दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
रिव्ह्यू : गुड्डू भैय्याने तारला मिर्झापूरचा तिसरा सिझन, संथ तरीही रंजक
ओटीटी नावाचे प्रस्थ जेव्हा वाढायला सुरुवात झाली तेव्हाच प्रदर्शित झाली ‘मिर्झापूर’ नावाची एक वेबसिरीज. करण अंशुमन दिग्दर्शित गुन्हेगारीवर आधारित आणि अॅक्शनने भरपूर अशी ही वेबसिरीज खूपच चर्चेत आली. हिंसक आणि बोल्ड सीन्सचा भडीमार असलेल्या या सिरीजने आपल्या दमदार आणि रंजक कथेमुळे सर्वच प्रेक्षकांची वाहवाही मिळवली. पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु शर्मा आदी कलाकाराच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिरीजचे दोन सिझन आले आणि नुकताच तिसरा सिझन प्रदर्शित झाला आहे.
‘मिर्झापूर’ सिरीजच्या मागील दोन्ही सिझनला मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर सगळ्याच रसिकांना प्रतीक्षा होती ती, या सिरीजच्या तिसऱ्या पर्वाची. मिर्झापूरच्या या पर्वाबद्दल सगळ्यांच्याच खूप अपेक्षा आहेत. मागील दोन पर्वांना मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता या तिसऱ्या पर्वाबद्दल प्रेक्षकांना खूपच उत्सुकता होती. हा सिझन रिलीज झाला असून, जाणून घेऊया या सीझनचा रिव्ह्यू.
या पर्वाची सुरुवात मागील पर्वाच्या शेवटी सुरू होते. मुन्ना त्रिपाठीची हत्या करून आणि कालीन भैय्याला बाजूला करून गुड्डू पंडितने स्वतःला मिर्झापूरचा बाहुबली घोषित केले. नंतर आता त्याच्या अपेक्षा वाढल्या असून, त्याला पूर्वांचलची गादी पाहिजे. मात्र त्याच्या या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे जौनपूरचे शरद शुक्ल आणि काही बाहुबली. तर दुसरीकडे कालिन भैया (पंकज त्रिपाठी) कुठेच नाही. ते नक्की कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही.
लेडी डॉन गोलू (श्वेता त्रिपाठी) ही आता आधीपेक्षा जास्त आक्रमक दाखवण्यात आली असून, ती गुड्डू पंडितला त्याच्या जवळची व्यक्ती बनवून आधार देते. जौनपूरच्या बाहुबली असलेल्या बशरद शुक्लाला (अंजूम शर्मा) गुड्डूला बाजूला करून मिर्झापूरची गादी ताब्यात घ्यायची आहे. या कामात तो राज्याची मुख्यमंत्री असलेल्या माधुरी यादवला (ईशा तलवार) सोबत घेतो. तर माधुरी यादवला बाहुबलीला संपवायचे असते. त्यासाठी ती बाहुबलीला आपले शस्त्र बनवते.
मात्र, या सगळ्यात कालीन भैया कुठे आहेत हे कोणालाच समजत नाही. कालीन भैया सिरीजच्या मध्यात मृत्यूला मात देऊन परत येतो. त्याचा जीव वाचवण्यासाठी शरद शुक्ला मदत करतो. मात्र आता कालीन भैय्या परत आल्यानंतर तो या कथेत नक्की कोणती भूमिका घेणार हे जाणून घेण्यासाठी ही सिरीज पाहावी लागेल.
दरम्यान या सिरीजमधील कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे झाल्यास सिरीज पाहताना गुड्डू पंडित भाव खाऊन जातो असे लक्षात येईल. अली फजलने रंगवलेला अतिशय सजीव आणि खरा वाटतो. अळीच्या अभिनयाचे देखील खूपच कौतुक आहे. कॉलेजला जाणारी साधी विद्यार्थिनी असलेली श्वेता त्रिपाठी तिसऱ्या सीझनमध्ये लेडी डॉन दाखवण्यात आली आहे. मिर्झापूरच्या या पर्वामध्ये कालीन भैय्या अर्थात पंकज त्रिपाठी हे कमी दिसतात. मात्र त्यांच्या वाट्याला आलेल्या कामात त्यांनी त्यांचा दमदार ठसा उमटवला आहे.
दिग्दर्शनाबद्दल सांगायचे झाल्यास गुरमीत सिंग यांनी या सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी त्यांच्या परीने ही सिरीज रंजक बनवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. मात्र मागील दोन सीझनच्या तुलनेत नक्कीच तिसरा सिझन कमी पडतो.
ज्यांनी या वेबसिरीजचे दोन सिझन पाहिले आहेत, त्यांनी हा तिसरा सिझन एकदा पाहायला हरकत नाही. मात्र हा सिझन थोडा निराशा करणारा आहे. पंकज त्रिपाठी सिरीजमध्ये कमी दिसणार असून, प्रेक्षक नक्कीच त्यांना मिस करतील.