‘जयहिंद’ चित्रपटाची पंचवीशी
मनोजकुमारने आपला बाणा (कोणी त्याला हट्ट तर कोणी अति आत्मविश्वास म्हणत. बोलणारे काहीही बोलू शकतात) सोडला नाही. चित्रपट बदललाय, चित्रपट निर्माण करण्याची पध्दत बदललीय, बड्या बड्या कलाकारांची सेटवर येण्याजाण्याची पध्दत बदललीय, एकाद्या दिवशी ते येतच नाहीत. चित्रपट रसिकांची आवडनिवड बदललीय हे काहीही विचारात न घेताच ‘जयहिंद’ (Jaihind Movie) (१९९९) या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते, संकलन, दिग्दर्शन या सर्व जबाबदाऱ्या स्वीकारत मुहूर्त केला.
एवढ्या जबाबदाऱ्यात त्याची क्षमता व आत्मविश्वास दिसतो. पटकथेत जोडीला राजीव कौल व प्रफुल्ल पारेख होते. गीतलेखनात त्याच्यासह वर्मा मलिक व माया गोविंद होतेच. चित्रपटात ऋषि कपूर, मनिषा कोईराला, रविना टंडन, कुणाल गोस्वामी ( हा त्याचाच मुलगा), प्रेम चोप्रा, अमरीश पुरी, सदाशिव अमरापूरकर, मोहनीश बहेल, अंजाना मुमताज, बीना आणि प्राण अशी भली मोठी स्टार कास्ट. मनोजकुमारला मल्टी स्टार कास्ट चित्रपट नवीन अजिबात नव्हते. ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ यांचा यशस्वी अनुभव होता. दोन्ही चित्रपट गोल्डन ज्युबिली खणखणीत सुपरहिट. पण आता काळ बराच बदलला होता.
मनोजकुमारचा दीर्घकालीन अनुभव व श्रेष्ठत्वामुळे नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धातील कलाकार तारखा देतील, अनेकांच्या तारखा जुळतील, सेटवर ते फार उशीरा येणार नाहीत असे अजिबात नाही. या काळात मनिषा कोईरालाची दिग्दर्शक सेटवर वाट पाहत बसलेत, ती उशीरा येते आणि दोनेक तासातच निघते यावरुन केवढे नि काय काय गाॅसिप्स व्हायचं ते विचारुच नका. आठ दिवसांचे चित्रीकरण सत्र बारा चौदा दिवसांचे होई. यामुळे तिच्यासोबत दृश्यात असलेल्या कलाकारांच्याही वेळेचा अपव्यय आणि तारखांचा गोंधळ होई. एकदा तर कमालीस्थान स्टुडिओत मनोजकुमार मनिषाची दोन दिवस वाट पाहत बसल्याची चर्चा रंगली. बरं, मनोजकुमार स्वतःच उत्तम संकलक असला तरी चित्रपटाला आकार आणण्यासाठी किती प्रयत्न करणार.
अखेर एके दिवशी या चित्रपटाच्या सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी गेलेल्या आम्हा सिनेपत्रकारांसमोर मनोजकुमारने आपला चित्रपट रखडून रखडून तयार होतोय याची व्यथा मांडली आणि आपला हा शेवटचा चित्रपट. यापुढे दिग्दर्शक म्हणून निवृत्त असेही म्हटले. मनोजकुमारचे चित्रपटसृष्टीतील स्थान पाहता ही गोष्ट अधिकाधिक प्रमाणात प्रसिद्ध होत होत मनिषा कोईरालापर्यंत पोहचायला वेळ लागला नाही. अशाच गोष्टी वेगाने पसरतात. मनिषा त्या काळात फाडफाड बोलण्यासाठी प्रसिद्ध होती. गाॅसिप्स मॅगझिनना हेच हवे असते. त्यात ते तिखट मीठ मसाला खारट तुरट टाकून अधिकाधिक चवदार बनवत.
मनिषा म्हणाली, मनोजकुमारजींना हिंदी चित्रपटसृष्टीची कामाची पद्धत बदलल्याची काहीच कल्पना नाही. शूटिंग रद्द होणे, सेटवर स्टार उशीरा येणे या गोष्टी आता कामाच्या भाग झाल्यात. त्या स्वीकारायला हव्यात. बिचारा मनोजकुमार काय बोलणार? ज्येष्ठांचा आदर वगैरे गोष्टी आता जवळपास कालबाह्य झाल्या होत्या. या सगळ्यातून जात चित्रपट एकदाचा पूर्ण झाला आणि २३ एप्रिल १९९९ रोजी प्रदर्शित झाला. त्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाली असली तरी मनोजकुमारच्या प्रगती पुस्तकात या चित्रपटाला लाल शेरा आहे. चित्रपट फ्लाॅप. आणि मनोजकुमारचे पॅकअप. एका यशस्वी दिग्दर्शकाने थांबणे पसंत केले.(Jaihind Movie)
अभिनेता म्हणून व दिग्दर्शक म्हणून मनोजकुमारवर स्वतंत्र फोकस टाकता येईल. दिग्दर्शक मनोजकुमारबद्दल सांगायचे तर,
मनोजकुमारची मला सर्वात आवडती गोष्ट म्हणजे, त्याचे गाण्याचे अतिशय जबरा आणि दृश्य माध्यमाचा उत्तम वापर केलेले टेकिंग, शब्द सौंदर्य व दृश्य सौंदर्याचा रुपेरी मिलाप. (Jaihind Movie)
मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हीरे मोती ( उपकार)
कस्मे वादे प्यार वफा सब ( उपकार)
पूरवा सुहानी आयी है, पुरवा ( पूरब और पश्चिम)
भारत का रहने वाला हू, भारत की बात बताता हू ( पूरब और पश्चिम)
कोई जब तुम्हारा ह्रदय तोड के ( पूरब और पश्चिम)
एक प्यार का नगमा है … जिंदगी और कुछ भी नही ( शोर)
पानी रे पानी तेरा रंग कैसा ( शोर)
शहनाई बजे ना बजे ( शोर)
जीवन चलने का नाम ( शोर)
बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई ( रोटी कपडा और मकान)
मै ना भुलूंगा मै ना भुलूंगी ( रोटी कपडी और मकान)
ही त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील त्याचा सर्वोत्तम टच असलेली “टाॅप ” गाणी. अभिनेता मनोजकुमार दिग्दर्शक कसा झाला याचाही एक किस्सा. केवल कश्यप निर्मित व एस. राम शर्मा दिग्दर्शित ‘शहीद’ (१९६५) मध्ये भगतसिंगच्या भूमिकेत मनोजकुमार तर सुखदेव आणि राजगुरुंच्या भूमिकेत अनुक्रमे प्रेम चोप्रा, आणि अनंत मराठे होते. तर मनमोहनने चंद्रशेखर आझाद साकारला. (Jaihind Movie)
चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान मनोजकुमारला भगतसिंगांची आई व भावाला भेटण्याचे, त्यांच्या आईच्या मांडीवर डोके ठेवून घटकाभर विसावा घेण्याचे सौभाग्य मिळाले होते. शिवाय थोर क्रांतिकारक “बटुकेश्वर दत्त” यांनाही ते आजारी असताना हॉस्पिटलमध्ये भेटण्याची संधी मिळाली होती. सिनेमा असे बरेच काही देत असतो. “शहीद’ च्या नवी दिल्लीतील प्रिमियरला मनोजकुमारने तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्री यांना निमंत्रित केले होते. त्यांनी निमंत्रण स्वीकारले पण व्यस्त कामामुळे फक्त दहा मिनिटे थांबीन असे सांगितले. चित्रपट सुरु झाला. मनोजकुमारचे लक्ष घड्याळाकडे आणि शास्त्रीजींकडे होते. १० मिनिटे कधीच होऊन गेली. शास्रीजी चित्रपट पहाण्यात एकरुप झाले होते.
मनोजकुमारने प्रोजेक्शन रुममध्ये जाऊन मध्यंतर करु नका असे सांगितले. अडीच तासांचा चित्रपट संपला तेव्हा शास्रीजी कमालीचे प्रभावित झाले होते. चित्रपटच तसा भारी होता. ‘शहीद’ चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला. “शहीद “ची टीम नवी दिल्लीतील सोहळ्यास गेली. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी या सोहळ्यानंतर संपूर्ण टीमला चहापानास बोलावले असता “जय जवान जय किसान” या त्यांच्या घोषवाक्यावर चित्रपट बनविण्याचे सुचविले. मनोजकुमारने दिल्ली ते मुंबई राजधानी एक्स्प्रेस प्रवासात नवीन चित्रपटाची रुपरेखा आखली. “शेतामध्ये राबणारा किसान गरज पडली तर सीमेवर लढायला जायला पण कचरत नाही हा संदेश देणारा “उपकार” हा चित्रपट. त्याच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ‘उपकार’ ( १९६७), नंतरचा ‘पूरब और पश्चिम’ (१९६९) यातील त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव ‘भारत’ असल्याचे रसिकांना आवडले आणि तीच त्याची ओळख व इमेज झाली. म्हटलं तर योगायोग. पण पथ्यावर पडलेला. तो काळ कलाकाराच्या इमेजला महत्व असणारा होता.(Jaihind Movie)
मनोजकुमारच्या एकूणच दिग्दर्शनाचा पट मांडताना ‘शोर ‘ बराच वेगळा. आणि त्याचा खास टच असलेला चित्रपट. त्याची गोष्ट आज कदाचित फारच योगायोगाने भरलेली वाटेल. पण पन्नास बावन्न वर्षांपूर्वीच्या रसिकांना ती विलक्षण भारावून टाकणारी होती.
‘शोर ‘ची थोडक्यात गोष्ट अशी, आपल्या मुलाला (मा. सत्यजित) अचानक सामोऱ्या आलेल्या रेल्वे अपघातातून वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या आईचा (नंदा) दुर्दैवाने मृत्यू होतो. तिचा हा जिवघेणा अपघात पाहताना विलक्षण आक्रोश केल्याने मुलाची वाचा जाते. तो बोलू शकत नाही. (Jaihind Movie)
पत्नीचा धक्कादायक मृत्यू आणि मुलावरचे संकट यामुळे शंकर (मनोजकुमार) हादरतो. मुलाच्या उपचारासाठी खूपच मोठा खर्च असतो. तेवढे पैसे आणणार कुठून? एकिकडे तो बराच वेळ सायकल चालवत पैसे मिळव वगैरे वगैरे गोष्टी करतो. दुसरीकडे त्याला आपल्या आई (कामिनी कौशल) व बहीणीची ( बेबी नाझ) साथ आहे. दुसरीकडे त्याला खान बादशाह (प्रेमनाथ) आणि रानी (जया भादुरी) मदत करतात. याशिवाय तो नोकरीही करतो. कधी त्या कारखान्यात टाळेबंदी होते म्हणून शंकर व्यथित होतो. कुठे सहकार्य तर कुठे अडथळेच. यातून मार्ग काढत काढत तो मुलाच्या उपचारासाठी पैसे जमवतो. अगदी मुलावर यशस्वी उपचार होतात. तो बोलूही लागतो. पण त्याचा आवाज ऐकण्यासाठी अतिशय जीवापाड प्रयत्न केलेल्या शंकरचा कारखाना नेमका तेव्हाच सुरु होतो, त्यात अपघातात तो सापडतो आणि त्यात तो दुर्दैवाने बहिरा होतो.
हा भावूक क्लायमॅक्सच विलक्षण भावस्पर्शी (टचिंग) ठरला. रसिकांना गुंतवून ठेवत ठेवत अखेरीस अनपेक्षित धक्का देण्यात मनोजकुमार यशस्वी ठरला आणि येथेच पिक्चरचे यश पक्के झाले. त्या काळात अशा प्रकारच्या सामाजिक चित्रपटांचे वातावरण होते. त्यात ‘शोर ‘ फिट्ट बसला आणि हिट ठरला आणि मुंबईत मेन थिएटर ऑपेरा हाऊसला रौप्यमहोत्सवी यश संपादले. विशेष म्हणजे, उपकार, पूरब और पश्चिम यांनीही याच ऑपेरा हाऊसला ज्युबिली हिट यश संपादन केले होते. ‘शोर’ने ज्युबिली हिटची हॅटट्रिक केली. इतकेच नव्हे तर नंतरचा ‘रोटी कपडा और मकान’ ( १९७४) नेही येथेच पन्नास आठवड्यांचा मुक्काम करताना दक्षिण मुंबईतील आम्हा चित्रपट रसिकाना मनोजकुमारचा चित्रपट म्हणजे हमखास ऑपेरा हाऊसच असे नाते घट्ट झाले. (‘उपकार ‘चे सुरुवातीला मेन थिएटर लिबर्टी होते इतकेच. )(Jaihind Movie)
‘शोर’ची थीम मनोजकुमारच्या देशभक्तीच्या हुकमी फाॅर्म्युल्यापेक्षा निश्चित वेगळी. ‘रोटी कपडा और मकान ‘पासून मनोजकुमार फिल्मी झाला. पब्लिकला अमूकतमूक आवडेल असा समज करुन घेऊन देशभक्तीपर संवाद वगैरेवर भर देऊ लागला. त्याचा ‘क्रांती’ ( १९८१) चक्क सलिम जावेदची पटकथा व संवाद असलेला पिरियड सिनेमा. (फरहान अख्तरचा एक आवडता चित्रपट) काही प्रसंग हास्यास्पद. सलिम जावेदकडून हा मागणी तसाच पुरवठा. मनोजकुमारच्या भारतकुमार प्रतिमेवर प्रेम असलेल्या त्याच्या हुकमी क्राऊडने पिक्चर हिट केले आणि एकदा जोरात सुरु असलेला चित्रपट मग बरेच आठवडे चालतच राहतो. मुंबईत मेन थिएटर अप्सरामध्ये पन्नास आठवड्यांचा भारी मुक्काम केला, बरं का? मनोजकुमारच्या दिग्दर्शनात दिलीपकुमार ही गोष्ट दिलीपकुमार चाहत्यांना म्हणावी तशी रुचली नाही. दिलीपकुमारने मात्र मनोजकुमारमधील दिग्दर्शकाला सहकार्य केले. परेलच्या राजकमल कलामंदिर स्टुडिओत याचा चित्रपती व्ही. शांताराम यांच्या शुभ हस्ते मुहूर्त रंगला.
मनोजकुमार यानंतर आपल्याच देशभक्त नायक या प्रतिमेत अडकला आणि थीमपेक्षा हुकमी दृश्ये (नायिका पावसात चिंब भिजणे, एकादा बलात्कार वगैरे) यात गडबडला. याचा परिणाम म्हणजे, त्याच्या दिग्दर्शनातील ‘क्लर्क’ (१९८९), ‘जयहिंद’ (१९९६) दणकून आपटले. ‘क्लर्क ‘मध्ये रेखा नायिका आहे हे यासाठी विशेष की त्या काळात ती आवर्जून बुजुर्ग दिग्दर्शकांच्या चित्रपटातून भूमिका साकारत होती. (Jaihind Movie)
विशेष म्हणजे, पहिल्या दोन चित्रपटाना (उपकार आणि पूरब और पश्चिम) कल्याणजी आनंदजी यांचे संगीत असूनही आणि गाणी आजही लोकप्रिय असूनही ‘शोर ‘साठी मनोजकुमारने लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची निवड केली. त्यांनीही कम्माल केली. सोपी चाल हे त्यांचे वैशिष्ट्य. विशेष म्हणजे पानी रे पानी, जीवन चलने का नाम, एक प्यार का नगमा अशा तीन गाण्यात आयुष्याचे तत्वज्ञान आहे आणि ते सोप्या शब्दात व साध्या चालीत आले आहे आणि ‘शोर ‘ पन्नास वर्षांनंतरही आजचा चित्रपट म्हणून रसिकांसमोर ठेवलयं. संगीतकार बदलायचा किस्सा असा की, त्या काळात चित्रपटातील गाणी आकाशवाणीवर लागावीत यासाठी संगीतकारांनाच प्रयत्न करावे लागत. ते कल्याणजी आनंदजी यांनी म्हणावे तसे केले नाहीत. यातील तत्थ कधीच स्पष्ट झाले नाही.
सर्वकालीन स्थिर असलेली एकच गोष्ट म्हणजे, महागाई. टिच्चून टिकून आहे आणि या सामाजिक, आर्थिक समस्येचे, वस्तुस्थितीचे चित्रपटातून प्रतिबिंब पडले नसते तर आश्चर्यच. मनोजकुमारच्या ‘रोटी कपडा और मकान ‘ मधील महंगाई मार गई आजही लोकप्रिय असलेले गाणे आहे. प्रत्येक काळात हे गाणे हमखास आठवते अशीच महागाईची स्थिर गोष्ट आहे. सत्तरच्या दशकाच्या पूर्वार्धात खूपच मोठ्याच प्रमाणावर देशभरात महागाई, साठेबाजी, भेसळीचे धान्य, राॅकेलला भली मोठी रांग, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई याबाबत समाजात खूपच मोठ्या प्रमाणावर असंतोष होता. राग धुमसत होता. काही राजकीय पक्ष आंदोलन करीत. ( आता तसे का करीत नाहीत असा प्रश्न पडतोय. पण उत्तर नाही. तो विषयच वेगळा.) हे सगळे त्या काळातील चित्रपटातून येणे स्वाभाविक होतेच.(Jaihind Movie)
=========
हे देखील वाचा : ‘साजन’ : ऑल टाईम हिट म्युझिकल लव्ह स्टोरी.
=========
‘रोटी कपडा और मकान’ या नावातच जीवनावश्यक गोष्टी आहेत. (त्यात कालांतराने मोबाईल, घरात/ कार्यालयात वातानुकूलित व्यवस्था, कुटुंबातील प्रत्येकाची फोर व्हीलर, सेकंड होम वगैरे, वीकेंड ट्रीप नंतर आले). त्यामुळेच हे नाव चित्रपट रसिकांना लगेचच अपिल झाले. आपलेसे वाटले. चित्रपटाच्या नावात बरेच काही असते असे म्हणूनच ते विचारपूर्वक ठेवा असे म्हणतात ते उगीच नाही. महंगाई गाण्यात फार मोठे सामाजिक भान . वर्मा मलिक यांच्या या गाण्याला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत. हे गाणे लता मंगेशकर, मुकेश, नरेंद्र चंचल आणि जानी बाबू कव्वाल यांनी गायले आहे. विशेष म्हणजे ८ मिनिटे आणि बावन्न सेकंद इतके मोठे हे गाणे असूनही ते पुन्हा पुन्हा पहावेसे आणि ऐकावेसे वाटते. मनोजकुमार आपल्या चित्रपटातील गाण्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रभावी अशा रुपेरी पडद्यावरील सादरीकरणाबाबत ओळखला जातो.
‘जयहिंद’ च्या पंचवीशीनिमित्त हे सगळं सांगायलाच हवे. एका यशस्वी दिग्दर्शकाच्या वाटेला कालांतराने काय आले हे समजायला हवे. चित्रपटसृष्टीत अनेक स्तरावर बदल होत असतात, आणि तीच वस्तुस्थिती आहे.