पूनम धिल्लन : गोड चेहऱ्याची सुंदर अभिनेत्री!
सत्तरच्या दशकामध्ये हिंदी सिनेमाच्या दुनियेत एका गोड चेहऱ्याच्या अभिनेत्रीने पाऊल टाकले. ही अभिनेत्री दिसायला खूपच सुंदर होती त्यामुळे तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय झाली. अभिनयाच्या बाबतीत तशी फार काही वैशिष्ट्यपूर्ण म्हणावी अशी नव्हती पण गोड गोड दिसणे, झाडाभोवती फिरत गाणं गाणे… या त्या काळात अभिनेत्रीला लागणाऱ्या सर्व गरजा पुऱ्या करणारे होते. या अभिनेत्रीने आपली बारावीची परीक्षा चक्क सिनेमाची शूटिंग चालू असताना दिली होती. कोण होती हि अभिनेत्री? आणि काय होता नेमका तिचा किस्सा? (Poonam dhillon)
ही अभिनेत्री होते पूनम धिल्लन(Poonam dhillon). वयाच्या सोळाव्या वर्षीच तिला मिस यंग इंडिया हा पुरस्कार मिळाला. साहजिकच मिस इंडिया या पुरस्कारची ती तयारी करू लागली पण त्याच बरोबर शिक्षण देखील चालू ठेवावे अशी तिच्या घरच्यांची इच्छा होती. मिस इंडिया किताब तिला मिळू शकला नाही परंतु या कार्यक्रमात तिची भेट ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासोबत झाली. यश चोप्रा यांना पाहता क्षणी ती आवडली. लगेच त्यांनी तिला चित्रपटात काम करणार का ? असे विचारले. सुरुवातीला ती थोडी कन्फ्युज झाली. कारण एकच चित्रपट हा काही तिचा उद्देश नव्हता.
पण जेव्हा यश चोप्रा यांनी जेव्हा सांगितले, ”या सिनेमात तुझी भूमिका छोटी आहे. पण तुझ्या ज्या कलाकारांसोबत काम करणार आहेत ते कलाकार आजच्या काळातील सुपरस्टार आहेत!” पूनमने विचारले, ”कोण आहेत?” त्यावर यश चोप्रा म्हणाले, ”संजीव कुमार, अमिताभ बच्चन, वहिदा रहमान, शशि कपूर, हेमा मालिनी…’ ही नावे ऐकून आनंदाने पूनम चक्क ओरडली “बापरे!” ती (Poonam dhillon) खूप आनंदी झाली आणि तिने होकार दिला. अशा प्रकारे तिचा रुपेरी प्रवेश झाला यश चोपरा यांच्या ‘त्रिशूल’ या चित्रपटातून. या चित्रपटातील नायक होता आपला सचिन पिळगावकर. या चित्रपटात तिच्यावर एक गाणं देखील चित्रित झालं होतं. अगदी छोट्या परफॉर्मन्समध्ये देखील तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
यश चोप्रा यांनी तिला आता लीड भूमिकेमध्ये घेऊन चित्रपट बनवायचे ठरवले. चित्रपट होता ‘नूरी’. आता मात्र पूनम धिल्लन (Poonam dhillon) म्हणाली, ”माझ्या बारावीच्या परीक्षा आहे. मी सिनेमाच्या शूटिंगला वेळ देऊ शकणार नाही.” त्यावर यश चोप्रा यांनी एक आयडिया केली. ते म्हणाले, ”ज्या दिवशी तुझा पेपर असेल. त्याच्या आदल्या रात्री तुला फ्लाईटने चंदिगडला नेऊन सोडले जाईल. पेपर झाला की पुन्हा तू शूटिंगला यायचं!” पूनमने विचारले, ”आणि अभ्यास?” त्यावर या यश चोप्रा म्हणाले, ”तो तुला कशाला करायला पाहिजे? तू हुशारच आहेस!”
अशा पद्धतीने बारावीच्या परीक्षेच्या कालावधीत तिने ‘नूरी’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. या चित्रपटात तिचा नायक होता फारूक शेख. यश चोप्रा यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मनमोहन कृष्ण यांनी केले होते. चित्रपटाला संगीत खय्याम यांचे होते तर गाणी जानिसार अख्तर आणि नक्ष लायलपुरी यांनी लिहिली होती. ‘नूरी’ हा सिनेमा आज देखील म्युझिकल हिट पिक्चर म्हणून आठवला जातो.
==========
हे देखील वाचा : ….आणि ए आर रहमान पहिल्यांदा ॲड व्हिडिओत झळकले!
==========
पूनम या चित्रपटात खूप गोड दिसली होती. चित्रपटाचे कथानक काश्मीरमधील होते. गुलाबी थंडीत पूनमला पाहायला रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या भूमिकेसाठी तिला फिल्म फेअरचे नामांकन मिळाले होते. पुनम धिल्लन (Poonam dhillon) मात्र अभिनयाच्या बाबतीत तशी ठोकळाच होती. त्यामुळे अभिनयासाठी ती कधीच आठवली जात नाही. तिच्यावर चित्रित गाणी मात्र खूप सुंदर असायची.