‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
….आणि ए आर रहमान पहिल्यांदा ॲड व्हिडिओत झळकले!
आपल्या देशात मोबाईलच्या आगमन नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात झाले. रिंगटोन, डायलर टोन याला त्या काळात खूप इम्पॉर्टंस होतं. भारती एअरटेल (Airtel) यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी म्हणून स्वतःची अशी एक स्वतंत्र रिंगटोन बनवली होती. ही रिंगटोन आज पंचवीस वर्षानंतर देखील लोकांच्या लक्षात आहे. एअरटेलची ही कोणी स्वरबध्द केली होती माहिती आहे का?
या रिंगटोनला संगीत दिले होते ख्यातनाम संगीतकार ए आर रहमान यांनी. बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती नाही. या रिंगटोनवर जगभर प्रचंड उड्या पडल्या. त्या काळात सर्वाधिक डाऊनलोड करून घेतले गेलेली ही रिंगटोन ठरली. ही रिंगटोन आजही ऐकली तरी मनाला सुखद शांतता देते. या रिंगटोनचा एक व्हिडिओ करायचं कंपनीने ठरवलं. ज्या व्हिडिओमुळे आणखी वेगाने लोकांपर्यंत ही पोचता येईल असा त्यांचा होरा होता. त्या पद्धतीने कंपनीने काम सुरू केले. या रिंगटोनमध्ये कोणत्या सेलिब्रिटीला घ्यायचे यावर जेव्हा चर्चा सुरू झाली. तेव्हा एकच नाव समोर आले. संगीतकार ए आर रहमान.
ज्या संगीतकाराने ही रिंगटोन बनवली तोच जर जाहिरातीमध्ये दिसला तर आणखी प्रभावशाली पद्धतीने मार्केटिंग करता येईल. हा कंपनीचा (Airtel) अंदाज होता. ए आर रहमान यांनी तोवर अनेक ॲड आणि जिंगल्स केल्या होत्यां. पण कुठल्याही ॲडव्हर्टायझिंग फिल्ममध्ये त्यांनी काम मात्र केलं नव्हतं. १९८७ साली जेव्हा ए आर रहमान यांचे वय अवघं २१ वर्षे होतं; तेव्हा त्यांनी हैदराबाद आल्विन ट्रेंडी वॉचचे जिंगल्स केले होते.
भारती एअरटेलच्या (Airtel) जाहिरातीमध्ये रहमान यांनी काम करावे म्हणून कंपनीने हर प्रकारे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु रहमान म्हणाले, ”माझं काम म्युझिक द्यायचा आहे. ते मी केलेलं आहे. आता कोणीही सेलिब्रेटीला घेऊन तुम्ही ती ऍड तो व्हिडिओ तयार करा.” त्यावर कंपनीचे म्हणणं असं होतं की, ”आम्हाला सेलिब्रिटी नको आम्हाला तुम्ही हवे आहात!” पण ए आर रहमान यांचा नकार कायम होता.
=========
हे देखील वाचा : सूरज हुआ मद्धम चांद जलने लगा…
=========
दरम्यानच्या काळात ए आर रहमान हज यात्रेला मक्का येथे गेले. त्यानंतर ते बॉम्बे ड्रीम्स या त्यांच्या अल्बमसाठी लंडनला थांबले. तिथे एअरटेल (Airtel) कंपनीचे काही अधिकारी त्यांना पुन्हा भेटले आणि पुन्हा एकदा विनंती केली. आता मात्र रहमान यांनी विनंतीला मान दिला आणि जाहिरातीत काम करण्याचा निर्णय घेतला. राजीव मेनन यांनी ती जाहिरात बनवली होती. आज जवळपास २२-२४ वर्ष झाले; तरीही रसिकांच्या मनात टीव्हीवर झळकणारी ती एअरटेलची जाहिरात आणि ती रिंगटोन मनात घट्ट बसली आहे.
ज्या दिवशी या जाहिरातीचा शूट होतं त्या दिवशी प्रचंड पाऊस झाला. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील ए आर रहमान यांनी सहकार्य करत ही जाहिरात केली. या जाहिरातीमध्ये रहमान आपल्याला दिसतात. एअरपोर्टवर दिसतात. काही समारंभामध्ये दिसतात. ही रिंगटोन अनेक वाद्यांमधून वेगवेगळ्या रीतीने स्वतंत्र पणे वाजवण्यात आली. आज इतक्या वर्षानंतर देखील एअरटेलने आपली ही जाहिरात आणि रिंगटोन बदललेला नाही. आज ही रिंगटोन हीच एअरटेलची (Airtel) ओळख झाली आहे. एखादी जिंगल्स त्या प्रॉडक्टची ओळख बनावी हे यश साध्य झालं केवळ आणि केवळ ए आर रहमान यांच्यामुळेच! तुम्हाला आठवते का ही जाहिरात? या जाहिरातीची लिंक खाली दिली आहे.