‘आंधळा मारतो डोळा’ ५१ वर्ष पूर्ण
मराठी चित्रपटात ग्रामीण कथानकावरील सर्वात लोकप्रिय जोडी दादा कोंडके आणि उषा चव्हाण हे सांगायला कोणतेच पंचांग पाह्यची गरज नाही की गुगलवरही जायला नको. ‘सोंगाड्या‘पासूनच अशी काही जमली की दादा कोंडके (Dada Kondke) यांची अन्य कोणी नायिका असू शकते यावर पब्लिकचा विश्वास नसे. यह पब्लिक है पब्लिक. त्यांनीच आपल्या देशात चित्रपट व क्रिकेट रुजवले, वाढवले, पसरवले. पण अधूनमधून या दोघांचे बिनसायचं देखील. (अतिपरिचयावज्ञा म्हणायचे काय?)
दादा कोंडके (Dada Kondke) कधी अंजना मुमताज तर कधी जयश्री टी. तर कधी मधु कांबीकर यांना आपली नायिका म्हणून संधी देत. कधी हिंदीत स्वप्ना देखील असे. पण जेव्हा ते वेगळे असत तेव्हा दादा काय नि उषा चव्हाण काय एकमेकांचे नावही घेत नसत. नाही म्हणजे नाही. जणू कडक उपवास. एकदा त्यांच्यात केवळ योगायोगानेच एका सिनेपत्रकारामुळे त्यांच्यात पॅचअप झाले. झालं
असं की, मुंबईतील रणजीत स्टुडिओत उषा चव्हाणची मुलाखत घ्यायला एक सिनेपत्रकार गेला असता त्याला तेथून दादांकडे ताडदेवच्या त्यांच्या ऑफिसमध्ये जायचे होते. म्हणून उषा चव्हाणची मुलाखत झाल्यावर तो सिनेपत्रकार रणजीत स्टुडिओच्या ऑफिसमध्ये दादांना फोन करायला आला. उषा चव्हाणही सोबत होती (त्या काळात स्टुडिओच्या कार्यालयातील फोन कलाकार व पत्रकारांना वापरता येत) आणि हीच संधी साधत त्या सिनेपत्रकाराने उषा चव्हाणला दादांशी बोलण्याचा केलेला आग्रह उषा चव्हाणने चक्क मान्य केला आणि एक वेळचे त्या दोघांचे भांडण मिटले. या अधूनमधून होत असलेल्या भांडणावर दादा कोंडके (Dada Kondke) यांचे उषा चव्हाणला म्हणणे असे, उषा, माझा जन्म कृष्णाष्टमीचा आणि तुझा कालाष्टमीचा, म्हणूनच आपले सूर जुळतात….
ही गोष्ट आजच का सांगितली?
कारण दादा कोंडके (Dada Kondke) यांची हुकमी नायिका उषा चव्हाण त्यांच्यासोबत नसलेला एक चित्रपट आहे. तो म्हणजे, आंधळा मारतो डोळा. हा चित्रपट सर्वप्रथम पुणे शहरातील मिनर्व्हा चित्रपटगृहात ३१ ऑगस्ट १९७३ रोजी प्रदर्शित झाला. तेथे हाऊसफुल्ल गर्दीत सुरु असतानाच आता १६ नोव्हेंबर १९७३ रोजी मुंबईत आला रे आला. गिरगावातील सेन्ट्रल, दादरचे कोहिनूर, विलेपार्ले येथील लक्ष्मी, अंधेरीतील नवरंग, गोरेगावातील अनुपम, मालाडचे कस्तुरबा, बोरीवलीत अजंठा, कल्याणचे कृष्ण आणि डोंबिवलीतील गोपी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अर्थात फर्स्ट शोपासूनच पिक्चर हिट आणि मग पश्चिम महाराष्ट्र, खांदेश इत्यादी ठिकाणी टप्प्याटप्प्याने प्रदर्शित होत राहिला. तोपर्यंत लाऊडस्पीकरील याची गाणी, रसरंग साप्ताहिकातून या चित्रपटाची माहिती रसिकांपर्यंत पोहचत होती. त्या काळात माध्यमे कमी असली तरी चित्रपट रसिकांपर्यंत पोहचत होता आणि आज…. जावू देत.
दादा कोंडके (Dada Kondke) निर्मित पहिला चित्रपट ‘सोंगाड्या‘ (पुणे शहरात प्रदर्शित १२ मार्च १९७१), मग दुसरा चित्रपट ‘एकटा जीव सदाशिव‘ (पुणे शहरात अलका टाॅकीजला प्रदर्शित ३१ मार्च १९७२) प्रदर्शित झाले.. योगायोगाने एकटा जीव सदाशिव प्रदर्शित झाला त्याच दिवशी पुण्यात चित्रपती व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा‘ प्रभातला प्रदर्शित झाला. दोन्ही सुपर हिट. आजही या दोन्ही चित्रपटांची गाणी लोकप्रिय. लोकप्रिय गाण्यांवर चित्रपट कायमच “चालत” असतो. या चित्रपटातील गाण्यांनी तर रेडिओ, लाऊडस्पीकर ते यू ट्यूब चॅनेल असा प्रकार सुरु ठेवलाय.
इजा, बिजानंतर तिजा हवाच. बळकटी देण्यासाठी. पहिल्या दोन्ही चित्रपटांची कथा पटकथा व संवाद वसंत सबनीस यांचे तर दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांचे होते. आता दादांनीच आंधळा मारतो…ची कथा लिहिली. यशासह आलेला हा आत्मविश्वास म्हणायचा. दादा मुळचे लोककलावंत असल्याने चांगली गोष्ट सुचणे स्वाभाविक होतेच. विच्छा माझी पुरी करा या
लोकनाट्यात ते ताज्या विषयावर पंचेस घेत. तसा विनोदाचा टायमिंग सेन्स त्यांच्याकडे होता.
पटकथा जगदीश खेबूडकर यांनी लिहिली. संवाद व दिग्दर्शन दिनेश यांचे. ( प्रभाकर पेंढारकर यांचे टोपणनाव दिनेश) गीते जगदीश खेबूडकर व दादा कोंडके (Dada Kondke) यांची आणि संगीत प्रभाकर जोग यांचे. पहिल्या दोन चित्रपटांना राम कदम यांचे संगीत होते. राम कदम यांच्याशी त्यानंतर सूर कधी जुळलेच नाहीत. पडद्यामागच्या गोष्टी काही वेगळ्याच असतात म्हणा. त्या काळातील मराठी चित्रपटसृष्टीतून त्या फार बाहेर पडत नसत. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल माध्यमातून पूर्वीचे कलाकार मात्र जुन्या आठवणीत जात त्या सांगतात.
दादा कोंडके (Dada Kondke) यांनी असे बदल केले आणि चित्रपटाचे नाव ‘आंधळा मारतो डोळा‘. नायिका म्हणून अंजना मुमताजची निवड. कारण, नायिका शहरी. त्यामुळेच तशी नायिका हवी. (आणि उषा चव्हाण अन्य नायकांसोबत इतर चित्रपटात कार्यरत. तेही आवश्यक असते हो. ) धुमाळ, जयशंकर दानवे, गुलाब मोकाशी, भालचंद्र कुलकर्णी, रजनी चव्हाण, सरस्वती बोडस, शांता तांबे, संपत निकम, दामोदर गायकवाड आणि पाहुणी कलाकार अरुणा इराणी.
पिक्चरची थीम अशी, दादा कोंडके यांची धमाल दुहेरी भूमिका. एक दादा कोंडके पब्लिक पसंत करताहेत. आता तर एकाच तिकीटावर दोन दादा कोंडके (Dada Kondke) पाह्यला मिळताहेत. शहरात कृष्णकुमार आणि गावात भीमा. पब्लिकला एकाच तिकीटावर दोन दोन दादा कोंडके ही फुल्ल एन्टरटेन्मेन्ट पर्वणी. भीमाला पिक्चरचं वेडं असते. त्याला वाटतं आपण मुंबईला जावूया नशीब पालटेल. (मुंबईची ही सर्वकालीन ओळख) कृष्णकुमारला त्याचे काका (जयशंकर दानवे) छळत असतात. त्याला मावशी (सरस्वती बोडस) वाढवते तर त्याचं बहिणीवर (रजनी चव्हाण) प्रेम आहे. कृष्णकुमार नेमका भीमाच्या गावात जातो तेव्हा कृष्णकुमारचे सवंगडी (धुमाळ वगैरे) त्याला भीमा समजतात तर मुंबईत भीमाला कृष्णकुमार समजतात. दिसायला सारखेच असल्यानेच अशी गंमत जंमत होणारच. कृष्णकुमारची प्रेयसीही (अंजना) फसते. यातून होणारी गंमत जंमत, गडबड गोंधळ, अफलातून धुमाकूळ म्हणजेच,”आंधळा मारतो डोळा’.. दादांना आपल्या चित्रपटाची नावे छान सुचत. याला दाद द्यायलाच हवी.
दादा कोंडके (Dada Kondke) यांनी यशाची हॅटट्रिक साधली हे महत्वाचे. दादांचा पिक्चर रिलीज होतो ते पंचवीस आठवडे मुक्काम करण्यासाठीच. कधीही थिएटरवर जावे तर हार घातलेला हाऊसफुल्लचा फलक हुकमी आणि ब्लॅक मार्केटमध्येही तिकीटाला मागणी. मला आठवतय सेन्ट्रल थिएटरला त्या काळात अप्पर स्टाॅलचे तिकीट दर दोन रुपये वीस पैसे असे होते. दादा कोंडके गीतलेखनातही विशिष्ट शैली होती. प्रसंगाचा मूड त्यात ते पकडत आणि त्याच गाण्याच्या पडद्यावरच्या सादरीकरणाचे भान त्यांना असे.
चल रं शिरपा देवाची किरपा, ऐशी वर्षाची असून म्हातारी सांगतीया वय सोळा खोटं काय म्हणता आंधळा मारतो डोळा, हिल हिल पोरी हिला तुझ्या कप्पालीला टिला, पोरं मी लहान बालिका अजान, नाना पुरे करा हा फाजिलपणा आता लय झालं ही या चित्रपटातील दादा कोंडके यांनी लिहीलीत. तर जगदीश खेबूडकर यांची जीव भोळा खुळा कसा लावू लळा, अजून रंगाची हळद ही गाणी आहेत. दादा कोंडके (Dada Kondke) यांना लोकसंगीताचा कान फारच चांगला. म्हणून तर नेहमीच ते गाण्यात भारी ठरत आणि गाणी हिट तर पिक्चरला रिपिट रन हमखास.
त्या काळात गाणी प्रतिभेतून जन्म घेत. ही गाणी आशा भोसले, उषा मंगेशकर व जयवंत कुलकर्णी यांनी गायलीत. चित्रपटाचे छायाचित्रणकार त्यागराज पेंढारकर आणि संकलन दादांचे हुकमी एन. एस. वैद्य. दादा कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओत शूटिंगचा डेरा टाकत. हाही चित्रपट तेथेच चित्रीत झाला. हिल हिल पोरी हिलाचे शूटिंग चेंबूरच्या आशा स्टुडिओत झाले तर चित्रपटातील काही प्रसंग गॅन्ट्र रोडच्या ज्योती स्टुडिओत चित्रीत झाली. मुंबईतील जुन्या काळातील अनेक स्टुडिओच्या जागी आता काही वेगळेच उद्योग आलेत.
दादांनी ओळीने तीनही चित्रपट हिटची साधलेली हॅटट्रिक त्यानंतर ते चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकत ‘पांडू हवालदार‘ (१९७५) पासून पुढे कायम राहीली. पहिल्याच दिग्दर्शनात राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार. काही दाद द्याल की नाही? दादा कोंडके (Dada Kondke) यांनी आपले गुरु भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘तांबडी माती‘ (१९६९) पासून चित्रपट माध्यम व व्यवसायात अभिनेता म्हणून पाऊल टाकले होते.
===============
हे देखील वाचा : ‘ऐतराज’ला २० वर्ष पूर्ण
===============
मी मिडियात आल्यावर अर्थातच दादा कोंडके (Dada Kondke) यांच्या अनेक भेटीगाठी, मुलाखती, त्यांच्या चित्रपटाच्या आऊटडोअर्स लोकेशनवर शूटिंग रिपोर्टिंगसाठी जाणे हे सातत्याने अनुभवले. चार दशके मी मिडियात असल्याने मला अशी चंदेरी/ सोनेरी/ रुपेरी संधी मिळत राहिली. आपल्या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण झाल्यावर दादा मुंबईतील आम्हा सिनेपत्रकारांना कधी गोवा, तर कधी महाबळेश्वरला फिरायला नेत आणि मग दादांची अखंड/ प्रचंड मनसोक्त मनमुराद “बोलं” दाजी आपण ऐकत राह्यची. भरपूर माहिती व मनोरंजनाचा खुराक हुकमी….