दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
शाकुंतलमची जादू आणि आरहाचं कौतुक…
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा ‘शाकुंतलम’ चित्रपट (Shakuntalam Movie) प्रदर्शित झालाय. ‘शाकुंतलम’ हा सामंथाचा पहिला चित्रपट आहे, जो तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. महाकवी कालिदास यांचे जगप्रसिद्ध महाकाव्य शांकुतलवर आधारीत हा चित्रपट तशाच भव्य स्वरुपात मोठ्या पडद्यावर आणण्यात चित्रपटाचे दिग्दर्शक गुणशेखर यशस्वी झाले आहेत. समंथा प्रभू सह देवमोहन, सचिन खेडेकर, प्रकाश राज या सर्वांच्याच भूमिका उत्तम झाल्या आहेत. पण या शाकुंतलमच्या दोन अभिनेत्री हिट ठरणार आहेत. अर्थात त्यापैकी एक म्हणजे समंथा प्रभू…सामंथा अलिकडे वनवुमन आर्मीसारखी काम करतेय. तिची चित्रपटात एन्ट्री म्हणजेच चित्रपटाच्या यशाची खात्री असते. त्यात ती शाकुंतलममध्ये नितांत सुंदर दिसली आहे. तिची ही भूमिका संस्मरणीय होईल अशीच आहे. मात्र यासोबत एक आणखीही अभिनेत्री या चित्रपटात कौतुक मिळवतेय. ती म्हणजे अरहा अल्लू अर्जून. अल्लू अर्जून या सुपरस्टारची अवघी पाच वर्षाची लेक या चित्रपटात राजकुमार भरतच्या भूमिकेत आहे. अरहाचा सहज वावर, स्पष्ट उच्चार आणि अभिनय यातून तिच्या भावी स्टारपदाची जाणीव होतेय. चित्रपटाच्या भव्यतेबाबत काय बोलावं. ‘शाकुंतलम’ चित्रपट (Shakuntalam Movie) म्हणजे, अत्यंत सुंदर अनुभव असाच अभिप्राय प्रेक्षकांचा येतोय.
‘शांकुतलम’ची कथा (Shakuntalam Movie) तशी सर्वानाच ज्ञात आहे. देवराज इंद्राने महर्षी विश्वामित्रांची तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनका नावाच्या अप्सरेला पृथ्वीवर पाठवले. त्यातून शकुंतलेचा जन्म झाला. या मुलीला कण्व ऋषींनी वाढवले. शकुंतला(सामंथा प्रभू) अत्यंत रुपवान तरुणी झाली. पुढे पुरू वंशाचा राजा दुष्यंत (देव मोहन) कण्व ऋषीच्या आश्रमात आला असतांना त्याची आणि शकुंतलेची भेट झाली. शकुंतला आणि राजा दुष्यंत प्रेमात पडतात आणि त्यांचा गंधर्व विवाह होतो. कण्व ऋषी यावेळी आश्रमात नसतात. त्यामुळे राजी शकुंतलेला आश्रमात सोडून राज्यात परत जातो आणि तिला महाराणीसारखं नगरात आणण्याचं आश्वासन देतो. मात्र राजा परत येत नाही. गरोदर असलेल्या शकुंतलेला अखेर कण्व ऋषी राजदरबारात घेऊन जातात. मात्र एका शापामुळे राजा शकुंतलेला ओळखायला नकार देतो. येथे अपमानीत झालेली शकुंतला रानात जाते आणि भरत नावाचा पराक्रमी राजा जन्माला येतो. (Shakuntalam Movie)
चित्रपटाची ही कथा सर्वांनाच माहिती असली तरी थ्रीडी स्वरुपातील ही कथा पुन्हा मोठ्या पडद्यावर बघतांना नव्यानं कथा जाणून घेण्याचा आनंद मिळतो. या चित्रपटाचे भव्य सेट हे त्याचे पहिले यश आहे. त्यातून थ्रीडी तंत्रज्ञानामुळे सेटची भव्यता अधिक वाढली आहे. या सर्वात नितांत सुंदर आहे तो सामंथाचा वावर. शाकुंतलेची भूमिका सामंथाच करु शकते, हे चित्रपट बघितल्यावर जाणवते. तिच्याशिवाय कोणतीही अभिनेत्री एवढी सुंदर दिसली नसती. शकुंतला ही सुंदर होतीच शिवाय ती एक मानी स्त्री होती. तिच्या व्यक्तिमत्वातील अनेक रुपे दाखवण्यात सामंथा यशस्वी झाली आहे. देव मोहननेही दुष्यंतची भूमिका चोख बजावली आहे. (Shakuntalam Movie)
या सर्वाच्या बरोबरीनं कौतुक मिळवतेय ती अरहा अल्लू अर्जूनची पाच वर्षाची चिमुरडी. तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनची मुलगी अरहा यात राजकुमार भारताच्या भूमिकेत पदार्पण करत आहे. तिच्या या भूमिकेमुळे स्वतः अल्लू अर्जूनही भारावून गेला आहे. अल्लू अर्जुनने त्याच्या मुलीच्या पदार्पणाबद्दल शांकुतलच्या सर्वच टिमचे अभिनंदन केले आहे. अल्लू अर्जुनने त्यासाठी भलामोठा संदेश या टिमला दिला आहे. गुणशेखर गुरु, हे महाकाव्य पडद्यावर आणण्यासाठी माझ्या शुभेच्छा सामंथा रुथ प्रभू, देव मोहन आणि संपूर्ण टीमचेही अभिनंदन. आशा आहे की, तुम्हा सर्वांना माझी मुलगी अल्लू अरहाचा कॅमिओ आवडेल. गुणशेखर गुरु यांना तिला संधी दिल्याबद्दल आभार. या गोड क्षणांची मी नेहमी कदर करेन. यावरुन अल्लू अर्जून त्याच्या मुलीसाठी किती आनंदी आहे, याची कल्पना येते.
=======
हे देखील वाचा : ‘शांकुतलम’ची पहिल्या आठवड्याची बुकींग हाऊसफुल्ल
=======
यापूर्वीही शकुंतल या काव्यावर अनेक चित्रपट आले आहेत. अगदी एन. टी रामाराव आणि बी. सरोजा देवी यांचा 1966 मध्ये आलेला शकुंतल चित्रपटही हिट ठरला होता. मात्र काळानुसार चित्रपटाच्या तंत्रज्ञानामध्ये बदल होत आहे. आता गुणशेखर यांचा शांकुतलम (Shakuntalam Movie) हा असाच तंत्रज्ञानात प्रगत असला तरी, त्याच प्रेमकथेचा धागा धरुन आलेला चित्रपट आहे. एकूण थ्रीडी शाकुंतलमचा अनुभव एकदा तरी घ्यावा असाच आहे.