच्या भारतीय रूपांतरातही दिसणार आहे. यामध्ये ती वरुण धवनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
=====
हे देखील वाचा : विनोदवीर कुशल बद्रीके पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत
=====
या सर्वात तिचा शाकुंतलमचा अनुभव वेगळा आहे. नेत्रदीपक VFX आणि चित्तथरारक व्हिज्युअल्सने सजलेल्या या चित्रपटाचे ट्रेलर चित्रपटाची भव्यता सांगत आहेत. 3D मध्ये असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमधून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. स्वतः समांथाने सोशल मिडीयावर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करतांना, ‘प्रेमाच्या या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी सज्ज व्हा. शाकुंतलम 14 एप्रिल रोजी 3D आणि 2D मध्ये जगभरात प्रदर्शित होईल, असे लिहून तिच्या चाहत्यांना चित्रपट बघण्याचे आवाहन केले आहे. सुरुवातीला हा चित्रपट स्विकारण्यास सामंथानं नकार दिला होता. दिग्दर्शक गुण शेखर गरु यांनी या चित्रपटाबद्दल जेव्हा विचारले होते, तेव्हा सामंथा द फॅमिली मॅनच्या राझीमध्ये व्यस्त होती. राझीची भूमिका संपूर्णतः वेगळी होती. त्यातून बाहेर पडत शकुंतलाची भूमिका स्विकारण्यासाठी मनाचे मोठे द्वंद केल्याचे सामंथा सांगते. यासाठी ती दिग्दर्शक गुण शेखर गरु यांचे आभार व्यक्त करते. कारण चित्रपटाचे भव्य सेट बघून ही भूमिका स्विकारल्याचे सामंथा सांगते. याशिवाय स्वतः सामंथा अल्लू अरहाची चाहती झाली आहे. सहा वर्षाच्या या अल्लू अर्जुनच्या लेकीनं पहिल्या दिवसापासून सर्वांची मनं जिंकली होती. पहिल्या दिवशी सेटवर कुठलाही कलाकार थोडा घाबरतो. पण अल्लू अरहा हिनं अत्यंत आत्मविश्वासानं मोठा सीन पहिल्याच शॉटमध्ये ओके केल्याचे सामंथा सांगते. ती जन्मजात सुपरस्टार असल्याचे सामंथा सांगते. एकूण शाकुंतलमची उत्सुकता वाढली आहे. 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा हा थ्रीडी चित्रपट सामंथा आणि अरहासाठी खास ठरणार आहे.