Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

वहिदा रहमान करीता प्लेबॅक साठी गीता दत्तचा नकार
चित्रपट निर्मितीच्या वेळेला कधी कधी अनपेक्षितपणे काही प्रश्न समोर उभे राहतात अशा समस्यांचा कधी कोणी विचार देखील केलेला नसतो. पण जेव्हा असे प्रश्न समोर येतात त्याचे हुशारीने उत्तर काढावेच लागते. असाच काहीसा प्रकार गोल्डी विजय आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कालाबाजार’ (१९६०) या पन्नासच्या दशकातील चित्रपटाच्या वेळी झाला होता. गोल्डी विजय आनंद पन्नासच्या दशकाच्या मध्यावर चित्रपटाच्या दुनियेमध्ये आला. सुरुवातीला अभिनेता म्हणून, पण नंतर लवकरच त्याने स्वतःला दिग्दर्शक म्हणून सिद्ध केले. १९५७ साली आलेल्या ‘नौ दो ग्यारह’ या चित्रपटापासून तो फुलफ्लेज डायरेक्टर बनला. त्याच्या पहिल्याच चित्रपटाला चांगले यश मिळाले. यानंतरचा त्याचा चित्रपट होता ‘कालाबाजार’. (Waheeda Rehman)

या चित्रपटात देव आनंद, वहिदा रहमान (Waheeda Rehman) यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सिनेमा कृष्णधवल होता, चित्रपटाला संगीत सचिन बर्मन यांनी दिले होते. या सिनेमांमध्ये एक गाणे होतं ‘रिमझिम के तराने लेके आई बरसात याद आये किसी से वो पहिली मुलाकात….’ आज देखील हे गाणं त्याच्या जबरदस्त गोल्डी टच मुळे प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हे गाणं मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांनी गायलं होतं. तुम्ही जर काळजीपूर्वक आठवून पाहिलं तर हे गाणं सिनेमांमध्ये पार्श्वभूमीवर आहे. म्हणजे या गाण्यात तुम्हाला देवानंद आणि वहिदा रहमान (Waheeda Rehman) दिसतील पण ते हे गाणं गाताना दिसणार नाहीत तर त्यांच्या पार्श्वभूमीवर हे गाणं वाजताना दिसेल. हे असं का झालं? या दोघांच्या तोंडी हे गाणं का देण्यात आलं नाही? याच्यामागे एक फार मोठी स्टोरी होती.
हा चित्रपट १९५८ साली फ्लोअर वर गेला. त्यावेळी वहिदा रहमान आणि गुरुदत्त यांच्यातील प्रेम प्रकरण रंगात आले होते. गुरुदत्त यांचा संसार मोडकळीस आला होता. गुरु वहिदा रहमान मध्ये पुरता गुरफटत चालला होता. ही गोष्ट गुरुदत्त यांची पत्नी गीता दत्त हिला अजिबात आवडत नाही. त्यामुळे तिला वहिदाचा (Waheeda Rehman) द्वेष वाटणं स्वाभाविक होते. आपल्या संसारातची माती करण्यासाठी हीच बया कारणीभूत आहे हा राग तिच्या डोक्यात होता. त्यामुळे तिने “यापुढे वहिदा रहमान साठी मी पार्श्वगायन करणार नाही” असं ठरवलं होतं. या सर्व घडामोडीतच कालाबाजार ची गाणी ध्वनिमुद्रित करायची होती. शैलेंद्र यांनी या चित्रपटातील गाणी लिहिली होती. सचिन दा यांनी या चित्रपटातील एकमेव युगलगीतासाठी रफी आणि गीता दत्त यांचा स्वर ठरवला होता. पण ज्यावेळी गीता दत्तला कळाले की हे गाणे वहिदा रहमान वर चित्रित होणार आहे तिने हे गाणे घ्यायला चक्क नकार दिला. संगीतकार सचिन जो बर्मन यांना हे गाणे गीता दत्तच्या स्वरातच हवे होते. त्यांना दुसरा कुठलाही स्वर त्या गाण्यासाठी नको होता. त्यामुळे त्यांनी हर प्रकारे गीता दत्तची मनधरणी केली.
परंतु गीता दत्त त्यांचे काही ऐकायला तयार नव्हती. काय करायचे? त्यांनी दिग्दर्शक विजय आनंद ला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर विजय आनंद गीता दत्त आणि सचिन दा यांची एक मीटिंग झाली. त्यात या विषयावर भरपूर चर्चा झाली. गीता दत्ताच्या भावना खूप तीव्र होत्या ती कोणत्याही परिस्थितीत वहिदासाठी पार्श्वगायन करणार नव्हती. तिच्या भावनांचा देखील आदर केला जाईल आणि आपले काम देखील होईल यावर काहीतरी तोडगा काढावा यावर विचार सुरू झाला आणि त्यातून एक सुवर्ण मध्य काढला गेला. गोल्डी ने असे सुचवले की गीता दत्तने पार्श्वगायन करावे परंतु हे गाणे वहिदा रहमान वर चित्रपटात चित्रित केले जाणार नाही तर हे गाणे फक्त पार्श्वभागी वाजवले जाईल. सचिन दा यांना हा तोडगा खूप आवडला ते उडी मारून,” उडी बाबा ये तो बहुत अच्छा हुआ!” असं म्हणाले. गीता दत्त देखील या प्रकाराला तयार झाली.
======
हे देखील वाचा : मध्यरात्री ‘या’ अप्रतिम भक्तीगीताची चाल सुचली!
======
अशा प्रकारे या गाण्याचे ध्वनिमुद्रण पार पडले या चित्रपटात गीता दत्त आणि सुधा मल्होत्रा यांच्या स्वरात ना मै धन चाहू ना रतन चाहू.. हे गाणे देखील रेकॉर्ड केले गेले. हे गाणे चित्रपटांमध्ये लीला चिटणीस आणि नंदा यांच्यावर चित्रित झाले. गीता दत्त यांनी वहिदा साठी न गाण्याचा जो प्रयत्न केला होता तो शेवटपर्यंत पाळला कारण त्यानंतर ‘चौदहवी का चांद’ या चित्रपटात देखील वहिदा रहमान नायिका होती त्यात गीता दत्तला एक गाणे होते (बालम से मिलन होगा) पण ते देखील वहिदावर चित्रित नव्हते. यानंतर आलेल्या ‘साहिब बीवी और गुलाम’ या चित्रपटात गीता दत्तने तीन गाणी गायली होती पण तिन्ही गाणी मीनाकुमारीवर चित्रित होती. १९६४ साली गुरुदत्त यांचे निधन झाले त्यानंतर गीता दत्त चे सिनेमातील पार्श्वगायन देखील कमी झाले. त्यानंतर फार कमी चित्रपटातून गीता दत्त गायल्या. त्यांचा शेवटचे गाजलेला चित्रपट ‘अनुभव’ होता. १९७२ साली आला होता यातील सर्व गाणी तनुजा वर चित्रित झाली होती.