‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
राज बब्बर यांना दोन सिनेमातून डच्चू मिळाला होता!
ऐंशीच्या दशकातील अभिनेता राज बब्बर (Raj Babbar) याला सुरुवातीच्या काळात बॉलीवूड प्रवेशाच्या वेळी खूप मोठा स्ट्रगल करावा लागला कारण त्या काळात त्याला दोन मोठ्या संस्थेच्या सिनेमातून चक्क काढून टाकण्यात आले होते ! पण राज बब्बर हिम्मत हरले नाही ते मुंबईमध्ये टिकून राहिले आणि स्वतःचे एक वेगळे स्थान त्यांनी निर्माण केले. कोणते होते ते दोन चित्रपट आणि का त्यांना गमवावे लागले ते सिनेमे? खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे.
सत्तरच्या दशकात राज बब्बर दिल्ली रंगभूमीवर एक सक्षम अभिनेता म्हणून ओळखले जायचे. रंगभूमीवरील त्यांचा अभिनय पहायला भारतातून अनेक दिग्दर्शक, कलावंत, समीक्षक जात असत. एकदा संवाद लेखक सलीम जावेद दिल्लीला गेले होते. त्यांनी तिथे राज बब्बर यांचे एक नाटक बघितले त्यांना राज बब्बर (Raj Babbar) यांचा अभिनय खूपच आवडला. नाटक संपल्यानंतर ते राज बब्बर यांना भेटले आणि “मुंबईला सिनेमात काम करणार का” असे विचारले. राज बब्बर यांचा सिनेमात येण्याचा विचार होताच आणि जेव्हा सलीम जावेद विचारतात तेव्हा चित्रपट नक्कीच मोठ्या स्केलवरचा असणार हे त्यांच्या लक्षात आले. त्या काळात सलीम जावेद यांचा टी आर पी सुपरस्टारपेक्षा कमी नव्हता. राज बब्बरने होकार दिला.
त्यावेळी सलीम जावेद एका स्क्रिप्टवर काम करत होते. यात पिता-पुत्रांचा मोठा भावनिक संघर्ष त्यांना दाखवायचा होता. यातील मुलाची भूमिका राज बब्बरला देता येईल असे त्यांना वाटले. त्याप्रमाणे त्यांनी राज बब्बर यांना स्क्रीन टेस्ट द्यायला सांगितले. ही स्क्रीन टेस्ट त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना दाखवली. या स्क्रीनिंगच्या वेळी अभिनेते दिलीप कुमार देखील उपस्थित होते. कारण ते या चित्रपटात वडिलांची भूमिका करणार होते. दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि अभिनेते दिलीप कुमार या दोघांनाही राज बब्बर (Raj Babbar) याचा अभिनय आवडला आणि रमेश सिप्पी यांनी राज बब्बर यांना आपल्या आगामी चित्रपटासाठी साईन केले. चित्रपट होता ‘शक्ती’.
पण नंतर अशा काही घडामोडी घडल्या की चित्रपटाचे स्टार कास्ट बदलावी लागली. डिस्ट्रीब्युटर्स यांच्यामते राज बब्बर (Raj Babbar) यांच्या नावाला स्टार मूल्य नाही. खरोखरच त्या काळात त्या नावाला काहीच किंमत नव्हती. ही घटना १९७८ सालची आहे. त्या भूमिकेसाठी कुठला तरी इस्टॅब्लिश स्टार घ्यावा असे त्यांचे म्हणणे होते. रमेश सिप्पी यांनी देखील चित्रपटातील संघर्ष मोठ्या प्रमाणावर दाखवण्यासाठी दिलीप कुमारसमोर तुल्यबळ अभिनेता घेण्याच्या ठरवले आणि सर्वांच्या मते दिलीप कुमार समोर अमिताभ बच्चन हेच नाव फायनल झाले.
खरंतर राज बब्बर (Raj Babbar) यांना रमेश सिप्पी यांनी फायनल केले होते पण नंतर त्यांनी राज बब्बर यांची माफी मागून त्यांना चित्रपटातून काढून टाकले! राज बब्बर यांनी देखील सांगितले, ”तुमचे बरोबर आहे. अमिताभ बच्चन नाव हे खूप मोठे आहे आणि तुमच्या या बिग बजेट सिनेमासाठी तेच नाव योग्य आहे!” अशा पद्धतीने राज बब्बरच्या जागी अमिताभ बच्चन यांची वर्णी ‘शक्ती’मध्ये लागली.
याच काळामध्ये एका दुसऱ्या चित्रपटातून देखील राज बब्बर यांना काढून टाकण्यात आले. योगायोगाने या चित्रपटात देखील अमिताभ बच्चन यांची भूमिका होती. हा चित्रपट प्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटाचे नाव होते ‘नमक हलाल’. या चित्रपटात राज बब्बर (Raj Babbar) यांना सहनायकाची भूमिका दिली होती. (जी पुढे शशी कपूरला मिळाली.) त्यावेळी राज बब्बर यांनी प्रकश मेहरा यांना सांगितले, ”मुंबईमध्ये माझ्याकडे राहण्याची सोय नाही. मुंबईमधील भाडे मला परवडणारे नाहीत.” त्यावर प्रकाश मेहराने सांगितले, ”तू काही काळजी करू नकोस. माझा एक फ्लॅट आहे. तिथे तू आरामात राहा.” अशा पद्धतीने राज बब्बर त्याचे सर्व सामान घेऊन दिल्लीहून मुंबईमध्ये शिफ्ट झाला आणि चित्रपटाची तयारी करू लागला. पण पुन्हा एकदा माशी शिंकली. अशी काही चक्रे फिरली की ऐनवेळी राज बब्बर यांच्या जागी शशी कपूर यांची निवड झाली आणि राज बब्बर यांच्या हातातून हा दुसरा मोठा चित्रपट निसटला.
आता मात्र राज बब्बर (Raj Babbar) यांनी प्रकाश मेहरांना सांगितले, ”तुमच्या सांगण्यावरून मी दिल्ली सोडून मुंबईत आलो. मला तुम्ही सिनेमातून तर काढून टाकले ठीक आहे पण या फ्लॅटमधून मला काढू नका. कारण तसं झालं तर मला मुंबईमध्ये राहायचे ठिकाण नसेल.” प्रकाश मेहरा म्हणाले, ”काही हरकत नाही. तू या फ्लॅटमध्ये आणखी वर्षभर राहू शकतोस.” या वर्षभरात राज बब्बर यांनी मुंबईमध्ये आपले चांगलेच बस्थान बसवले.
==========
हे देखील वाचा : अभिनेत्री रेखाने नववीत असतानाच का शाळा सोडली?
==========
बी आर चोप्रा यांच्या ‘इंसाफ का तराजू’ या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका केली आणि जी प्रचंड गाजली. राज बब्बर (Raj Babbar) यांना या नंतर चांगले चित्रपट मिळू लागले आणि हळूहळू ते मुंबईत स्थिरस्थावर झाले. गंमत म्हणजे त्यांच्या हातातून निसटलेले दोन्ही चित्रपट म्हणजे रमेश सिप्पी यांचा ‘शक्ती’ आणि प्रकाश मेहरा यांचा ‘नमक हलाल’ या दोन्ही चित्रपटाचे नायक अमिताभ बच्चन नायिका स्मिता पाटील होती. अर्थात हा निव्वळ योगायोग होता. पुढे काही वर्षांनी स्मिता पाटीलसोबत राज बब्बर यांनी लग्न केले!