आदिपुरुष चित्रपटाचा दिग्दर्शक ‘ओम राउत’ कोण आहेत?
सध्या सिनेवर्तुळात आदिपुरुष या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात सिनेमाने भरभरून गल्ला जमवला. परंतू पहिला सोमवार चित्रपटाला निभावून नेता आला नाही. नकारात्मक रीव्हीव्जमुळे चित्रपटाची प्रेक्षकसंख्या घटली आणि त्याचाच परिणाम चित्रपटाच्या कमाईवर झाला असे बोलले जाते. चित्रपटातील संवाद, दृश्य आणि सिन्सवर बऱ्याच सिनेरसिकांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटाबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जातेय. या सगळ्या चर्चांच्या, नाराजीच्या केंद्रस्थानी आहेत, चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राउत! (Om Raut)
ओम राउत हे मुळचे मुंबईचे!
मुंबईत जन्मलेल्या ओम राउतचे (Om Raut) शिक्षण देखील मुंबईतच झाले. डी. जी. रुपारेल कॉलेजमधून त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले तर शाह अँड अँकर कॉलेजमधून त्यांनी इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. पुढे सिनेमाची आवड त्यांना अमेरिकेपर्यंत घेऊन गेली. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील सिरायक्यूज विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट्समधून त्याने सिनेमाचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर तिथेच तो एमटीव्ही नेटवर्कमध्ये लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम करू लागले.
ओम राउत (Om Raut) यांना कलेचा वारसा कुटुंबाकडूनच मिळाला. प्रसिद्ध चित्रपट संकलक आणि माहितीपटकार जयचंद्र बांदेकर हे ओम राउतचे आजोबा म्हणजेच आईचे वडील. बाबू बांदेकर या नावाने ते चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध होते. बाबू बांदेकर यांची मुलगी नीना राउत ही ओम राउतची (Om Raut) आई. नीना राउत ह्या पेशाने चित्रपट निर्मात्या आहेत. नीना राउत फिल्म्सच्या त्या सर्वेसर्वा आहेत. ओम राउत यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटाची निर्मिती नीना बांदेकर यांनीच केली होती.
भारतकुमार राउत हे ओम राउतचे वडील. महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक, द पायोनियरचे माजी निवासी संपादक, टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपचे सल्लागार, लोकमत मीडिया ग्रुपचे संपादकीय संचालक अशा विविध पदावरील आपल्या कामामुळे ते लोकांना माहिती आहेत. ते शिवसेनेकडून राज्यसभेत खासदारदेखील राहिले आहेत. चित्रपटकला अन पत्रकारितेच्या वातावरणात ओम राउत (Om Raut) यांचं बालपण गेलं.
=======
हे देखील वाचा : आदिपुरुष बघून रामानंद सागर यांच्या रामायणाची का आठवण काढली जातेय!
=======
अमेरिकेत शिक्षण पूर्ण करून ओम राउत (Om Raut) भारतात परतले. भारतात येवून त्यांनी क्रिएटीव्ह हेड म्हणून काम करायला सुरुवात केली. २०१५ साली आलेल्या लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटामुळे त्यांना सिनेसृष्टीत ओळख मिळाली. सुबोध भावे यांनी या चित्रपटात लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली होती. पुढे २०२० मध्ये ते तान्हाजी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले.
तान्हाजीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडून जोरदार गल्ला जमवला होता. तान्हाजीच्या भव्यदिव्य यशानंतर त्यांच्या पुढच्या चित्रपटाची उत्सुकता चित्रपट प्रेमींना लागली होती. बाहुबली या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेल्या प्रभास सोबत त्यांचा पुढचा चित्रपट येतोय म्हणल्यावर तर ही उत्सुकता अजून ताणली गेली होती. आदिपुरुष टीझर लॉंच पासूनच टीकेचा धनी होत होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तर हा वाद अजूनच चिघळला आणि ओम राउत (Om Raut) हे टीकेचे धनी होत आहेत. अशाप्रकारे ओम राउत यांचा चित्रपट सृष्टीतील प्रवास राहिला आहे.