‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘नैना’ ची वेगळी पन्नाशी….
चित्रपटासाठी थीम ठरते.
पटकथेवर काम सुरु होते.
संवाद लेखन सुरु राहते.
हे घडत असतानाच मुख्य कलाकारांच्या निवडीची प्रक्रिया सुरु होते.
चित्रपटाचा मुहूर्त ठरतो आणि दणक्यात होतो देखील.
चित्रीकरण सत्र आयोजित केले जाते. कलाकारांच्या तारखा मिळवणे, जुळवणे सुरु असतेच. चित्रपटाच्या निर्मितीत अनेक घटक असतातच. गाण्यांचे रेकाॅर्डिंग. आऊटडोअर्स लोकेशनवरचे शूटिंग. प्रसंगानुसार सेट लावून शूटिंग. अधूनमधून कामाच्या प्रगतीचा आवश्यक असा आढावा. एव्हाना अधलं मधलं शूटिंग झालेले असते. आणखीन शूटिंग सत्रांचे नियोजन करण्यात येते आणि अशातच चित्रपटाची नायिका लग्न करुन विदेशात जाते. आपण लग्न झाल्यावर चित्रपटसृष्टी सोडणार आहोत याची कल्पना दिली असली तरी त्यानुसार, चित्रपट पूर्ण करता येईलच याची खात्री नसते. सेट लावायचा तर स्टुडिओ उपलब्ध हवा. इतर कलाकारांच्याही तारखा मिळायला हव्यात. ते न जमल्याने निर्माता व दिग्दर्शक हवालदिल झालेत. आता चित्रपट पूर्ण कसा करायचा?(Naina Movie)
शक्ती इंटरनॅशनल या बॅनरखालील जे. सी. पटेल आणि बालुभाई शहा निर्मित व कनक मिश्रा दिग्दर्शित ‘नैना ‘ ( मुंबईत रिलीज १४ सप्टेंबर १९७३. म्हणजेच पन्नास वर्ष पूर्ण) या चित्रपटाबाबत नेमके हेच तर झाले आणि त्याकाळात यावरुन बरीच चर्चाही रंगली. शशी कपूर, राजश्री, रेहमान, डेव्हिड, परवीन पाॅल, आकाशदीप, संजना, मधुमती, जुगनू इत्यादींच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘नैना’चे शूटिंग एकेक चित्रीकरण सत्र पार पडत पुढे सरकत होते. शूटिंगसाठीची अशी वेगळी पटकथा असते. त्यात कदाचित चित्रपटाचा नंतरचा भाग अगदी शूटिंगच्या पहिल्याच टप्प्यात चित्रीत होतो. असं काहीही घडू शकते. आणि त्या काळात जवळपास अडिच तीन वर्षांत एक चित्रपट पूर्ण होत असल्याने घाई अशी नसे.(Naina Movie)
पण अशातच राजश्रीने लग्न करुन अमेरिकेला जायचा निर्णय घेतला आणि आता ‘नैना’ हा चित्रपट (Naina Movie) पूर्ण कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीत एक तर असा चित्रपट आर्थिक नुकसान सोसून डब्यात बंद करायचा निर्णय घेणे अथवा पटकथेत आवश्यक असे फेरफार करुन चित्रपटातील अधले मधले शूटिंग करण्याचे आव्हान पेलणे. दिग्दर्शकांनी हा दुसरा मार्ग अवलंबिला. त्याने ‘कथेचे मूळ सूत्र’ कायम ठेवून पटकथेत आवश्यक असे फेरफार केले. आता मौशमी चटर्जीला साईन केले आणि चित्रपट पडद्यावर आणला.
आता हा बदल कसा होता? चित्रपटात अपघातात नायिकेचा मृत्यू होतो म्हणून नायक दुसरं लग्न करतो असं दाखवलं. अर्थात काही प्रसंगांचे आता नव्याने शूटिंग करावे लागले. पण पटकथा लेखक, निर्माता व दिग्दर्शक यांनी अजिबात हार न मानता चित्रपट पूर्ण केला हे उल्लेखनीय. या सगळ्याची त्या काळात मिडियातून बरीच चर्चाही झाली. चित्रपट रखडत रखडत बनलाय हेही रसिकांच्या लक्षात आले आणि याचा चित्रपटाला दुर्दैवाने फटका बसला. चित्रपट फ्लाॅप झाला. मुंबईत मेन थिएटर नाझ होते आणि मोजक्या तीनच आठवड्यात चित्रपट उतरला. मौशमी चटर्जी तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत नवीनच होती.
शक्ती सामंता दिग्दर्शित ‘अनुराग’ व राज खोसला दिग्दर्शित ‘कच्चे धागे’ हे तिचे पहिले दोन चित्रपट याच वर्षांत ( १९७३) एव्हाना रिलीज होऊन लोकप्रिय झाले होते आणि आता ‘नैना’ आला होता. योगायोग असा की, ‘अनुराग’मध्ये ती दृष्टिहीन असते आणि अखेरला तिला कॅन्सरग्रस्त मित्राचे (मा. सत्यजित) डोळे तिला दिले जातात आणि आता पुन्हा चित्रपटाच्या नावातच ‘नैना’ असा योगायोग. (Naina Movie)
===========
हे देखील वाचा : सरोज खानसोबत रिहर्सल करण्यासाठी तयार नव्हती रेखा…
===========
‘नैना’ मध्ये (Naina Movie) पाहुणे कलाकार म्हणून फरिदा जलाल, ए. के. हनगल, जानकीदास, ब्रह्मचारी, सुंदर यांच्याही भूमिका. पटकथेत फेरफार करताना काही छोट्या व्यक्तिरेखा निर्माण होणं स्वाभाविकच. मूळ कथा नंदिनी देवी यांची. पती व पत्नी यांच्या नात्यावरील. अर्थात त्यात काही गैरसमजाचे नाट्य. शेवट मात्र गोड. पटकथा कैफी आझमी आणि कनक मिश्रा यांची तर संवाद कैफी आझमी यांचे. इंदिवर, कैफी आझमी आणि हसरत जयपुरी यांच्या गीतांना शंकर जयकिशन यांचे संगीत. आशा भोसले यांनी गायलेले होने लगी है रात जवा कितीदाही ऐकावे असे. तर मोहम्मद रफी यांनी गायलेल्या हमको तो जान से प्यारी है या गाण्याला फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त झाला ही या सगळ्यात जमेची बाजू.
चित्रपटाच्या मुहूर्ताला त्याच्या कुंडलीत तो कशा पध्दतीने, सोपस्काराने पूर्ण होईल हे नेहमीच सांगता येत नसते. यशापयश तर दुसरी गोष्ट. त्यात चित्रपटाच्या नायिकेनेच लग्न करुन चित्रपटसृष्टीला रामराम ठोकून विदेशात राहायचे ठरवल्यावर असा चित्रपट शक्य होईल तसे बदल होत आणि करत तो पडद्यावर आला हे केवढे तरी विशेष. ‘नैना’ची ही गोष्ट चित्रपट निर्मितीत उतरताना अनेक शक्यता गृहीत धरा असे डोळे उघडणारी म्हणायचे का?