कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेत होणार मुक्ता बर्वेची एंट्री !
कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. इंदूचे निरागस प्रश्न, तिचे कीर्तन, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे तिचे आदर्श, मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांशी असलेले नाते सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत बरेच ट्विस्ट बघायला मिळाले. इंदूचा संघर्षमय प्रवास त्यात आंनदीबाई निर्माण करत असलेले कठीण प्रसंग हे सगळंच चर्चेत असतं. तर दुसरीकडे, आपल्याला विठूच्या वाडीत इंदू आणि फँटया गॅंग बरीच धम्माल मस्ती करताना देखील दिसतात. विठूच्या वाडीत निवडणूक आणि शालेय परीक्षा हि चर्चा सुरु असतानाच मालिकेत एका नवीन सदस्याची एंट्री होणार आहे. मालिकेमध्ये कणखर व्यक्तिमत्व असलेली मुक्ता इंदूच्या गावी येणार आहे आणि तिच्या आगमनाने गडबड उडणार आहे. ती नक्की विठूच्या वाडीत का आली आहे ? तिच्या येण्याने आंनदीबाईं कुठल्या नव्या पेचात पडणार? आंनदीबाईंचे उमेदवारी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होणार कि मुक्ता इनामदारच्या येण्याने ते अपुरं राहणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. मालिकेत मुक्त इनामदार हे पात्र साकारत आहे मराठी सिनेसृष्टीतील एक चतुरस्त्र अभिनेत्री मुक्ता बर्वे. (Mukta Barve In Indrayani Serial)
अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमधून मुक्ता बर्वेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आता ‘इंद्रायणी’ मालिकेच्या माध्यमातून मुक्ताचे छोट्या पडद्यावर पुनरागमन होत आहे, असे म्हणायला हरकत नाही. खमकी, कणखर तरीही कूल अशी मुक्ता यात पाहायला मिळणार आहे. मुक्ता या मालिकेत नऊवारी, गॉगल आणि स्नीकर्स अश्या कुल अंदाजमध्ये दिसणार आहे. मुक्ता इनामदार ही एकेकाळी बालकल्याण मंत्री आणि खो-खो खेळाडू होती. तिचं व्यक्तिमत्व गाजलेलं असून ती नेहमीच आपल्या चौकस वृत्तीसाठी ओळखली जाते. तिच्या गावी येण्याने इंदूच्या आयुष्यात अनेक नव्या वळणांचा सामना होणार आहे.(Mukta Barve In Indrayani Serial)
================================
हे देखील वाचा: ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या निरोपाचे क्षण जवळ येताच अरुंधती झाली भावूक…
================================
आपल्या भूमिकेविषयी बोलताना मुक्ता म्हणाली, “इंद्रायणी मालिकेतील माझी एंट्री एकदम धम्माल आहे. खूप दिवसांनी मला अशी मस्ती मजा करायला मिळते आहे. खरंतर इंदूची सतत या मालिकेत खूप परीक्षा बघितली जाते. तर, इंदूच्या टीममधला मी असा मेंबर असणार आहे जी आनंदीची परीक्षा घेणार आहे. त्यामुळे इंदूच्या टीममधला मी अजून एक मस्तीखोर मेम्बर असणार आहे असं म्हणायला हरकत नाही. एक वेगळा ट्रॅक आहे, खूप दिवसांनी टेलिव्हिजनवर अशी काहीतरी गमंत करायला मिळते आहे. तर माझ्यासाठी पोतडी प्रोडक्शन आमची सगळी टीम आम्ही खूप वर्ष एकत्र काम केले आहे. त्यामुळे माझी हक्काची टीम आहे माझा लाडका दिगदर्शक (विनोद लव्हेकर) आहे आणि त्याची हि मालिका असल्यामुळे मला काम करायला छान वाटतं आहे. नेहेमीपेक्षा काहीतरी हलकं फुलकं, गंमतीशीर करायला मिळतं आहे. वेगळा गेटअप आहे, वेगळी भाषा आहे, वेगळे सह कलाकार आहेत, मालिकेचे वातावरण वेगळे आहे. या मालिकेत तुम्हांला वेगळी मुक्ता बघायला मिळेल”.”