‘रूप तेरा मस्ताना’ गाण्याच्या मेकींगचा भन्नाट किस्सा
भारतीय सिनेमातील सर्वात उन्मादक, उत्तेजक गीत कोणते? प्रत्येकाचं उत्तर नक्कीच वेगवेगळे असणार पण १९६९ सालच्या ’आराधना’ या चित्रपटातील ’रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दिवाना भूल कोई हमसे ना हो जाये’ हे गाणं व त्याचं पिक्चरायझेशन सर्वात सेन्सुयस समजलं जातं. प्रेमी जीवांच्या आयुष्यात आलेली पहिली धुवांधार पावसातली ओलेती रात्र आणि त्या नंतरचा रोमांचित करणारा एकांत, धुंद वातावरणात, हवेतील गारठा घालवण्यासाठी पेटवलेली आग आता त्यांच्या शरीरात पेट घेऊ लागते. अल्प वस्त्रातील नायिकेचं ओलेतं दर्शन नायकाला पेटवून टाकतं. पहिल्या मिलनासाठी दोन्ही शरीरं पेटून उठतात. मीलनाचा कैफ सारासार विचार करण्याच्या शक्तीवर मात करतो आणि प्रेमात आकंठ बुडालेले ते जीव एक होतात. अशा पेटत्या सिच्युएशनकरीता आनंद बक्षी यांनी ’रोक रहा है हमको जमाना..’ असले शब्द लिहून प्रेमाची आग आणखीनच भडकवली होती! सचिन देव बर्मन यांच संगीत असलं तरी या चित्रपटातील गाण्यांवर पंचम तथा आर डी बर्मन यांचा ठसा दिसून येतो. या गाण्याच्या निर्मितीचे दोन तीन किस्से मशहूर आहेत. (Song Story)
एकतर सचिनदांनी या गाण्याला भटीयाली (पूर्व प्रांतातील लोकधुन) चाल लावली होती. ही चाल खूपच स्लो होती आणि गाण्यातील भावनेला विसंगत अशी होती. किशोरने मग सचिनदांना सुचवले ’दादा क्यूं न हम आपकी वो पुरानी बंगाली धुन ’एकटु पोडे शशुरबडी दिये जाडो घोडा गाडी’ का यहां इस्तेमाल करे?’ त्यावर सचिनदा टुनकन उडी मारून म्हणाले ’ अरे उडीबाबा शोच्ची…!’ मग गाण्याची रिहर्सल सुरू झाली पण अचानक सचिनदांना प्रकृती अस्वस्थतेमुळे इस्पितळात दाखल व्हावे लागल्याने पंचमने या गाण्याचे रेकॉर्डींग केले. यात पाश्चात्य वाद्यांचा अप्रतिम (गिटार,सॅक्सोफोन,ट्रंपेट) अप्रतिम बनवून टाकलं.(Song Story)
या गाण्याबाबतची दुसरी वंदता म्हणजे यातील सर्व गाणी आधी रफीच गाणार होता कारण किशोरचे मार्कॆट त्यावेळी डाऊन होते. वितरकांची पहिली पसंती रफीच होती. राजेशचे आधीचे तीनही सिनेमे फ्लॉप झाले असल्याने किमान गाण्यानी तरी सिनेमा चालावा म्हणून सेफ गेम खेळण्यासाठी रफीचा आवाज वापरायचे ठरले.पण सचिनदाच्या आजारपणात जेव्हा पंचमकडे संगीताची वेळ आली तेव्हा त्याने किशोरचा स्वर घेतला. आदल्या वर्षीच्या ‘पडोसन’च्या गाण्यांनी धुम मचवली होती. सचिनदाच्या अनुपस्थित किशोरची तिन्ही गाणी तयार झाली. पुढे यथावकाश बर्मनदांनी पसंतीची मान डोलावली. आता आव्हान होते शक्ती सामंताच्या वर! या एवढ्या मादक गीताचे चित्रीकरणाचे! हे गाणे त्यांनी जेव्हा मन लावून एकांतात ऐकले तेव्हा त्यांनी ठरवले गाणे एकाच शॉट मध्ये शूट करायचे. त्यांनी ए बी सी असे तीन कॅमेरे तयार ठेवले. एक राऊंड ट्राली मागवली. फिल्मालया स्टुडीओत पावसाळ्या रात्रीचा सेट उभा केला आणि एकसंध सलगपणे तिन्ही कॅमेर्याच्या माध्यमातून गाणं चित्रीत झालं. हा एक जुगार होता पण त्यांनी तो खेळला. राजेश आणि शर्मिला या कलावंताची अप्रतिम साथ होती.(Song Story)
=====
हे देखील वाचा : श्रीदेवीची सख्खी जुळी बहिण?
====
पुढे बर्याच वर्षांनी विविध भारतीच्या एका कार्यक्रमात त्यांना या गाण्याच्या चित्रीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले ’ये गाने मे अपने आप मे एक तेजी थी इस स्पीड को मै अलग अलग शॉट में पिक्चराईज करने धोका नही ले सकता था. और जब रात को मैं यह गाना सुन रहा था तो समझ ही नही आया की “कट” कहाँ पर बोलूँ?’ अशा प्रकारे चित्रीत झालेलं हे पहिलं गाणं होतं. हे गाणे आजही टॉप फाइव्ह रोमॅंटीक गीतात स्थान मिळवून आहे. या गाण्यासाठी किशोरला पहिले फिल्मफेयर मिळाले. रीमिक्स झालेले भारतातील पहिले गाणे ’रूप तेरा मस्ताना…’ हेच होते! जाता जाता या अप्रतिम गाण्यातील saxophone मनोहारी सिंग यांनी वाजवला होता.(Song Story)