दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
ऋषी कपूरला घाबरून कॉटखाली लपून बसावे लागले!
ऋषी कपूर यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रामध्ये काही इंटरेस्टिंग घटना सांगितल्या आहेत. एक प्रसंग यश चोप्रा यांच्या ‘कभी कभी’(Kabhi Kabhie) या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यानचा काश्मीर येथील आहे. या घटनेत ऋषी कपूर आणि इतर सर्व कलावंतांना चक्क हॉटेलमधील पलंगाच्या खाली घाबरून लपून बसावे लागले होते. हे सर्व कलाकार प्रचंड घाबरले होते. शेवटी लष्कराच्या मदतीने त्यांची तिथून सुखरूप सुटका करण्यात आली. नेमका काय प्रकार झाला होता? हे कलावंत एवढे का घाबरले होते? आणि कुणाला घाबरले होते? काय होता नेमका हा किस्सा?
यश चोप्रा यांच्या ‘कभी-कभी’(Kabhi Kabhie) या चित्रपटाचे चित्रीकरण जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे चालू होते. जवळपास सर्व शूटिंग संपले होते. त्यामुळे बरेचसे कलाकार पुन्हा मुंबईला परत गेले होते. फक्त ऋषी कपूर, नीतू सिंग यांच्या एका गाण्याचे चित्रीकरण बाकी होते. जवळपास तो शूटिंगचा शेवटचा दिवस होता. हा दिवस होता ४ सप्टेंबर १९७५. योगायोगाने त्याच दिवशी ऋषी कपूर यांचा वाढदिवस देखील होता. त्यामुळे यश चोप्रा यांनी सिनेमाचे शूटिंग संपल्या प्रित्यर्थ आणि ऋषी कपूरचा वाढदिवस या दोन्ही गोष्टी सेलिब्रेट करण्यासाठी मोठी पार्टी ठेवली होती.
या पार्टीला त्यांनी शूटिंगच्या सर्व क्रू मेंबर्सला बोलवले होते. संध्याकाळी मोठ्या जल्लोषात पार्टी सुरू झाली. पण त्याच वेळी हॉटेलच्या बाहेर काही टॅक्सीवाले आणि घोडेवाले तिथे जमा झाले होते त्यांच्यात काही कारणामुळे वाद झाला आणि त्यांच्यात मारामारी सुरू झाली. थोड्याच वेळात यांच्यातील तुंबळ हाणामारी दगडफेकीमध्ये रूपांतरीत झाली. यश चोप्रा यांचे सहाय्यक दीपक सरिन यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे प्रकरण आणखीच चिघळले. त्या लोकांनी आता हॉटेलवर दगडफेक सुरु केली. हॉटेलमध्ये घुसून फर्निचरची मोडतोड सुरू केली.
आता या टॅक्सीवाल्यांमध्ये काही लोकल गुंड देखील सामील झाले होते. त्यांनी हॉटेलच्या एका भागात आग लावली. यश चोप्रा आणि युनिटचे सर्व लोक खूप घाबरले. त्यांनी ताबडतोब पार्टी बंद करून सर्व कलाकारांना आपापल्या रूममध्ये जायला सांगितले. हॉटेल प्रशासनाने त्यांच्या रूम लॉक केल्या आणि सर्व कलाकारांना पलंगाच्या खाली लपून बसायला सांगितले कारण गुंड आता सर्वत्र दगडफेक करत होते.(Kabhi Kabhie)
सर्व कलाकार प्रचंड घाबरले होते. जीव मुठीत घेऊन दगडांचे आवाज ऐकत कॉटखाली शांतपणे बसून राहिले. जमाव आता ऋषी कपूरला बाहेर येण्याचे आवाहन करत होता. परंतु हॉटेल प्रशासनाने ऋषी कपूरला अजिबात बाहेर येऊ दिले नाही. शेवटी तेथील लोकल राजकीय पुढारी नजीर बक्षी यांना कॉन्टॅक्ट केले गेले. त्यांनी ताबडतोब प्रसंगावधान राखून आणि प्रसंगाचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांना कॉन्टॅक्ट केले. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब लष्कराची कुमक तिथे मागवली आणि सर्व कलावंतांना मागच्या दाराने सुखरूप बाहेर काढले! ऋषी कपूर यांनी सांगितले “त्या दिवशी जर लष्कर वेळेत आले नसते तर आमच्यापैकी कोणीही जिवंत राहिला नसता!”
========
हे देखील वाचा : राजकपूरने ‘या’ गानहिऱ्याला ओळखून त्याचे नशीबच घडवले!
========
जाता जाता : थोडं या सिनेमा बद्दल! ‘कभी कभी’(Kabhi Kabhie) हा चित्रपट यश चोप्रा यांना साहीर लुधियानवी यांच्या ‘कभी कभी’ या एका कवितेवरून सुचला होता. ही कविता साहीर यांनी खूप आधी म्हणजे पन्नासच्या दशकात लिहिली होती. साहीर आणि खय्याम या जोडीचा हा सुरीला नजराणा होता. १९५८ साली याच जोडीने रमेश सैगल दिग्दर्शित ‘फिर सुबह होगी‘ला संगीत दिले होते. त्यातील हरेक गीत गाजले होते. तब्बल वीस वर्षानंतर पुन्हा तोच प्रत्यय आला.
हा चित्रपट म्युझिकल हिट सिनेमा होता. यात ‘मै पल दो पल का शायर हू’, ’कभी कभी मेरे दिल में खयाल आता है’ या क्लासिक गाण्यांसोबतच ‘तेरे चेहरे से नजर नही हटती’, ’तेरा फुलो जैसा रंग’ मेरे घर आयी एक नन्ही परी’ ही नव्या पिढीला आवडणारी गाणी देखील होती. या चित्रपटाला फिल्मफेअरची तब्बल १४ नामांकन मिळाली होती. त्यापैकी सर्वोत्कृष्ट गीतकार (साहीर लुधियानवी) सर्वोत्कृष्ट संगीतकार (खय्याम), सर्वोत्कृष्ट गायक (मुकेश) आणि सर्वोत्कृष्ट संवाद (सागर सरहदी) हि चार पारितोषिके देखील मिळाली ही पारितोषिके होती.