‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं? रहस्य लवकरच उलगडणार; ‘तीन अडकून सीताराम’चा ट्रेलर भेटीला…
काही दिवसांपूर्वी ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. टिझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच आता ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहून लक्षात येते की तीन कूल, बिनधास्त मित्र मजा करायला विदेशात जातात आणि तिथे त्यांच्याबरोबर एक अनपेक्षित घटना घडते. त्या रात्री पार्टीनंतर नेमकं काय घडले आणि हे तीन मित्र कसे अडकले? त्यांची ही मजा, सजा कशी बनली, हे २९ सप्टेंबरला प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळेल. या सगळ्या घटनेमुळे या तिघांची मैत्री टिकते की नाही? या जाळ्यात अडकलेले हे तीन सीताराम कसे बाहेर पडतील, हे पाहाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.(Teen Adkun Sitaram Trailer)
या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे सांच्यासह आनंद इंगळे, विजय निकम, समीर पाटील आणि हृषिकेश जोशी हे कसलेले कलाकार सुद्धा पाहायला मिळतील. चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणतात, “चित्रपटाचा ट्रेलर पाहून अंदाज आला असेलच की मजा करायला गेलेल्या या तीन मित्रांची कशी तारांबळ उडते. चित्रपटातील सगळेच कलाकार सर्वोत्कृष्ट आहेत. या सगळ्यांनाच विनोदाची उत्तम जाण आहे. आमचे चित्रीकरण लंडनला होणार होते, त्याच वेळी लंडनच्या राणीचे निधन झाले. त्यामुळे तिथे काही ठिकाणी आमच्या चित्रीकरणावर थोड्या मर्यादा येत होत्या. तरीही आमच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार आम्ही चित्रीकरण केले. ही सगळीच प्रक्रिया खूप मस्त होती. जितकी धमाल आम्हाला चित्रपट करताना आली, त्यापेक्षा जास्त धमाल प्रेक्षकांना चित्रपट पाहताना येईल.’’
अभिनेते दिग्दर्शक हृषिकेश जोशी दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट त्याच्या नावामुळे चांगलाच चर्चेत आहे. हे नाव नेमकं का ठेवलं अन् याचा नेमका अर्थ काय याविषयी खुद्द हृषिकेश जोशी यांनीच खुलासा केला आहे.एका वाहीनीशी संवाद साधतांना हृषिकेश जोशी म्हणाले, “ही एक पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रचलित म्हण किंवा वाकप्रचार आहे. एखाद्याचा तीन अडकून सीताराम होणे हे मी बऱ्याचदा कोल्हापुरात ऐकलं आहे, किंबहुना मीदेखील या म्हणीचा वापर केला आहे. विचित्र मनोरंजक परिस्थितीत अडकलेल्या माणसासाठी ही म्हण वापरली जाते. जेव्हा कथा लिहून झाली तेव्हा यातील तीनही नायकांची झालेली अवस्था पाहून आपसूकच हे नाव डोक्यात आलं.”(Teen Adkun Sitaram Trailer)
=======================
हे देखील वाचा: अभिनेता आदिनाथ कोठारे झाला रॅपर…
=======================
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत.