मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
बादशाह ओ बादशाह पंचवीस वर्षांचा झाला देखिल…
यशस्वी कारकीर्दीची आखणी कशी करावी? स्वतःचा ब्रॅण्ड कसा निर्माण करायचा? स्वतःची ब्रॅण्ड व्हॅल्यू कशी वाढवायची?
आपलं अस्तित्व कसे दाखवून द्यावे? “मै हू ना” अशी इमेज कशी कायम ठेवायची आणि वादग्रस्त गोष्टीत अथवा काळात कसे गप्प रहावे? या सगळ्याला एकच उत्तर शाहरुख खान.
अब्बास मुस्तान (Abbas–Mustan) दिग्दर्शित त्याची स्टाईलीश भूमिका असलेल्या व्हीनस निर्मित “बादशाह” (मुंबईत रिलीज २७ ऑगस्ट १९९९)च्या प्रदर्शनास आज चक्क पंचवीस वर्ष झाली देखिल तरी देखील “शाहरुख खान” हेच गल्ला पेटीवर चलनी नाणे आहे. (हे मानणारा मोठाच वर्ग आहे.) खरं तर हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा आम्हा चित्रपट समीक्षकांनी त्याचं फार कौतुक करावे असे त्यात काही दिसले नाही. कारण काही रंजक नव्हतेच. अनेक वळणे घेत घेत चित्रपट पुढे सरकत राहिला तरी अब्बास मुस्तान दिग्दर्शित रहस्य रंजक चित्रपट म्हटल्यावर जो चकमा हवा अथवा टर्न आणि ट्विस्ट हवा, क्लायमॅक्स भारी हवा असे फार काही यात नव्हते.
नीरज वोरा याचे लेखन आणि श्याम गोयल यांची पटकथा होती. चित्रपट रसिकही पिक्चर पाहून फारसे इम्प्रेस झालेले नाहीत हे फर्स्ट डे फर्स्ट शोच्या पब्लिक रिपोर्टवरुन दिसू लागताच चित्रपटाशी संबंधित काहींची धावपळ सुरु झाली. काही झालं तरी पिक्चर फ्लाॅप होवू द्यायचा नव्हता. शाहरुख खानचा स्वतःचा हुकमी प्रेक्षकवर्ग असला तरी त्यांना रोमॅन्टीक हीरो म्हणून तो जास्त पसंत होता. अर्थात, आदित्य चोप्रा दिग्दर्शित “दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे” (मुंबईत रिलीज दिवाळी १९९५)चा प्रभाव. रुपेरी पडद्यावर प्रेम करताना पहावे ते देव आनंद, राज कपूरला हे एव्हाना फ्लॅशबॅकमध्ये होते आणि नव्वदच्या दशकातील कार्पोरेट युगात शाहरुख खानकडे ती किमया होती.
यश चोप्रा दिग्दर्शित “दिल तो पागल है” (मुंबईत रिलीज दिवाळी १९९७)ने त्याची तीच ओळख आणखीन एस्टॅब्लिज केली. “बादशाह” चित्रपटात गणित गडबडत होते. अशातच चित्रपटातील गाणी लोकप्रिय झाली आणि सिंगल स्क्रीन थिएटर्सवरील या चित्रपटाची गर्दी कायम राहिली (तोपर्यंत मल्टीप्लेक्स युग आले नव्हते), मनोरंजन उपग्रह वाहिनीवरील चित्रपट गीत संगीत कार्यक्रमात बादशाह ओ बादशाह, हम तो दीवाने हुऐ यार, मोहब्बत हो गई है, वो लडकी सबसे अलग है ही गाणी वारंवार दिसू लागली आणि छोट्या पडद्यावरील ही गाणी मोठ्या पडद्यावर पाहण्यास गर्दी होत गेली आणि शाहरुख खानचा हा चित्रपट पडता पडता वाचला आणि तो “बाॅक्स ऑफिस”चा बादशाह म्हणून ओळखला जाऊ लागला.
जावेद अख्तर व समीर यांच्या गीतांना अन्नू मलिकचे संगीत होते. व्हीनस कॅसेट कंपनीचा चित्रपट म्हटल्यावर त्यातील गाण्यांना अधिकाधिक प्रमाणात रसिकांपर्यंत पोहचवले जाणारच आणि तेच त्या चित्रपटाच्या यशाचा आधार ठरते. शाहरुख खान आम्हाला आवडत नाही, तो दिलीप कुमारचा नक्कल करतो, त्याच्या अभिनयात तोचतोचपणा असतो, तो फक्त मोठ्या दिग्दर्शकांच्या चित्रपटातून भूमिका साकारण्याचा सेफ गेम खेळतो अशी त्याच्यावर टीका करणारा एक वर्ग आहे. तसं तर जवळपास प्रत्येक कलाकाराच्या दोषांची चर्चा होत असते. त्यावर उपाय एकच, पिक्चर सुपर हिट होणे.
“बाजीगर” (१९९३) नंतर दिग्दर्शक अब्बास मुस्तान(Abbas–Mustan)च्या “बादशाह” चित्रपटात शाहरुख खान हे विशेष आकर्षण होते. अब्बास मुस्तान यांना “खिलाडी” (१९९२) पासून रहस्यरंजक फाॅर्मुला खिळवून ठेवणारे दिग्दर्शक असे म्हटले गेले. (“खिलाडी” खरं तर रवि टंडन दिग्दर्शित “खेल खेल मे“वर बेतला होता आणि मूळ चित्रपटाची रंगत त्यात नव्हती. ऋषि कपूर, नीतू सिंग व राकेश रोशन यांच्या भूमिका आणि राहुल देव बर्मनचे संगीत यांची त्या चित्रपटाला झक्कास साथ होती). “खिलाडी” ज्युबिली हिट ठरला आणि अक्षयकुमार “खिलाडी” हिरो म्हणून उभा राहिला.
दिग्दर्शक अब्बास मुस्तान (Abbas–Mustan) यांचा प्रवास बाजीगर (१९९३), दरार (१९९६), सोल्जर ( १९९८) असा होत होत “बादशाह”पर्यंत येताना कोणी त्यांना विजय आनंद शैलीचे दिग्दर्शक म्हटले हे अजिबात रुचणारे नव्हते. गोल्डी अर्थात विजय आनंद एकच असू शकतो, होवू शकतो. “बादशाह”त शाहरुखची नायिका ट्विंकल खन्ना मिसफिट. त्याशिवाय चित्रपटात प्रेम चोप्रा, राखी, सचिन खेडेकर, शरद सक्सेना, पंकज धीर, सौरभ शुक्ला, अवतार गिल, रज्जाक खान आणि अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका. सचिन खेडेकर राखीच्या पतीच्या भूमिकेत असून जोडीला एक रहस्यही आहे.
========
हे देखील वाचा : रामगोपाल वर्माने “दौड” वेगात का बनवला ?
========
अब्बास मुस्तान (Abbas–Mustan) यांनी “बादशाह” नंतर चोरी चोरी चुपके चुपके ( २००१), अजनबी ( २००१), हमराज ( २००२), ऐतराज ( २००४) अशी उत्तम वाटचाल केली. नंतर मात्र त्यांच्याकडून फार काही रहस्यरंजक चित्रपट पडद्यावर आले नाहीत. यातील काही चित्रपट विदेशी चित्रपटातील थीमनुसार होते. ते हिंदी चित्रपट संस्कृतीत बसवायचा प्रयत्न बराच जमला….
“बादशाह”ला पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना हे सगळेच त्यानिमित्त येतेच.