ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दलच्या अफवांवर जुई गडकरीचे उत्तर
जेव्हा कोणत्याही नवीन मालिका सुरु होतात, तेव्हा जुन्या मालिका बंद केल्या जातात. टेलिव्हिजन विश्वात मालिका सुरु होणे आणि बंद होणे हे खूपच सामान्य आहे. काही महिन्यात, वर्षात जुन्या मालिका बंद होऊन त्याजागी नवीन मालिका येतात. सध्याच्या घडीला तर टीव्ही जगतात अनेक नवीन मालिका दाखल होण्याच्या मार्गावर आहेत. विविध चॅनेलवर अनेक मोठ्या आणि हटके विषयांवर आधारित मालिका लवकरच दाखल होणार आहे.
सध्या या नवीन मालिकांचे प्रोमो मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकही नक्की कोणती मालिका बंद होणार आणि त्याजागी कोणती नवीन मालिका सुरु होणार याचे अंदाज बांधताना दिसत आहे, सोशल मीडियावरही याबद्दल अनेक चर्चा होताना दिसत आहे.
सध्याच्या घडीला महाराष्ट्राची नंबर १ वाहिनी अशी ओळख असलेल्या स्टार प्रवाह वर देखील काही मालिका येऊ घातल्या आहेत. त्यांचे प्रोमो देखील खूपच गाजत आहे. त्यामुळे आता या चॅनेल वरील जुनी कोणती मालिका बंद होणार आणि या नवीन मालिका सुरु होणार यावर अनेक उलटसुलट चर्चा कानी पडत आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर आगामी काळात ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ आणि ‘उदे गं अंबे’ या दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत.
यातल्या ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि मंगेश कदम हे प्रमुख भूमिकेत दिसणार असून, या मालिकेचे प्रोमो खूपच गाजताना दिसत आहे. पण अजूनही या मालिकेची तारीख आणि वेळ जाहीर झालेली नाही. सोबतच अभिनेता देवदत्त नागे आणि मयुरी कापडणे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘उदे गं अंबे ही मालिका येत्या ११ ऑक्टोबरपासून सुरू होत असून, सोमवार ते शनिवार सायंकाळी ६.३० ही मालिका प्रसारित होणार आहे.
अशातच ‘स्टार प्रवाह’ची सुपरहिट आणि नंबर १ मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’ ही बंद होणार किंवा तिची वेळ बदलणार असल्याच्या देखील अनेक चर्चा सुरु आहेत. या सर्व चर्चांना मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या सायलीने म्हणजे अभिनेत्री जुई गडकरीने उत्तर दिले आहे. जुईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून यासंबंधित चाहत्यांशी संवाद साधला.
या संवादादरम्यान जुईला एका एका चाहत्याने विचारले की, ताई खूप लोक ‘ठरलं तर मग’ संपणार आहे, असे बोलताना दिसत आहे. हे खरं नाहीये ना? यावर जुई म्हणाली, “हे अजिबातच खरं नाहीये. मला माहित नाही कोण असे सांगते की, ‘ठरलं तर मग’ संपणार आहे. खरंतर अजून मालिका सुरुच झाली नाहीये, असे मी म्हणेल. कारण खूप महत्त्वाच्या गोष्टींचा अजून खुलासा झालेला नाहीये आणि त्याचा येत्या काही भागात खुलासा होणार आहे. तुम्ही जे जे प्रश्न विचारतायत ते येत्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्लीज एकही भाग बघायला विसरू नका.”
तर अजून एका फॅनने विचारले, “ताई बरेच जण म्हणताय आहेत की, ‘ठरलं तर मग’ची वेळ बदलणार आहे, हे खरं आहे का?” याच उत्तर देत जुई म्हणाली की, “जोपर्यंत ‘स्टार प्रवाह’ तुम्हाला काही सांगत नाही, तुम्ही अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. तुम्हाला माझी विनंती आहे.”
==============================
हे देखील वाचा: बाप्पाचा आशीर्वाद घेत ‘पाणी’सिनेमाचा टिझर लाँच; आदिनाथ कोठारेचा लूक ही आला समोर…
==============================
पुढे आणखी एका चाहत्याने विचारले की, “या आठवड्याचा टीआरपी ७.० होता. ‘ठरलं तर मग’ मालिकेचे किती मोठे यश आहे.” यावर जुई म्हणाली, “होय. यासाठी मालिकेचं संपूर्ण युनिट परिश्रम करतं आणि देव त्यांच्या प्रेमावर वर्षाव करतं.”
यावरून तर असेच दिसते आहे की, अजून दूरदूर पर्यंत ‘ठरलं तर मग’ ही मालिका संपण्याचा विषय नाही. म्हणजे या चॅनेलवरील दुसरी कुठली मालिका संपू शकते किंवा तिचा वेळ बदलू शकतो.