दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
दक्षिणेकडील दिग्दर्शकांचा हिंदीत वाढता तडका…
नेमकं सांगायचं तर, साठच्या दशकापासूनच दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांच्या दिग्दर्शकांची हिंदी चित्रपटसृष्टीत पावले पडू लागली. ‘ॲनिमल’च्या तडाखेबाज यशाने दिग्दर्शक संदीपा रेड्डी वांगा याने त्याच यशस्वी वाटचालीच्या ‘फ्लॅशबॅक’ची संधी दिली आहे. (South directors)
साठच्या दशकात दक्षिणेकडील प्रसाद प्रोडक्शन्स, एव्हीएम, जेमिनी यांनी सातत्याने हिंदी चित्रपट निर्मिती केली. त्यात सुरेश प्रोडक्शन्स इत्यादींची भर पडली. राजेंद्रकुमारची भूमिका असलेले टी. प्रकाश राव दिग्दर्शित ‘ससुराल’ (१९६१), एस. एस. वासन दिग्दर्शित ‘घराना’ (६१), श्रीधर दिग्दर्शित ‘दिल एक मंदिर’ (६३), सुनील दत्तची भूमिका असलेले ए. भीमसिंग दिग्दर्शित ‘खानदान’ (६५), ए. सुब्बाराव दिग्दर्शित ‘मिलन’ (६७) अशी व इतकी ही जुनी यशस्वी परंपरा आहे. दिलीपकुमार अभिनित दुहेरी भूमिकेतील चाणक्य दिग्दर्शित ‘राम और श्याम’ (१९६७) यातील हायपाॅईंट. जणू या वाटचालीला गती आणि प्रतिष्ठा.
सत्तरच्या दशकात चिन्नाप्पा देवरच्या ‘हाथी मेरा साथी’ (७१) साठी राजेश खन्नाला घवघवीत मानधन मिळाल्याचा किस्सा आजही गाजतोय यावरुन ‘दक्षिणेचा हिंदीतील डंका’ किती महत्वाचा ते अधोरेखित होत आहे. प्रसाद प्रोडक्शन्सने ‘मिलन’नंतर खिलौना, उधार की जिंदगी, जय विजय वगैरे चित्रपट निर्माण करीत असतानाच मूळ तमिळ भाषेतील ‘एक दुजे के लिए ‘ची हिंदीत केलेली रिमेक त्याच्या बहुचर्चित क्लायमॅक्समुळे प्रचंड गाजली. निर्माते बी. नागी रेड्डी यांनी राम और श्यामनंतर हिंदीत निर्माण केलेल्या घर घर की कहानी, प्रेम नगर, ज्युली या चित्रपटांना पब्लिक पसंती मिळाली. थीम, लोकप्रिय संगीत, उत्तम निर्मिती मूल्य यामुळे हे चित्रपट रसिकांना आवडले.(South directors)
ऐंशीच्या दशकात के. राघवेंद्र राव दिग्दर्शित ‘हिम्मतवाला’पासून याच यशस्वी ट्रेण्डला आणखीन एक वळण मिळाले. दक्षिणेकडील तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम भाषेतील सुपरहिट चित्रपटाची अतिशय वेगाने रिमेक करायची. अनेक चित्रपटांत हुकमी हीरो जितेंद्र आणि नायिका श्रीदेवी वा जयाप्रदा. दिग्दर्शकही दक्षिणेकडीलच. नृत्य दिग्दर्शकही तिकडचाच. जणू सगळेच तिकडचे म्हणून जितेंद्रनेही अनेक वर्ष हैदराबादला मुक्काम केला. शनिवार रविवार त्याची पत्नी व मुले त्याला भेटायला तिकडे जात. श्रीदेवी खरं तर भारती राजा दिग्दर्शित ‘सोलवा साल’ या चित्रपटात अमोल पालेकरची नायिका म्हणून हिंदीत आली. पण पिक्चर फ्लाॅप झाला. मूळ चित्रपटात कमल हसन हीरो होता. दिग्दर्शक भारती राजा याने कमल हसनची भूमिका असलेल्या एका तमिळ भाषेतील चित्रपटाची हिंदीत ‘रेड रोझ ‘( १९८०) या नावाने रिमेक करताना कमल हसनच्याच शुभ हस्ते त्याचा मुहूर्त केला. राजेश खन्ना त्यात नायक होता.(South directors)
दक्षिणेकडील असे अनेक दिग्दर्शक आपले मूळ चित्रपट घेऊन हिंदीत आले. दासरी नारायण राव, के. बापय्या, के. भाग्यराज अशी बरीच नावे आहेत. अनेक चित्रपटांत जितेंद्र, तर काहींमध्ये राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, संजीवकुमार हीरो आहेत. याच वाटचालीला नव्वदच्या दशकात मणी रत्नम (बाॅम्बे, गुरु इत्यादी), रामगोपाल वर्मा (शिवा, रंगिला, सत्या, कंपनी, मस्त इत्यादी), प्रियदर्शन (विरासत, गोलमाल, हेरा फेरी वगैरे अनेक) या दिग्दर्शकांनी चित्रपटांबरोबरच आपलीही ओळख निर्माण केली.
व्हिडिओ युगात मणि रत्नम दिग्दर्शित ‘नायकन’ (१९८८) हा तमिळ भाषेतील चित्रपट अन्यभाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहचताना त्याच्या अन्य चित्रपटांबाबत रसिकांचे कुतूहल जागे झाले. त्याच्या मूळ चित्रपटावरील हिंदीतील रिमेकलाही महत्व आले. हे एक प्रकारचे यशच. अगदी त्याचा तमिळ भाषेतील ‘अंजली’ची हिंदी डब आवृत्तीचीही चर्चा रंगली. फिरोज खान दिग्दर्शित ‘दयावान’ (१९८९) ला नायकची सर नाही अशीच चर्चा रंगली. (South directors)
हे मूळ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे यशच. रामगोपाल वर्माने आपल्याच मूळ चित्रपटाची ‘शिवा’, ‘द्रोही ‘ अशी रिमेक केली. ‘रंगिला ‘पासून त्याने हिंदी चित्रपटाचा स्वतंत्र ठसा उमटवला. अतिशय उत्तम व्हीजन असणारे हे दिग्दर्शक आहेत. अर्थात, अनेक दिग्दर्शकाचे काही चित्रपट फसतात, फ्लाॅपही होतात. तसेच यांचेही झाले.
याच वाटचालीचे जणू प्रचंड व्यापक स्वरुप एस. एस. राजमौली दिग्दर्शित ‘बाहुबली’च्या दोन्ही चित्रपटांपासून दिसू लागले. ग्लोबल युगातील डिजिटल पिढीसमोर जगभरातील अनेक भाषांतील चित्रपट येताहेत. त्यांना सबटायटल्स व डब चित्रपट याचे अजिबात वावडे नाही. त्यांना मल्टिप्लेक्सच्या पडदाभर महामनोरंजन हवेसे झाले. महागड्या तिकीटातही असे भव्य डब चित्रपट एन्जाॅय केले गेले. पुष्पा, केकेआर, केजीएफ (पहिला आणि दुसरा) असं करत करत ‘ॲनिमल’पर्यंत ही नवीन लाट आली आहे. यात इतरही घटक आहेत. संदीपा रेड्डी वांगा याने ‘कबिर सिंग’मध्ये कमालीची धाडसी थीम मांडतानाच थेट हिंदीत चित्रपट निर्माण केला. (South directors)
==========
हे देखील वाचा : ‘पडोसन’ चित्रपट हे टीमवर्क असून दिग्दर्शक त्याचा कर्णधार
==========
आज पॅन इंडियाचे युग आहेत. एका भाषेतील चित्रपट अन्य अनेक भाषांत डब करीत अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत आपला चित्रपट पोहचवायचा. असा अनेक भाषिकांना आपलीशी वाटणारी थीम व सादरीकरण हे आव्हानच. त्यात हे दक्षिणेकडील दिग्दर्शक यशस्वी ठरताहेत. ‘ॲनिमल’ फारच हिंसक आहे, उग्र आहे. अशीही टीका होत असली तरी तीन तास एकवीस मिनिटांचा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्याचा जबरदस्त आत्मविश्वास दिग्दर्शकांत आहे हेही महत्वाचा. दक्षिणेकडील दिग्दर्शक हिंदीत हा तब्बल साठ वर्षांचा अनेक वळणे घेत घेत रंगत असलेला प्रवास आणि प्रवाह एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहचलाय.