दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘कहो ना.. प्यार है’ या फिल्मची चोविशी…
सहज म्हणून सांगतो, मी शालेय वयात असताना सत्तरच्या दशकाच्या पूर्वार्धात घरच्यांसोबत गिरगावातील सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये मराठी व हिंदी चित्रपट पाहू लागलो तेव्हा साठच्या दशकातील वा त्याही अगोदरचे मदर इंडिया, मुगल ए आझम, गंगा जमुना, दो ऑखे बारह हाथ, झनक झनक पायल बाजे, हम दोनो, कागज के फूल, गाईड, संगम, शहीद, हकिकत, तिसरी मंझिल असे अनेक ‘जुने चित्रपट पहात रहा ‘ अशा सल्ल्यानुसार समोर येत आणि कधी हे जुने चित्रपट मॅटीनी शो, रिपीट रन, दूरदर्शन, गल्ली चित्रपट यात पाह्यला मिळाले की ‘पूर्वी काय भारी पिक्चर बनत ‘ असं आपोआप तोंडात येई. याचा अर्थ त्यानंतर चांगले चित्रपट बनले नाहीत का असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण त्यानंतर चित्रपट बदलत गेला व रसिकांचीही आवडनिवड बदलत गेली.(Kaho Naa… Pyaar Hai)
हे आजच का सांगतोय माहितीये ? ‘कहो ना…प्यार है’ (Kaho Naa… Pyaar Hai) या चित्रपटाच्या मुंबईतील प्रदर्शनास तब्बल चोवीस वर्ष होऊन देखील तो ‘जुना चित्रपट’ म्हणून ओळखला जात नाही. कमाल आहे ना ? १४ जानेवारी २००० रोजी मुंबईत मेन थिएटर इराॅस आणि इतरत्र हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सगळं वातावरणच बदलून गेले. जणू वातावरण तारुण्याने चार्ज झाले. कहो ना…. प्रदर्शित होईपर्यंत ‘आल्सो चित्रपट’ असं म्हटलं जाई. म्हणूनच म्हणतो, पिक्चर रिलीज झाल्यावरच तो हिट की फ्लाॅप हे समजते नि तो हक्क तिकीट काढून येणाऱ्या पब्लिकचा !
मला आठवतय, या चित्रपटाची पूर्वप्रसिध्दी सुरु होताच अनेक पत्रकारांनी निर्माता व दिग्दर्शक राकेश रोशनच्या मुलाखतीला पसंती दिली. तोपर्यंत मी ‘खुदगर्ज’ व ‘करण अर्जुन’ या चित्रपटांच्या निमित्ताने राकेश रोशनची दोनदा सविस्तर व एक्स्युझिव्हज मुलाखत केल्याने मी ह्रतिक रोशनच्या मुलाखतीला पसंती दिली. राकेश रोशनच्या फिल्म क्राफ्ट या निर्मिती संस्थेचे ऑफिस तेव्हा सांताक्रूझ पश्चिमेला होते, तेथून निरोप आला, जुहू येथील अमिताभ बच्चनच्या प्रतिक्षा बंगल्याच्या मागच्या रस्त्यावरील कविता बिल्डिंगमधील पाचव्या मजल्यावर राकेश रोशनचे घर आहे, तेथे ह्रतिक रोशनची भेट घेता येईल.
त्यानुसार मी गेलो. एक लक्षात घ्या, तोपर्यंत “ह्रतिक रोशन” या नावाला अजिबात ग्लॅमर नव्हते. राकेश रोशनचा मुलगा अशी व इतकीच त्याची ओळख होती आणि ती जपूनच सवडीनुसार तो दररोज एक मुलाखत देत होता. त्या घरात राकेश रोशनने एके काळी भूमिका केलेल्या ‘घर घर की कहानी’,’पराया धन’, ‘खेल खेल मे’, ‘झूठा कहीं का’ ‘हत्यारा’ अशा चित्रपटांच्या यशाच्या स्मरणचिन्ह (अर्थात ट्राॅफिज) पाहून मी ह्रतिक रोशनला प्रश्न केला, हे चित्रपट तू पाहिले आहेस का ? तो छान हसला आणि नाही म्हणाला. पण माझं हिंदी ऐकून मी महाराष्ट्रीय आहे हे लक्षात येताच तो म्हणाला, शाळेत असताना मला पन्नास गुणांचे मराठी होते. त्याचा हा प्रांजळपणा मला आवडला.
मला आठवतय, त्या घरातील दूरसंचवाणीवर भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी क्रिकेट सामना सुरु होता. थोडा वेळ तो आम्ही एन्जाॅय केल्यावर मग आमची मुलाखत रंगली. तोपर्यंत तो ‘चित्रपटात आलेला नवीन चेहरा ‘ होता, त्यामुळेच त्याच्या वागण्या,बोलण्यात एक प्रकारचे साधेपण होते. (मिडियात असल्यानेच मला असे अनेक अनुभव घेता आले नि आजही येताहेत).
या चित्रपटाच्या अंधेरीतील एक पंचतारांकित स्थळी गाण्याच्या ध्वनिफित प्रकाशन सोहळ्यातही ह्रतिक रोशनचं एकूणच वागणं/वावरणं हे अगदीच सर्वसाधारण असेच होते. इतकेच की त्याची मैत्रीण सुझान खान आपले पिता संजय खान व आईसोबत आली होती. राकेश रोशन मात्र अतिशय रुबाबात वावरत होता आणि अगदी अपेक्षेप्रमाणेच त्याचे मित्र जितेंद्र व ऋषि कपूर यांच्या शुभ हस्ते ऑडिओ रिलीज झाले. विशेष उल्लेखनीय गोष्ट, जया बच्चन या इव्हेन्टसला हजर होत्या. ते दिवसच वेगळे होते. अशा सोहळ्याच्या आठवणी मनात जागा मिळवत.
अशातच चित्रपटाचा टीझर मनोरंजन वाहिनीवर आला. ह्रतिक रोशन व अमिषा पटेल ‘कहो ना…प्यार है’ (Kaho Naa… Pyaar Hai) च्या मुखड्यावर नाचताहेत एवढसंच त्यात होते पण ते असं आणि इतकं आवडले गेले की चित्रपटाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत गेले. टीझर असावा तर असा असे मी या चित्रपटाचे उदाहरण देऊन पटवून सांगत असे. मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांसाठी गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीतील मिनी थिएटरमध्ये झाला. छान मनोरंजक चित्रपट अशीच आमची सर्वसाधारण प्रतिक्रिया होती.
पण पिक्चर रिलीज झाला तोच फर्स्ट शोपासूनच रसिकांनी डोक्यावर घेतला. गाणी अतिशय वेगाने लोकप्रिय झाली. युवा पिढीला कॅची वाटली. ही एम टीव्ही पिढी होती. अजून हातोहाती मोबाईल आला नव्हता. पण तरुण संगीत हवं होते. त्यातच नृत्य दिग्दर्शिका फराह खानने ह्रतिक रोशनला दिलेल्या नृत्य स्टेप्स भन्नाट व स्टाईलीश. कहो ना प्यार है, ना तुम जानो ना हम, प्यार की कश्ती मे, चांद सितारे, दिल ने दिल को पुकारा, एक पल का जीना… तरुणाईवर या प्रत्येक गाण्याची विलक्षण जादू. गाण्यांसाठी पुन्हा पुन्हा हा चित्रपट पाहू जाऊ लागला (असा रिपीट ऑडियन्स चित्रपट हिट करतो हे परंपरागत सत्य…
आज ते विसरले गेलेय ते जाऊ देत. हिटच्या बातम्यांनी चित्रपट लोकप्रिय होतो अशी आज समजूत आहे की काय असं वाटतंय. ) चित्रपटात ह्रतिक रोशनची रोहित व राज चोप्रा अशी दुहेरी भूमिका. एकसारखेच दिसणारे दोघे आणि प्रेमकथा व सूडाची गोष्ट याभोवतीची हनी इराणीची पटकथा. चित्रपटातील राज आणि सोनिया सक्सेना ( अमिषा पटेल) यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग हा ह्रतिक रोशन व सुझानच्या प्रत्यक्षातील पहिल्या भेटीसारखाच अशी ‘स्टोरी’ रंगली.
चित्रपटाचा मध्यंतरचा प्रवास न्यूझीलंडच्या अतिशय अप्रतिम अशा दिलखुलास मोकळ्याढाकळ्या निसर्ग सौंदर्यात. ( न्यूझीलंडला शूटिंगला जा हा सल्ला गीतकार व दिग्दर्शक सावनकुमार यांचा. ‘सनम हरजाई’चं त्यांनी तेथेच शूटिंग केले होते.) कहो ना…च्या देखणेपणात न्यूझीलंडचा वाटा खूपच महत्वाचा. अहो, पिक्चर हिट होताच चक्क न्यूझीलंडचे पर्यटन वेगाने वाढले. चित्रपटाचे यश बरेच काही घडवत असतेच असते. काही महिन्यांनी याची परतफेड करण्यासाठी की काय न्यूझीलंडचे विदेश मंत्री भारत भेटीवर आले आणि दक्षिण मुंबईतील एका शानदार हाॅटेलमध्ये एक शानदार खाना आयोजित केला होता. मला आठवतय त्यात राकेश रोशनला किती बोलू नि किती नको असे झाले होते. पिक्चर सुपरहिट झाला आणि अनेकांना करिना कपूरची आठवण आली.
==========
हे देखील वाचा : एस पी सिन्हाचा शत्रुघ्न सिन्हा कसा झाला ?
==========
का माहितीये ? ‘कहो ना…प्यार है’ (Kaho Naa… Pyaar Hai) मध्ये तीच ह्रतिक रोशनची नायिका होती. मुंबईत महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओतील पहिल्या चित्रीकरण सत्रात तिने भागही घेतला. अशातच अभिषेक बच्चन अभिनय क्षेत्रात आला. अमिताभ बच्चनचा मुलगा म्हणजे, अतिशय वजनदार गोष्ट. करिना अर्थात बेबोच्या अतिशय महत्वाकांक्षी आई बबिताला वाटलं, ह्या ह्रतिक रोशनला काय ? त्यापेक्षा अभिषेक बच्चन मोठ्ठ नाणे. सोनेरी संधी.
त्याच्यासोबत करिनाचा पहिला चित्रपट असावा. तिने तशी राकेश रोशनला कल्पना देत ‘कहो ना…’ (Kaho Naa… Pyaar Hai) मधून करिनाला बाहेर काढून जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘रिफ्यूजी’ मध्ये करिनाला अभिषेक बच्चनची नायिका केले आणि अमिषा पटेलला ‘कहो ना… ‘ची जणू लाॅटरी लागली. हे सगळं घडून तब्बल चोवीस वर्ष झाली देखील ? म्हणजे रसिकांच्या दोन पिढ्या ओलांडूनही हा चित्रपट सतेज आहे. आपलं तरुणपण टिकवून आहे. आता चोवीस वर्ष पूर्ण झालेल्या चित्रपटाला ‘जुना अथवा मागच्या काळातील’ असं मानलं जात नाही हे देखील यशच. कहो ना…. है ना ?