प्रचंड भागमभाग करून किशोर कुमारने हे गाणे रेकॉर्ड केले
किशोर कुमारच्या अनेक आठवणी आज देखील आपल्याला अचंबित करतात. संगीतकार मदन मोहन यांच्याकडे एक गाणे किशोर कुमारने(kishore kumar) अक्षरशः अर्धा तासांमध्ये रेकोर्ड केले आणि लगेच धावत पळत जाऊन त्याने पंचमदाचे गाणे रेकॉर्ड केले आणि तिथून पळत जाऊन त्याने फ्लाईट पकडली! भागमभागमध्ये रेकॉर्ड केलेले मदन मोहनचे गाणे पुढे सुपरहिट ठरले. काय होता हा किस्सा? आणि कोणत्या गाण्याच्या बाबत होता?
हा किस्सा १९७३ सालचा. एक चित्रपट आला होता ‘एक मुठ्ठी आसमान’ या सिनेमाला संगीत मदन मोहन यांचे होते. यात किशोर कुमारच्या(kishore kumar) एका गाण्याच्या रेकोर्डिंगचा भन्नाट किस्सा आहे. मदन मोहन यांनी किशोर कुमारची व्यवस्थित अपॉइंटमेंट घेऊन (कारण त्या काळी तो प्रचंड बिझी होता.) फेमस स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करायचे ठरवले. गंमत म्हणजे त्याच दिवशी दुपारी चार वाजता किशोर कुमारला एका म्युझिक प्रोग्रामसाठी विदेशात जायचे होते. किशोर कुमारला आणखी टेन्शन आले जेव्हा त्याने हीच तारीख अनावधानाने पंचमला देखील रेकॉर्डिंगसाठी दिली होती. एका दिवशी दोन दोन गाण्याचे रेकॉर्ड आणि त्याच दिवशी संध्याकाळी परदेशात प्रयाण करायचे होते! पण किशोर कुमारने मोठ्या कौशल्याने हा प्रसंग हाताळला.
सकाळी तो पंचमदाकडे फिल्म सेंटर येथे गेला आणि गाण्याची रेकॉर्डिंग त्यांनी सुरू केले. त्याच दिवशी अकरा वाजताची वेळ त्याने मदन मोहन यांना देखील दिली होती. फेमस स्टुडिओमध्ये ते त्याची वाट पाहत होते. परंतु बारा-साडेबारा वाजले तरी किशोर कुमारचा पत्ता नाही म्हणून मदन मोहनचा पारा थोडा चढला. त्यांनी त्यांच्या असिस्टंटला किशोर कुमारची चौकशी करायला पाठवले. तेव्हा असे लक्षात आले की किशोर कुमार(kishore kumar) फिल्म सेंटरमध्ये पंचमच्या एका गाण्याची रेकॉर्डिंग करत आहे.
तो असिस्टंट तिथे जाऊन पोहोचला आणि किशोर कुमारला म्हणाला, ”दादा, तिकडे मदन मोहन सर खूप चिडले आहेत तुम्ही अकरा वाजता तिकडे येणार होता!” किशोर कुमार(kishore kumar) म्हणाला, ”काही काळजी करू नको. मी ताबडतोब तिकडे येतो.” पंचमचे लक्ष नाही हे पाहून किशोर कुमार त्या असिस्टंट सोबत फेमस स्टुडीओमध्ये गेल्यावर त्याने मदन मोहन यांची माफी मागितली आणि फटाफट रेकॉर्डिंग सुरू करायला सांगितले. इकडे फिल्म सेंटरमध्ये जेव्हा पंचमच्या लक्षात आले की आपले गाणे अर्धवट सोडून किशोर कुमार गायब झालाय; तेव्हा त्यांनी त्याची चौकशी केली. तेंव्हा कळाले की मदन मोहनचा एक असिस्टंट आला होता आणि तो किशोर कुमारला घेऊन गेला.
पंचम ताबडतोब आपल्या कारने फेमस स्टुडिओमध्ये जाऊन पोहोचले. तेव्हा किशोर कुमार(kishore kumar) मदन मोहनच्या गाण्याचे रेकॉर्डिंग करत होता. एकाच वेळी दोन दोन संगीतकारांना समोरासमोर पाहून किशोर कुमार थोडासा घाबरला पण त्याने पटकन पंचमला डोळ्याने खुणावत थांबायला सांगितले. दोन मिनिटांचा ब्रेक घेऊन त्याने पंचमला सांगितले, ”यार पंचम, आज दोघांनाही मी तारीख दिली हे माझ्या लक्षातच नव्हते पण काही काळजी करू नको हे गाणे संपवून मी ताबडतोब पुन्हा फिल्म सेंटरला येतो. आपले उरलेले गाणे रेकॉर्डिंग करून टाकू आणि तिथूनच मी फ्लाईट पकडायला एअरपोर्टला जातो!” पंचमने डोक्याला हात लावला आणि हसू लागला.
======
हे देखील वाचा : एक ही मारा लेकीन सॉलिड मारा ना…
======
नंतर किशोर कुमारने मदन मोहनला सांगितले, ”मदन भैया आज खूप घाई आहे. आपण एका टेकमध्ये गाणं रेकॉर्डिंग करून टाकू.” आणि अक्षरशः पुढच्या पंधरा मिनिटात ते गाणे रेकॉर्ड देखील झाले. गाणे रेकॉर्ड झाल्या झाल्या किशोर कुमार(kishore kumar) पुन्हा फिल्म सेंटरमध्ये दाखल झाला आणि पंचमचे राहिलेले गाणे त्याने पूर्ण केले आणि तिथूनच त्याने एअरपोर्ट गाठले आणि विदेशात म्युझिक प्रोग्रामसाठी निघून गेले. भागमभाग करत रेकॉर्ड केलेले ते गाणे पुढे सुपरहिट झाले. आज देखील रसिकांच्या ते लक्षात आहे ते गाणे होते ‘हर कोई चाहता है एक मुठ्ठी आसमान…’