दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
एक वर्ष झाले तरी ‘बाईपण भारी देवा’ची सक्सेस स्टोरी सुरुच….
“पिक्चरमध्ये एकही युवा अभिनेत्री नाही, सगळ्याच पस्तीशी चाळीशी पार केलेल्या आहेत, कोण पिक्चर पाह्यला येईल?” अशी “बाईपण भारी देवा“च्या (Baipan bhari deva) प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना मराठी चित्रपटसृष्टीत “कुजबुज” ऐकू येत होती. त्यात कदाचित तथ्य असावे असेही उगाच वाटत होते (अशा बातम्या अशा वेगाने मुरतात, फिरतात की त्या खऱ्या वाटाव्यात आणि कसलीही खात्री करुन न घेताच “व्हाॅटस अप फाॅरवर्ड मेसेज” युगात त्या पसरतातही.) माझं मात्र कायमच म्हणणे असते, आपण पिक्चर पाहिल्याशिवाय उगाच कसलेही अर्थ वा अनर्थ काढायचे नाहीत.
“बाईपण….” (Baipan bhari deva) प्रदर्शनास एक वर्ष पूर्ण होत असताना ही गोष्ट सर्वप्रथम सांगावीशी वाटली, कारण या चित्रपटाला रसिक प्रेक्षकांनी (विशेषत: हाऊसफुल्ल गर्दीतील महिला प्रेक्षक) असा काही डोक्यावर उचलला की, सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम क्षेत्रात प्रचंड ढवळाढवळ झाली. भरभरुन चर्चा झाली. चित्रपटातील सर्वच प्रमुख व्यक्तीरेखा साकारणाऱ्या स्री कलाकारांच्या दिलखुलास मनापासून मुलाखती आणि चित्रपट धो धो चालत असतानाच महाराष्ट्रात कुठे कुठे सत्कार आणि त्यांच्यावर भेटवस्तूंचा प्रेमाने वर्षाव की काही विचारुच नका. जणू चमत्कार झाला. एक सुखद स्वप्नच जणू.
( ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही सुरुच आहे असे वाटते.) मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांना जुहूच्या सनी सुपर मिनी थिएटरमध्ये या चित्रपटाचा शो आयोजित करण्यात आला त्यातच या चित्रपटाबाबत दिग्दर्शक केदार शिंदे व निर्माते जियो सिनेमा यांना विश्वास वाटतोय हे अधोरेखित झाले. (ऐंशी नव्वदच्या दशकात मी अनेक मराठी व हिंदी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या खूपच अगोदर ट्रायलला पाहिले याची आठवण आली.)
रोज नवे रंग फासून
हसतेस दु:खावर
स्वप्न रोज तासून तू
ठेवतेस गाडाभर
जीव तुझा भात्यापरी
रोज होई खालीवर
ठिणगीला भीडणारी आगर
बाईपण भारी देवा
बाईपण भारी रं….
वैशाली नाईक लिखित, माधुरी भोसले निर्मित व केदार शिंदे दिग्दर्शित या सहा सख्ख्या बहिणींचे भिन्न स्वभाव, दृष्टिकोन, जीवन प्रवास असलेल्या नायिकाप्रधान चित्रपटाचे हे मध्यवर्ती सूत्र. तेच भारी ठरले. नि त्यात वेगळेपणही होतेच.
तसं पाहिलं तर, मराठी चित्रपटसृष्टीच्या चौफेर अष्टपैलू यशस्वी वाटचालीत नायिकाप्रधान चित्रपटांची आपली एक वैशिष्ट्यपूर्ण वाटचाल आहे. ‘वहिनीच्या बांगड्या’ ते “मोलकरीण”, ‘मानिनी’ ते ‘माहेची साडी’ आणि ‘एकटी’ ते ‘सखी’, “वहिनीची माया” ते “चंद्रमुखी” अशी अनेक बहुस्तरीय उदाहरणे आहेत.
केदार शिंदेनेही ‘अगं बाई अरेच्चा‘ ( २००४) मध्ये स्रीच्या मनात काय चाललंय हे पुरुषांना समजते, ऐकू येते अशी फॅन्टसी साकारत समिक्षक व रसिकांची दाद मिळवली. पिक्चर हिट झाला हे महत्वाचे. त्याचीच गरज असते. ‘बाईपण….’ या सगळ्या परंपरेत थोडा वेगळा नि फोकस्ड पब्लिसिटीने वातावरण निर्मिती केलेला. चाळीशी ओलांडलेल्या आणि आपापल्या आयुष्याच्या सुख दु:खात जगत असलेल्या सहा बहिणी मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येत जातात आणि या चित्रपटाची गोष्ट आकार घेत घेत जाते. (ही गोष्ट सुचली याचे जसे कौतुक तसेच यावर चित्रपट बनवायचे धाडस केले याचेही विशेष कौतुक) चित्रपटाची सुरुवात मला काहीशी विस्कळीत वाटली, लेखिकेला काय म्हणायचंय आणि दिग्दर्शकाला नेमके काय मांडायचयं हे लक्षात येत नव्हते.
केदार शिंदेकडून हे अपेक्षित नव्हतेच. पण जेव्हा गोष्ट स्पष्ट होते तेव्हा हळूहळू चित्रपट रंगत रंगत जातो आणि एकाच वेळेस भावनिक गोष्टी आणि खोडकरपणा यांची पकड घट्ट होत जाते आणि चित्रपट भरपूर मनोरंजन करतो. (फुल्ल एन्टरटेन्मेन्ट एन्टरटेन्मेन्ट एन्टरटेन्मेन्ट. तिकीट आणि वेळ काढून आलेल्या रसिकांची चित्रपटाकडून हीच अपेक्षा असते. चित्रपटाने उगाच डोक्याला शाॅट दिल्याचे अनेकांना आवडत नाही. सुपरहिट चित्रपटाची हिट लिस्ट पहा “दिमाग का दही” केलेले चित्रपट त्यात नसतील.) या चित्रपटातील सहाही जणींची स्वभाव वैशिष्ट्य आणि त्या प्रत्येकीची आपली एक गोष्ट आहे. तीच प्रत्येकीचे वेगळेपण अधोरेखित करते आणि प्रेक्षकांतील अनेक महिला यातील कोणाशी ना कोणाशी जोडल्या गेल्या. रिलेट झाल्या. चित्रपट असाच असावा लागतो. तरच प्रेक्षक व्हाॅटस अपला विसरुन पडद्याशी कनेक्ट होतो.
अशातच त्यांना जाणीव होते, अर्ध आयुष्य संपले आणि आपण स्वतःसाठी जगलोच नाही. वास्तव, वास्तव म्हणतात ते हेच. ते सहज यावे लागते. कधीच कोणी म्हटलं नाही… थांब श्वास घे… नेमक्या याच टप्प्यावर चित्रपटामागची भूमिका स्पष्ट होते. गिरगावातील खोताची वाडीत या सहा बहिणी स्पर्धेसाठीच्या तयारीसाठी एकत्र येतात आणि मग लहान लहान गोष्टीत रस निर्माण होतो. (याच खोताची वाडीत मी लहानाचा मोठा झाल्याने तर हा चित्रपट माझ्या खूप जवळचा झाला. आमच्या खोताची वाडीला साहित्य, चित्रपट वगैरेत केव्हाच स्थान प्राप्त झालयं.)
काही काही दृश्य थोडी लांबलीत त्याकडे लक्ष द्यायला हवे होते हे आता सांगायची गरज नाही. कारण पिक्चर सर्वकालीन सुपरहिट असल्याने हेही त्याचा एक भाग झालयं. लोकप्रिय चित्रपटाला सर्वच माफ असते. बाईपण (Baipan bhari deva) यशानंतर अनेक स्री व्यक्तीरेखा असलेले अनेक चित्रपट मराठीत निर्माण होवू लागलेत. हे असेच होत असते. कधी काळी नव्वदच्या दशकात “माहेरची साडी” च्या खणखणीत यशानंतर सोशिक नायिका ( अनेकदा अलका आठल्ये) आणि तिची कथा व व्यथा असे अनेक चित्रपट आले.
“बाईपण” मध्ये रोहिणी हट्टंगडी (जया), वंदना गुप्ते ( शशी), सुकन्या कुलकर्णी ( साधना), सुचित्रा बांदेकर ( पल्लवी), शिल्पा नवलकर ( केतकी), दीपा परब चौधरी ( चारु) या सहा जणींनी बहिणीच्या भूमिका साकारल्यात याची आपणास कल्पना आहे (यात आपली निवड का व कशी झाली नाही असा अनेक अभिनेत्रीना प्रश्न पडला अशीही कुजबुज झालीच. तेव्हापासून म्हणे, आपल्याला ऑफर झालेला चित्रपट नाकारायचा नाही असे अनेक कलाकारांनी ठरवून टाकले असे म्हणतात. काय सांगावे नेमका तोच सुपरहिट व्हायचा.) भिन्न आर्थिक स्तर आणि प्रत्येकीच्या वाटेवरचे भिन्न अनुभव ही गोष्ट फार महत्वाची ठरलीय. म्हणूनच मग या सहाही बहिणीत कोणाचे कोणाशी का पटतयं अथवा का जुळवून घेता येत नाही यावर छान फोकस पडलाय.
तीच जोडणी वा तोच गुंता रंगत रंगत जातो. प्रत्येक अभिनेत्रीने आपली स्पेसही ओळखलीय आणि वैशिष्ट्यही दाखवली. गोष्टीतील हा धागा प्रभावी ठरलाय. चित्रपटात शरद पोंक्षे, तुषार दळवी, सुरुची आडारकर, स्वप्नील राजशेखर, पियुष रानडे, सतीश जोशी लहान मोठ्या भूमिकेत आहेतच. छायाचित्रण वासुदेव राणे, संकलन मयूर हरदास, संगीत व पार्श्वसंगीत सई पियुषी यांचे. विशेष उल्लेखनीय गोष्ट, संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची ठुमरी रिक्रियेट करुन या चित्रपटात बॅकग्राऊंडला येते, या गोष्टीचा खास उल्लेख हवा. श्रीकांतजींच्या अनेक गैरफिल्मी दर्जेदार गाण्यांचा (गझल, ठुमरी वगैरे) मराठी चित्रपटातून उपयोग करता येईल.
बाईपणच्या पूर्वप्रसिध्दीत थीमनुसार ‘महिलाकेंद्रित इव्हेन्टस ‘ आयोजित केले हे महत्वाचे. तसे करणे आवश्यक असतेच. जसा चित्रपट तशीच त्याची पूर्वप्रसिध्दी असेल तर चित्रपट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचतो. (पब्लिसिटीचे बजेट वाढवून ते साध्य होत नसते. ही वस्तुस्थिती आहे.) दिग्दर्शक केदार शिंदेचा ‘महाराष्ट्र शाहीर‘ या चित्रपटाच्या पाठोपाठच हा चित्रपट प्रदर्शित झाला. दोन्हीची पठडी वेगळी. एकच दिग्दर्शक आणि दोन भिन्न चित्रपट हेदेखील कौतुकाचे. ‘महाराष्ट्र शाहीर’चे व्यावसायिक अपयश आश्चर्यकारक.
जियो स्टुडिओ, सहनिर्माते अजित भुरे आणि बेला केदार शिंदे यांचा “बाईपण” (Baipan bhari deva) चित्रपट पुरुषांनाही बाईपणाची जाणीव करुन देण्यात यशस्वी ठरला तर मग आणखीन काय हवे? यशासारखे चित्रपटाच्या जगात काहीच नसते. “पिक्चर हिट”ची गोष्ट अशी पडद्यावरच राहत नाही, थेटरातून चित्रपट उतरला तरी रसिकांच्या मनात राहतो आणि त्याच्या यशाचा प्रवास सतत पुढे सुरु राहतो.
=========
ही देखील वाचा : पती व पत्नी संबंधावरील “आविष्कार”ची पन्नाशी वैशिष्ट्यपूर्ण
=========
पूर्वी मुद्रित माध्यमातून “गुजरा हुआ जमाना”, “घुंगट के पट खोल” अशा सदरातून जुन्या मराठी व हिंदी चित्रपटांची महती व माहिती पुढील पिढीसमोर येत असे. व्हीडिओ युगात कॅसेटच्या रुपाने जुने चित्रपट पाहता येत. आज डिजिटल युगात यू ट्यूबवर जुन्या चित्रपटांचा खजाना उपलब्ध आहे. “बाईपण भारी देवा”ला (Baipan bhari deva) एकेक करत अनेक वर्ष होत जातील आणि त्याचे यश अधोरेखित होत राहील. मी आवर्जून सांगतो, ‘बाईपण भारी देवा’ हा माझा अलिकडच्या मराठी चित्रपटातील एक आवडता चित्रपट आहे, मनसोक्त मनमुराद एन्जाॅय केला.