दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अमर सिंह चमकीलाने मोडलेला चक्क अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ रेकॉर्ड
८० च्या दशकात सुप्रसिद्ध पंजाबी गायक अमर सिंह चमकीला (Amar Singh Chamkila) आणि त्याची पत्नी अमरजोत कौर यांच्या हत्येने सारा देश हादरला होता. अजूनही या दोघांच्या हत्येमागचं नेमकं रहस्य उलगडलेलं नाही. नुकताच अमर सिंह चमकीलाच्या जीवनावर बेतलेला बायोपिक ‘चमकीला’ हा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली (Imtiaz Ali) याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाची जबरदस्त चर्चा पाहायला मिळत आहे. बऱ्याच लोकांना हा चित्रपट पसंत पडला असून लोक याचे कौतुक करताना दिसत आहेत.
चित्रपटात दलजित दोसांझ आणि परिणीती चोप्रा हे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. एकूणच इम्तियाज अलीने केलेलं सादरीकरण, ए आर रहमान यांचं संगीत आणि कलाकारांचे अभिनय या तीनही गोष्टींचे कौतुक होताना दिसत आहे. पंजाबी संगीत विश्वातील चमकीला (Amar Singh Chamkila) हे नाव किती मोठं होतं, त्याला नेमका कोणत्या गोष्टीमुळे विरोध व्हायचा, त्याची गाणी खरंच अश्लील होती का, त्याच्या हत्येमागे नेमका कोणाचा हात होता? ८० च्या दशकात पंजाबमध्ये पसरलेला असंतोष, शिखांचा नरसंहार आणि यातूनच घडलेली चमकीलाची हत्या या सगळ्याचं चित्रण या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळत आहे.
८० च्या दशकात जेव्हा चमकीलाने (Amar Singh Chamkila) त्याची संगीत विश्वातील कारकीर्द सुरू केली तेव्हा अमिताभ बच्चन हे यशाच्या शिखरावर होते. त्यांच्या स्टारडमची एवढी हवा होती की कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होणाऱ्या व्यक्तीला त्या क्षेत्रातील ‘बच्चन’ अशी उपमा दिली जात असे. चमकीला यालासुद्धा त्याच्या संगीतविश्वातील बच्चन म्हणून ओळखलं जायचं. इतकंच नव्हे तर चमकीलाने त्याकाळात कॅनडामध्ये चक्क अमिताभ बच्चन यांचा रेकॉर्ड मोडला होता. चित्रपटात याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
जेव्हा चमकीला कॅनडामध्ये परफॉर्म करण्यासाठी आपली पत्नी अमरजोतसह पोहोचला तेव्हा गाडीतून फिरताना बाहेर दिसणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या भव्य पोस्टरकडे पाहून तो हरखून गेला होता. खास गोष्ट म्हणजे ज्याठिकाणी अमिताभ बच्चन यांनी परफॉर्म केलं होतं तिथेच चमकीला परफॉर्म करण्यासाठी जात होता.
हे देखील वाचा : Maidaan Box Office Collection:अजय देवगनच्या सिनेमाची नाही चालू शकली जादू पहा 1 दिवसात किती केली कमाई
चमकीलाचा (Amar Singh Chamkila) कॅनडामधला हा शो चांगलाच सुपरहिट होतो अन् प्रेक्षक त्याला उत्तम प्रतिसाद देतात हे आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतं. अशी गर्दी आजवर कधीच कोणत्याच कार्यक्रमाला झालेली नव्हती. चमकीलाचा शो जसा संपतो तसं कार्यक्रमाचे आयोजक त्याला येऊन सांगतात की बच्चन यांच्या शोसाठी त्यांना १३७ सीट अधिक लावाव्या लागल्या होत्या पण चमकीलाच्या शोदरम्यान त्यांना तब्बल १०२४ अतिरिक्त सीट्सची सोय करावी लागली होती.
त्याकाळी लोकप्रियतेचं दुसरं नाव होतं ते म्हणजे अमिताभ बच्चन. प्रत्येक कलाकार बच्चन साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा. खऱ्या आयुष्यात अमर सिंह चमकीलासुद्धा (Amar Singh Chamkila) अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता होता. दिग्दर्शक इम्तियाज अलीने ही गोष्ट चित्रपटात फार बारकाईने सादर केली आहे. चमकीलाची पंजाबमधील लोकप्रियता अधोरेखित करण्यासाठी त्याने अमिताभ बच्चन यांच्या स्टारडमचा वापर केला आहे. आपल्या अश्लील गाण्यांमुळे प्रसिद्ध असलेल्या चमकीलाने बरीच धार्मिक गाणीदेखील गायलेली आहेत अन् त्यांनाही लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता, पण त्याची खरी ओळख ही त्याच्या डबल मीनिंग गाण्यांमुळेच तयार झाली आणि या गाण्यांमुळे आणि प्रेक्षकांना जे हवंय तेच द्यायच्या अट्टहासामुळेच त्याची हत्या झाली.