Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bollywood Movies : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांचं झालंय

Shilpa Shetty : “मी महाराष्ट्राची मुलगी…”,मराठी-हिंदी भाषा वादावर शिल्पाचं सूचक

‘बिग बॉस मराठी’ फेम Janhavi Killekar ची मालिकेत एन्ट्री; मोहिनीच्या भूमिकेत प्रेक्षकांना

Actress Snehlata Vasaikar आता होणार माईसाहेब; ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेत करणार

Son Of Sardaar 2 Trailer: अजय देवगनच्या हटके कॉमेडीने चाहते

Bahubali Movie :१० वर्षांनी पुन्हा एकदा ‘बाहुबली’ एका ट्विस्टसह भेटीला

राजेश खन्ना यांच्या ‘या’ सिनेमाच्या मुहूर्ताची क्लॅप Amitabh Bahchan यांनी

Genelia Deshmukh : ‘सितारे जमीन पर’ नंतर तिच्याच सुपरहिट चित्रपटाच्या

Filmfare Awards Marathi 2025 : ‘पाणी’ ने मारली बाजी; तर

Kapil Sharma याच्या कॅनडातील Kaps Cafe वर गोळीबार, खलिस्तानी दहशतवाद्याने

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

राज कपूरचा हा चित्रपट फ्लॉप चित्रपट म्हणून ओळखला गेला…

 राज कपूरचा हा चित्रपट फ्लॉप चित्रपट म्हणून ओळखला गेला…
कलाकृती विशेष

राज कपूरचा हा चित्रपट फ्लॉप चित्रपट म्हणून ओळखला गेला…

by दिलीप ठाकूर 14/12/2023

Positively not The End
But it was positively the end of Jokar !

‘मेरा नाम जोकर’ (१९७०) संपताना पडद्यावर हे शब्द येतात आणि आपण भावूक होतो. याचे कारण म्हणजे या चित्रपटाला फस्ट रनला प्रेक्षकांनी पूर्णपणे नाकारल्याने हा फ्लाॅप चित्रपट म्हणून ओळखला गेला. दुर्दैवाने आजही तसाच उल्लेख होतो. पण राज कपूरच्या आशय, निर्माता, दिग्दर्शक, अभिनय, संकलन, स्टुडिओ मालक, कला दिग्दर्शनातील खुबी, संगीताचा उत्तम कान आणि दृष्टी असलेले व्यक्तिमत्व अशा प्रत्येक बाबतीत हा चित्रपट त्याच्या रुपेरी कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे.(Raj Kapoor)

आजच्या राज कपूरच्या वाढदिवसाच्या (१४ डिसेंबर १९२४ – २ जून १९८८) निमित्ताने फोकस टाकताना ठळकपणे जाणवते ते राज कपूर ‘जोकर ‘पूर्वीचा आणि नंतरचा असा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. आणि या साऱ्यातून घडत घडत गेलेले चित्रपटगृहाच्या पडद्याभरचे सिनेमास्कोप व्यक्तिमत्व. आजच्या ग्लोबल युगातील भाषेत कलंदर सेलिब्रिटीज.

एक वेगळी आठवण सांगतो. ‘बाॅबी’ (७३) च्या हिटनंतर मुंबईत एका फिल्म सोसायटीच्या वतीने राज कपूरचा सत्कार करण्यात आला तेव्हा त्याने आपल्या भाषणात म्हटले, आज कोणाचे सेक्रेटरी, कोणाचे ड्रायव्हर, कोणाचे शिपाई पैसे घेऊन मार्केटमध्ये उभे राहतात. उत्तम नट नटी घेतात आणि पडद्यावर सामान्य चित्रपट आणून धो धो पैसे कमावतात. यांना उत्तर द्यायचे तर माझ्यासारख्याला ‘बाॅबी’च काढावा लागतो’. वगैरे वगैरे बरेच काही. त्याच्या बोलण्यातील प्रत्यय वाढत वाढत गेला आणि चित्रपट निर्मिती म्हणजे जणू ‘कलेचा ध्यास नव्हे तर झटपट करोडो रुपये कमवायची इंडस्ट्री’ अशा युगापर्यंत प्रवास आला.(Raj Kapoor)

‘जोकर ‘नंतर ‘बाॅबी’ काढताना एका नवीन राज कपूरचा जणू उदय झाला. तो मागील पिढीला आपलासा वाटला नाही. ‘बाॅबी’ (१९७३) हे पन्नासावे वर्ष. म्हणजेच ‘बाॅबी’ निर्मितीच्या वेळेस राज कपूर पन्नाशीत होता. त्याने ‘रुपेरी नायक’ साकारणे आता मागे ठेवले होते. याचे भान येणेही आवश्यक होतेच.

राज कपूर म्हणजे शोमन अशी प्रतिमा आहे. पण राज कपूर यांना चित्रपट माध्यमातील बहुस्तरीय गोष्टी व व्यवसायातील खाचाखोचा या दोन्ही गोष्टींची अतिशय उत्तम जाण होती. दूरदृष्टी होती. म्हणूनच यशापयश पचवून आणि उलटसुलट काॅन्ट्रोव्हर्सिज व गाॅसिप्ससह राज कपूरचा समाजमनावर ठसा उमटला. राज कपूर म्हणत, पिक्चर इज मेड ऑन टेबल्स, रायटींग टेबल अॅण्ड एडिटींग टेबल. पिक्चर पैसो से बनती है असा त्याचा ( त्या पिढीचाच) दृष्टिकोन नव्हता. पिक्चर दिलसे बनती है अशी भावना होती. (आजच्या व्यावसायिक युगात ती शक्यच नाही.) राज कपूरच्या प्रगती पुस्तकावर नजर टाकताना ठळकपणे दिसते की त्यानी पुढील अनेक पिढ्यांसमोर चित्रपट निर्मितीचे आदर्श निर्माण केले. चित्रपट कसा असावा, तो कसा दिसावा हे राज कपूरच्या चित्रपटात दिसते. त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपट म्हणजे एक प्रकारची कार्यशाळाच आहे, विद्यापीठ आहे. आणि याबाबत ते चित्रपती व्ही. शांताराम यांना आपला आदर्श मानत. तसा राज कपूर आखून अथवा नियोजन करुन चित्रपट निर्मिती व दिग्दर्शन करणारा नव्हता. काहीसा बेशिस्तच मानला जाई. पण एकदा का तो कामाला लागला की त्याला फक्त आणि फक्त सिनेमा हाच ध्यास असे. चित्रपट या माध्यमाला वाहून घेणे म्हणजे काय याचे आदर्श उदाहरण म्हणजे राज कपूर.

या सदैव चर्चेत असलेल्या कलंदराची कारकिर्द सिनेमास्कोप. पण आपण एक जणू ट्रेलर पाहूया. राज कपूरचा जन्म सध्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या पेशावर येथील. पृथ्वीराज कपूर आणि रामसरीनी यांचे ते पुत्र. राज कपूरचे नाव रणबीर राज कपूर पण चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना राज कपूर असं केलं. दहा वर्षांचे असताना त्यांनी इन्कलाब या चित्रपटात काम केले. त्यांनी बाॅम्बे टाॅकीजमध्ये क्लॅपर बाॅय म्हणून सुरू केली . त्या वेळेस आपल्या पित्याच्या पृथ्वी थिएटरमध्ये ते रंगमंचावरील विदूषक किंवा ‘दीवार ‘ या नाटकातील नोकर व पडदे ओढणारा बॅकस्टेज आर्टिस्ट असत. ४५ साली भालजी पेंढारकर यांच्या ‘वाल्मिकी’ चित्रपटात त्यांनी नारदमुनीची छोटीशी भूमिका केली. आणि त्यांचे भावविश्व या क्षेत्राशी एकरुप होण्यास सुरुवात झाली. एकदा कामात चूक झाली म्हणून त्यांना ज्या दिग्दर्शकाची थप्पडही खावी लागली पुढे त्यानेच त्यांना नायक म्हणून पहिली संधीही दिली. हे दिग्दर्शक होते केदार शर्मा आणि चित्रपट “नीलकमल” (४७). तर वयाच्या तेवीसाव्या वर्षी ‘आग ‘ या चित्रपटाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनात पाऊल टाकले. (Raj Kapoor)

केवळ चोवीस वर्षाचे असताना चेंबूर येथे भव्य आर. के. स्टुडिओची स्थापना केली. आर के बॅनरचा चित्रपट म्हणजे राज कपूर नायक, पटकथाकार के.ए. वसंत साठे आणि छायाचित्रकार राधू कर्माकर असं समीकरण रूढ झालं होतं. सर्वसामान्य माणसासाठी सामाजिक भान जागवणारे चित्रपट राज कपूर यांनी घडवले याबाबत व्ही. शांताराम यांनी राज कपूरचा विशेष गौरव केला होता. ऋषी कपूर दिग्दर्शित “आ अब लौट चले” (९९) हा आर.के.बॅनरचा शेवटचा चित्रपट ठरला. कालांतराने २०१८ साली त्यांच्या वारसदारांनी ह्या स्टुडिओची विक्री करण्याचा निर्णय घेतला. आज या मूळ स्टुडिओचे गेट तेवढे कायम आहे. संपूर्ण स्टुडिओच्या जागी कमर्शियल काॅम्प्लेक्स उभे आहे. त्यावर नजर टाकताना डोळ्यासमोर आर.के. स्टुडिओ येतो असा या वास्तूचा जबरा ठसा. हा स्टुडिओ म्हणजे जुन्या मुंबईची एक सांस्कृतिक ओळख होती.
राज कपूर यांचा निर्माता, दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट ‘आग ‘ला फारसे यश लाभले नाही. “बरसात” ( ४९) हा राज कपूर निर्मित,दिग्दर्शित आणि अभिनित असा पहिला गाजलेला चित्रपट.

आवारा ( ५१ ), श्री ४२० ( ५५) हे आणखी काही यशस्वी चित्रपट. काही चित्रपटांमधून त्यांची “भारताचे चार्ली चॅप्लिन” अशी कायमस्वरुपी प्रतिमा आकाराला आली. आर के बॅनरने राजा नवाथेचा ‘आह’ (५३), प्रकाश अरोराचा बूट पॉलिश (५४), अमित मिश्रा आणि शोमु मित्राचा जागते रहो (५६) अमरकुमारचा अब दिल्ली दूर नही (५७ ) आणि राघु कर्मकारचा ‘जिस देश में गंगा बहती है ‘ (६१) या सामाजिक विषयावरील चित्रपटांचीही निर्मिती केली. राज कपूरचे अन्य दिग्दर्शकांचे काही चित्रपट, अंदाज ( ४९ ), दास्तान ( ५० ), सरगम (५०), अनहोनी (५२),आह (५३),
चोरी चोरी (५६), शारदा (५७), परवरीश (५८), फिर सुबह होगी (५८), अनाडी (५९), दो उस्ताद (५९), छलीया (६०), नजराना ( ६१), आशिक (६१), दिल ही तो है ( ६३), तिसरी कसम ( ६६) हे आहेत. तर राज कपूर यांनी दिग्दर्शित आणि अभिनित ‘संगम ‘( ६४) मधील हा आर. के.फिल्मचा पहिला रंगीत चित्रपट तसेच भारतातील पहिला दोन मध्यंतरचा सुपर हिट. त्यानंतर अन्य दिग्दर्शकांच्या दुल्हा दुल्हन ( ६४ ) अराऊंड दी वर्ल्ड (६६), सपनो के सौदागर ( ६८) हे चित्रपट अपयशी ठरले. तेव्हा राज कपूर यांनी ‘नायका’ची भूमिका साकारणे थांबवले आणि चरित्र भूमिका साकारणे सुरु केले. नरेशकुमारचा दो जासूस , दारासिंगचा मेरा देश मेरा धरम , दुलाल गुहाचा खान दोस्त, संजय खानचा अब्दुला इत्यादीत त्या केल्या. राज कपूरच्या वाटचालीतील महत्वाचा चित्रपट “मेरा नाम जोकर” पूर्ण व्हायला तब्बल सहा वर्षे लागली. (Raj Kapoor)

हा चित्रपट मूळात ४ तास आणि ४३ मिनिटे इतक्या अवधीचा होता. तो प्रदर्शित करताना ४ तास ९ मिनिटे अशा स्वरूपाचा आणि दोन मध्यंतरचा केला. पण पहिल्याच दिवसापासून चित्रपटाबाबत निराशेची प्रतिक्रिया उमटली. त्यामुळे मग आठवड्याभरातच तो १७८ मिनिटांचा करताना एका मध्यंतरचा केला. यावरुन त्याचा चित्रीत केलेला बराचसा भाग कापावा लागला. त्यानंतर रिपिट रन आणि मॅटीनी शोला या चित्रपटाला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर रणधीर कपूर दिग्दर्शित “कल आज और कल”मध्ये पृथ्वीराज कपूर, राज आणि रणधीर असे तीन पिढ्यातील कपूर एकत्र आले.

दिग्दर्शन कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्यांनी स्त्रीवादी भूमिका असलेल्या चित्रपटांना प्राधान्य दिलं. त्यात खरंच थीमनुसार स्री सौंदर्य खुलवले का यावरुन बरीच उलटसुलट चर्चा रंगली. गाॅसिप्स रंगले. काॅन्ट्रोव्हर्सिज झाली. सत्यम शिवम सुंदरम ( ७८) प्रेमरोग ( ८२) आणि राम तेरी गंगा मैली ( ८५ ) या चित्रपटांची याबाबत नावे घेता येतील. विशेष म्हणजे ‘राम तेरी गंगा मैली ‘चा शेवट वसंत साठे आणि बनी रुबेन यांनी सुचवल्यानुसार बदलला अशी बरीच चर्चा रंगली. राज कपूर यांनी आपल्या कारकिर्दीत मोजून फक्त दहा चित्रपटात आपल्या दिग्दर्शनीय कर्तृत्वाचा विलक्षण ठसा उमटवला. यावरुन त्यांच्या दृश्य माध्यमाची समज आणि ताकद स्पष्ट दिसते. तर आर.के.च्या रणधीर कपूरच्या ‘धरम करम ‘ ( ७६)मधील राज कपूरवरचे एक दिन बित जाएगा माती के मोल हे गाणे लोकप्रिय आहे. राज कपूर चित्रपट माध्यमात पुरेपुर मुरलेले, चित्रपट हा आपला श्वास आणि ध्यास आहे असे मानणारे व्यक्तिमत्व. त्यांना सेटचे स्वरुप, प्रकाश योजना, कॅमेरा मुव्हमेंट, संकलन, संगीत आणि नृत्य सादरीकरण यासह आपल्या चित्रपटांची पब्लिसिटी, त्यांचे पोस्टर डिझाईन यांचीही चांगली जाण होती. वसंत साठे आणि बनी रुबेन यांजकडून राज कपूरच्या आपला चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यामागची धडपड ऐकायला मिळे. राज कपूर म्हणजे शोमन आणि राज कपूर म्हणजे नायिकांतील सौंदर्य, अभिनय आणि नृत्य खुलवणारी पर्सनालीटी हे कायमच अधोरेखित केले गेले तरी त्यासह राज कपूर म्हणजे बरेच काही आहे. (Raj Kapoor)

जनसामान्यांना आपलेसे वाटतील असे चित्रपट ही आर के बॅनरची ओळख. राज कपूरनेच एका मुलाखतीत म्हटले की, माझा प्रेक्षक स्वप्न पाहण्यासाठीच चित्रपट पाहतो आणि त्याला भावतील असेच चित्रपट मी तयार करणार…राज कपूरच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील गाण्यात नृत्य सौंदर्य आणि दृश्य सौंदर्याची छान केमिस्ट्री जमलीय. काही गाणी , जिया बेकरार है.. आई बहार है, हवा मे उडता जाए ( बरसात), घर आया मेरा परदेसी ( आवारा), रमय्या वत्ता वया ( श्री ४२०) यह मेरा प्रेम पत्र पढकर ( संगम), यह भाय जरा देख के चलो ( मेरा नाम जोकर), मुझे कुछ कहना है ( बाॅबी), यशोमती मैया से बोले नंदलाला ( सत्यम शिवम सुंदरम).

राज कपूरच्या (Raj Kapoor) नायिका हा एका रंजक स्क्रीप्टचा विषय. नर्गिससोबतची त्याची रुपेरी पडद्यावरची जोडी जेवढा कौतुकाचा विषय तेवढाच पडद्यामागची हीच जोडी कुतूहलाची. राज कपूर दिग्दर्शित चित्रपटातील नायिका यात त्याच्या नायिका ( वैजयंतीमाला, पद्मिनी इत्यादी), अन्य दिग्दर्शकांच्या चित्रपटातील त्याच्या नायिका ( नूतन, माला सिन्हा, हेमा मालिनी इत्यादी) आणि त्याच्या दिग्दर्शनातील अन्य नायकांच्या नायिका (डिंपल कपाडिया, झीनत अमान, मंदाकिनी इत्यादी) असा हा त्रिकोणी रंगतदार विषय आहे. राज कपूरच्या बाबतीत एक मोठे सत्य म्हणजे, त्या प्रत्येकात नवा रंगढंग तर आहेच तेही राज कपूर टचसह. राज कपूर हे एक स्वतंत्र विद्यापीठ आहे. यात चित्रपट एक कला म्हणूनही आहे आणि चित्रपटसृष्टीचे ग्लॅमरही आहे. विशेष म्हणजे, राज, शम्मी आणि शशी हे तीन कपूरबंधूंची स्वतःची स्वतंत्र शैली. राज कपूरचा कार्यविस्तार खूपच मोठा. त्याच्या तीन पुत्रांचीही ( रणधीर, ऋषि आणि राजीव) क्षमता भिन्न. पण यातील कोणीही पित्याची उंची गाठू न शकलेला. खरं तर तशी अपेक्षाच नको.

===========

हे देखील वाचा : दिलीपकुमारने नाकारलेल्या भूमिकेचा होतोय त्यांना पश्चाताप

============

राज कपूर (Raj Kapoor) यांचे रशियासह जगभरात चाहते आहेत. ‘आवारा’ या चित्रपटाने रशिया आणि पूर्व युरोपमध्ये लोकप्रियता मिळवली. याचे कारण म्हणजे त्यात एक सामाजिक सूत्र आहे. माणसाला गुन्हेगार बनवते ती व्यवस्था. आर्थिक आणि सामाजिक विषमता निर्माण करते ती राजकीय आणि सामाजिक व्यवस्था. ती बदलायची असेल तर एक तर साम्यवाद ( कम्युनिझम) किंवा समाजवाद ( सोशॅलिझम) स्वीकारणे. हा आशावाद या चित्रपटाचे वेगळेपण ठरते आणि राज कपूरचे हा खूप वेगळा चित्रपट ठरला. चीनचे क्रांतीनेते माओ त्से तुंग यांना हा चित्रपट विशेष आवडला. तर श्री ४२० मध्ये त्यांनी चॅप्लिनची शैली, नव वास्तववाद, अमेरिकेन शैली यांचा ताळमेळ जमवला. चित्रपट अभ्यास याला म्हणतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील असे अनेक कलाकार हे जागतिक पातळीवर आज नावाजले जाताहेत.

राज कपूरना (Raj Kapoor) भारत सरकारने ७१ साली “पद्मभूषण” पुरस्काराने सन्मानित केले . ८७ साली नवी दिल्ली येथे दादासाहेब फाळके पुरस्कार समारंभातच ते जागीच कोसळले. पृथ्वीराज कपूर यांनाही मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तो पुरस्कार राज कपूरने स्वीकारला होता. पण यावेळी राज कपूरला दम्याचा विकार असल्याने राष्ट्रपतींनी खाली उतरुन तो पुरस्कार राज कपूरला दिला. पण तो जागीच कोसळला. त्यांना उपचारासाठी मुंबईत रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच राज कपूर यांचं निधन झालं. या काळात ते “हीना” या चित्रपटाची दोन गीते त्यांनी ध्वनिमुद्रित केली. नंतर हा चित्रपट रणधीर कपूरने दिग्दर्शित केला . वकील बाबू ( ८२) हा राज कपूरचा शेवटचा चित्रपट . ‘कलंक ‘ या मराठी चित्रपटात त्यांनी पाहुणा कलाकार भूमिका साकारली.पुणे जिल्ह्यातील सोलापूर मार्गावर लोणी काळभोर या गावी राजबाग या फार्ममध्ये त्यांच्या चित्रपटांविषयी माहितीपूर्ण संग्रहालय आहे.

दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद या त्रिमूर्तींचे भारतीय समाजमनावरचे गारुड काल होते, आज तर आहेच आणि उद्याही असणार… राज कपूरच्याच ‘श्री ४२० ‘मधील गाण्यात म्हटल्याप्रमाणे ‘फिर भी रहेगी निशानीयाॅ ‘…राज कपूरच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त या अष्टपैलू व्यक्तिमत्वावर वर्षभर विविध माध्यमांतून मोठ्याच प्रमाणावर ‘फोकस’ पडताना आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीतील चित्रपटसृष्टी, मिडिया, चित्रपट रसिक आणि मनोरंजन क्षेत्रात विविध विभागात पाऊल टाकलेल्यांना बरेच काही शिकता येईल. राज कपूर हे चित्रपट या माध्यम व व्यवसायाचे सखोल विद्यापीठ. ती फक्त व्यक्ति वा सेलिब्रिटीज नाही. त्यापलिकडे जात बरेच काही आहे. त्याचा शोध कधीच न संपणारा असाच आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 1
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 1
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.