‘कस्मे वादे निभायेंगे हम…’ गाण्याच्या मेकिंगची भन्नाट गोष्ट!
बॉलीवूडचे सत्तरचे दशक ॲक्शन मुव्हीज असले तरी त्यात देखील संगीतकार आर डी बर्मन यांनी आपल्या जादुई संगीताने मेलडीयस रंग भरले होते. त्या काळात आर डी बर्मन म्हणजे सिनेमा संगीतातील अनभिशिक्त सम्राट होता. प्रत्येक वाद्यांवरची अचूक पकड, मेलडीला प्राधान्य आणि पाश्चात्य व भारतीय संगीताचा सुंदर मिलाफ त्यांच्या संगीतात असायचा. आर डी बर्मन हा एक अवलिया संगीतकार होता. त्याच्या संगीत देण्याच्या पद्धतीबद्दल खूप काही लिहून आलेलं आहे. (Kasme Vaade)
त्याचे साथीदार, वादक, गीतकार देखील भन्नाट होते. त्याच्या गाण्याच्या मेकिंगच्या कथा आज देखील बॉलीवूडमध्ये चवीनं ऐकवल्या जातात. आज त्यांच्या एका अतिशय लोकप्रिय गाण्याच्या मेकिंगची गोष्ट. १९७८ साली आलेल्या ‘कस्मे वादे’ (Kasme Vaade) या चित्रपटातील शीर्षक गीताची जन्म कथा गीतकार गुलशन बावरा यांनी विविध भारतीवरील एका मुलाखतीत सांगितले होती. खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे.
‘कस्मे वादे’ (Kasme Vaade) हा चित्रपट रमेश बहल यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन, रणधीर कपूर आणि राखी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यात अमिताभ बच्चन यांचा डबल रोल होता. यातील ‘कस्मे वादे निभायेंगे हम मिलते रहेंगे जनम जनम ….’ या गाण्याची जन्म कथा फार भन्नाट होती. जेव्हा दिग्दर्शकाने या गाण्याची जागा आणि प्रसंग सांगितला तेव्हा आर डी बर्मन यांनी एक ट्यून तयार केली आणि त्यावर काही डमी वर्ड टाकून ती कॅसेट गीतकार गुलशन बावरा यांच्याकडे पाठवून दिली.
गुलशन बावरा यांनी जेव्हा ही कॅसेट ऐकली तेव्हा त्यातील डमी वर्ड ‘चाबू चाबू चिया चिया’ ऐकून त्याला खूप गंमत वाटली. त्याने लगेच आर डी बर्मन यांना फोन केला आणि म्हणला, ”यार पंचम, या ट्यूनमधील हे डमी वर्ड नक्की काय सांगतात? चाबु चाबु चिया चिया… मला तर काहीच कळत नाही. तुला माहिती आहे का? हे गाणं अमिताभ बच्चन आणि राखी या सुपर हिट कलाकारांवर चित्रित होणार आहे!” त्यावर पंचम म्हणाला, ”ते मला माहिती आहे आणि हीच ट्यून खूप रोमँटिक आहे.” त्यावर गुलशन बावरा म्हणाला, ”पण मला काही नीट समजत नाही.” त्यावर पंचम म्हणाला, ”थांब मी आता तुझ्या घरी येतो. पण मला काहीतरी मस्त खाऊ घालायला पाहिजे!”
पंचम आणि गुलशन बावरा दोघेही प्रचंड फुडी होते. गुलशन बावरा म्हणाला, ”अरे यार तू ये तर खरं! मग बघू.” लगेच पंचम गुलशन बावरांच्या घरी पोहोचले. दारातूनच त्यांनी गुलशन बावराच्या बायकोला अंजुला त्याच ट्यूनमध्ये सांगितलं, ”सरसो का साग खिलाना अंजू…. मकई की रोटी खिलाना अंजू…चाबु चाबु चिया चिया… चाबु चाबु चिया चिया… !” आणि गुलशन बावरा यांना म्हणाला, ”गुल्लू अबे अब इसी ट्यून पे गाना बनाना… आई ट्यून समझमे?” गुलशन बावराची ट्यूब लगेच पेटली तो लगेच आपल्या म्युझिक रूममध्ये घुसला. डोक्यात ट्यून आता फिट्ट बसली होती. त्याने पेन काढले आणि झर झर लिहायला सुरुवात केली ‘कस्मे वादे निभायेंगे हम मिलते रहेंगे जनम जनम ….’
===========
हे देखील वाचा : टॉम अल्टर: प्रेक्षकांचा आवडता निळ्या डोळ्यांचा गोरा साहेब!
===========
तिकडे किचनमध्ये पत्नी अंजूने पंजाबी खायला बनवल आणि गाणं तयार झालं! ‘कसमे वादे निभायेंगे हम मिलते रहेंगे जनम जनम…’ किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील एक अप्रतिम रोमँटिक गीत बनले. ‘कस्मे वादे’ (Kasme Vaade) चित्रपटात एकून सात गाणी होती. हे टायटल गीत सिनेमात दोनदा येतं. त्याच प्रमाणे ‘आती रहेगी बहारे जाती रहेगी बहारे …’ हे गाणं सिनेमात एकदा किशोर कुमार, अमितकुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात तर एकदा अमित कुमारच्या स्वरात येते.
किशोर, रफी आणि आशा यांच्या स्वरातील ‘मिले जो कडी कडी एक जंजीर बने मस्त जमून’ आलं होतं. आशा भोसलेच्या स्वरातील ‘प्यार कि रंग से तू दिल …’ या गाण्यात पडद्यावर रेखा (गेस्ट अपियरंस) दिसल्यावर प्रेक्षकांना सुखद धक्क बसला होता. पंचमच्या स्वरातील ‘कल क्या होगा किसको पता अभी जिंदगी का ले लो मजा ‘ हे गाणे एका आफ्रिकन गाण्यावर बेतले होते.