‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
आणि अक्षरश: काही मिनिटात गाणे तयार झाले !
शोमन राजकपूर यांना म्युझिकची जबरदस्त जाण होती. त्यामुळे त्यांच्या चित्रपटातील हरेक गाणं आज देखील रसिकांना लख्ख आठवते. गाण्याच्या सुरुवाती सोबतच शब्दांवर त्यांचे विशेष लक्ष असायचे त्यामुळे त्या गाण्यातील शब्द, सूर आणि चाल आजही रसिकांच्या डोक्यात फिट बसलेली आहे. सत्तर दशकामध्ये राजकपूर (Raj Kapoor) यांनी स्वतःच्या निर्मितीतील चित्रपटांमध्ये स्वत: काम करणे बंद केले होते. पण निर्माता म्हणून त्यांचे चित्रपट येतच होते. १९८० साली त्यांच्या आर के या चित्र संस्थेचा एक चित्रपट आला होता ‘बिवी ओ बिवी’. या सिनेमामध्ये रणधीर कपूर,संजीव कुमार आणि पूनम धिल्लन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल रवैल यांनी केले होते तर सिनेमाचे संगीत आर डी बर्मन यांचे होते. चित्रपटातील गाणी निदा फाजली यांनी लिहिली होती. थोडक्यात आर के चा चित्रपट जरी असला तरी आर के ची नेहमीच्या म्युझिक टीम मधील सदस्य या सिनेमासाठी नव्हते. तरी देखील राजकपूर (Raj Kapoor) त्यांना आपल्या चित्रपटातील प्रत्येक गाणं हे त्यांच्या चित्र शैलीला साजेसे त्यांच्या परंपरेला पूरक असे असावे असं वाटायचं.
या चित्रपटातील एका गाण्याच्या मेकिंगचा किस्सा गीतकार निदा फाजली यांनी एकदा विविध भारतीवरील एका कार्यक्रमात सांगितला होता. ‘बीबी ओ बीबी’ या चित्रपटाची कथा मराठी लेखक प्रभाकर तांम्हणे यांची होती. या सिनेमातील गाण्याची शूटिंग चालू होती. एका गाण्यासाठी रणधीर कपूर यांनी एक सिच्युएशन सांगितली होती. त्यानुसार निदा फाजली गाण्याचे शब्द लिहीत होते. पण त्यांना मनासारखे काही शब्द सापडत नव्हते. आर डी बर्मन यांनी या गाण्याची ट्यून तयार केली होती. त्यामुळे या ट्यून वर साजसे शब्द त्यांना लिहायचे होते. तितक्यात समोरून राजकपूर आले त्यांनी हा सर्व प्रकार बघितला. त्यांनी निदा फाजली यांना विचारले गाण्याची सिच्युएशन काय आहे ? तेव्हा त्यांनी सिच्युएशन सांगितली.
राज कपूर (Raj Kapoor) म्हणाले,” उद्या चेंबूर मधील माझ्या घरी तुम्ही या, मी तुम्हाला काही सुचवतो.” आता प्रश्न पडला गाण्याची ट्यून तर तयार होती पण उद्या राजकपूर कुठली सिच्युएशन सांगणार आणि या सिच्युएशनवर आर डी बर्मन यांनी तयार केलेल्या ट्यूनवर गाणे लिहायची मोठी जबाबदारी आता निदा फाजली यांच्यावर होती. त्यांनी ते आव्हान स्वीकारले. दुसऱ्या दिवशी ते राजकपूर यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी गेले. तेव्हा बोलताना राजकपूर आपल्या जुन्या आठवणी मध्ये रमले होते. आपल्या जुन्या नायिकांबद्दल ते सांगत होते. नर्गिस अशी होती वैजयंतीमाला ला हे कॉस्च्युम्स आवडायचे, पद्मिनी खाण्याच्या बाबतीत कशी दक्ष होती… अशा पद्धतीने नॉस्टेल्जिया मध्ये रमले. निदा फाजली त्यांना पुन्हा पुन्हा गाण्याच्या सिच्युएशनची आठवण करून देत होते. शेवटी राजकपूर (Raj Kapoor) यांनी त्यांना इंग्रजीत सांगितले ,” there was a boy there was a girl, there is a boy there is a girl, there will be a boy there will be a girl and that is the whole life! “ ही सिच्युएशन ऐकल्यानंतर निदा फाजली यांच्या डोक्यात आर डी बर्मन यांनी बनवलेली धून होतीच. त्यांनी तिथल्या तिथेच गाणे लिहून काढले” सदियो से दुनिया मे यही तो किस्सा है एक ही तो लडका है एक ही तो लडकी है जब भी वो मिल गये प्यार हो गया…” राजकपूर एकदम खुश झाले त्यांनी निदा फाजली यांना मिठी मारली आणि म्हणाले,” यार, मला हेच तर पाहिजे होतं!!”
===========
हे देखील वाचा : ‘डॉन’ चित्रपटाच्या निर्मिती मागे मनोज कुमार यांचे कनेक्शन
===========
‘बीवी ओ बीवी’ हा चित्रपट तसा हलकाफुलका, विनोदी आणि चांगला होता पण या चित्रपटाला अजिबात व्यवसायिक यश मिळाले नाही. राहुल रवैल राजकपूर (Raj Kapoor) यांचा असिस्टंट होता. राज कपूर यांनीच त्याला चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी दिल्यानंतर त्याला राजेंद्रकुमार यांचा ‘लव्ह स्टोरी’ आणि धर्मेंद्र यांचा ‘बेताब’ हे चित्रपट दिग्दर्शित करायला मिळाले. या चित्रपटातून कुमार गौरव आणि सनी देओल हे स्टार पुत्र पडद्या वर आले. रणधीर कपूर नायक असलेला हा आर के फिल्मचा शेवटचा चित्रपट होता तसेच आर के फिल्मचा कपूर व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीने दिग्दर्शित केलेला हा शेवटचा चित्रपट होता.